14 व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकची ओळख एक अत्यंत क्रुर आणि कठोर तरीही एक उदार राजा अशी होती. त्याने आपल्या सत्तेचा वापर अत्यंत क्रुरपणे आणि मनमानीपणे केला. त्याच्या शासन काळातील वर्णन जशास तसं आणि अत्यंत विश्वासार्ह पद्धतीनं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मोरोक्कोचा प्रवासी इब्न बतूताच्या लेखनाचे संदर्भ पहायला हवेत. इब्न बतूता हा मोहम्मद तुघलकच्या काळात त्याच्या दरबारात जवळपास सहा वर्षे होता. मोहम्मद तुघलकला दोनच प्रकारच्या सवयी आहेत असं इब्न बतूताने लिहून ठेवलंय. एक म्हणजे लोकांना भल्यामोठ्या भेटवस्तू देणं आणि दुसरं म्हणजे सामान्य प्रजेवर अन्याय करणे, त्यांच्या रक्ताचा घोट घेणं. इब्न बतूताने जे वर्णन लिहिलंय, त्यामध्ये सुरुवातीच्या तीस पानांमध्ये आपल्या राज्यातील श्रीमंत आणि गडगंज लोकांना विशेषत: परदेशी पाहुण्यांना भल्यामोठ्या भेटवस्तू देणे, त्यांच्यावर प्रचंड खर्च करणे या तुघलकच्या सवयीबद्दल नोंद केली आहे. त्या नंतरच्या वर्णनात त्याने तुघलककडून सामान्यांना देण्यात येणाऱ्या क्रुर शिक्षेबद्दल लिहिले आहे. आपल्या मतांशी जे लोक सहमत नाहीत त्या लोकांना सुलतानाने या शिक्षा दिल्या असं इब्न बतूताने लिहून ठेवलंय. 


याचबरोबर इब्न बतूताने आणखी काही गोष्टींची नोंद केली आहे. त्या वेळची आणि आताही असलेली राजधानी दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी तुघलकने काय पावले उचलली याचीही नोंद आढळते. सामान्यांच्या रक्ताचा घोट घेण्याची सवय लागलेल्या या सुलतानला त्याची प्रजाच कंटाळली होती. त्या प्रजेने आता सुलतानाचा खुल्यापणानं धिक्कार करायला आणि तशा प्रकारचे अपमानजनक संदेश लिहून सुलतानला पाठवायला सुरुवात केली. याचा सूड घेण्यासाठी मग सुलतानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. त्याने दिल्लीच्या जनतेच्या नावे एक आदेश जारी केला. त्या आदेशात सांगितलं होतं की सामान्यांनी आता दिल्ली सोडावी आणि दौलताबादकडे कूच करावी. दौलताबाद ही आता सुलतानची नवी राजधानी असणार आहे अशी घोषणा करण्यात आली. दिल्लीचा कोपरा न कोपरा शोधा आणि आपल्या आदेशाचे पालन लोकांनी केलं का नाही हे पहा अशी सूचना सुलतानने आपल्या गुलामांना आणि नोकरांना दिली अशी इब्न बतूताने नोंद केली आहे. सुलतानाच्या गुलामांनी एका ठिकाणी लपलेल्या दोन लोकांना फरफटत आणलं, ज्यापैकी एक अपंग होता आणि दुसरा आंधळा होता. अपंगाला किल्ल्याच्या टोकावरुन खाली फेकण्यात आलं आणि आंधळ्या व्यक्तीला तब्बल चाळीस दिवस फरफटत दौलताबादचा प्रवास करायला भाग पाडण्यात आलं. या दरम्यान त्या आंधळ्या व्यक्तीच्या शरीरावर परिणाम झाला आणि दौलताबाद येताच त्याने आपला जीव सोडला. 


दिल्लीचा सुलतान आपल्या राजवाड्याच्या छतावर गेला आणि दिल्लीच्या दिशेने चौफेर नजर टाकली. कुठून प्रकाश तर येत नाही ना किंवा कुठून धूर तर उठत नाही ना याची खातरजमा केली. आता दिल्लीत कोणीही उरलं नाही याची खात्री पटल्यावर तो म्हणाला की, "आता माझ्या डोक्याला शांत वाटतंय आणि माझ्या भावनांना समाधान मिळतंय." आपल्या निरंकुश हुकूमशाहीचे प्रदर्शन केल्यानंतर, लाखो लोकांचा जीव धोक्यात घातल्यानंतर, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यानंतर दोन वर्षाने या तुघलकने पुन्हा एकदा प्रजेच्या नावे एक आदेश काढला, आता सगळ्यांनी परत दौलताबादवरुन दिल्लीला जावं, कारण आता दिल्ली पुन्हा एकदा राजधानी असेल. 


आज वर्तमानात भारताकडे आपला स्वत:चा तुघलक आहे, त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे सत्तेसाठी वेडेपिसे असल्याचं मानलं जातं. ते या देशाला आपल्या जहागिरीसारखं चालवतात आणि कोणत्याही प्रकारची असहमती सहन करत नाहीत असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. कोरोनाच्या महामारीत आपले कर्तव्य पार पाडण्यात ते कशा पद्धतीने अयशस्वी ठरले हे आता संपूर्ण जगानं पाहिलंय. भाजपमधील काही लोकांनी याचा अनुभव घेतलाय पण मोदींच्या विरोधात सार्वजनिक स्वरूपात आपलं मत व्यक्त करायला ते घाबरतात. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने वैज्ञानिक तज्ज्ञांच्या मताचा कोणताही आदर केला नाही, त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. कोरोनाची दुसरी लाट येणार या तज्ज्ञांच्या मताकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आता त्याचा परिणाम आता जनता अनुभवतेय. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजे देश आता जगाच्या नजरेत दयेसाठी पात्र बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दर दिवशी चार हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. आता तर कोरोनाचा प्रसार हा ग्रामीण भाग आणि वाड्या-वस्त्यांवर होत आहे अशा बातम्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी एका विजेत्या प्रमाणे घोषणा केली होती की, भारताने कोरोनाला केवळ पराभूतच केलं नाही तर जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. 


अशा अनेक गोष्टी आहेत ज्या 14 व्या शतकातील सुलतान आणि 21 व्या शतकातील लोकांनी निवडूण दिलेल्या नेत्यामध्ये साम्य दाखवतात. असं लक्षात येतंय की या दोन्ही राज्यकर्त्यांनी आर्थिक आघाडीवर अनावश्यक प्रयोग केलेत. सुलतानने चीनवरुन कागद मागवले आणि त्याच्या नोटांचा वापर सुरु केला. तसाच प्रयोग त्याने तांब्याच्या शिक्क्यांबाबत केला आणि तो शिक्का चलनात आणला. इलियास केनेटीने त्याच्या 'Crowds and Power' या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे, तांब्याच्या शिक्क्याचा भाव चांदीच्या शिक्क्याप्रमाणे करण्यात आला आणि चांदी-सोन्याच्या शिक्क्याच्या ठिकाणी आता तांब्याच्या शिक्क्याचा वापर करावा असा आदेश काढण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे दिल्लीतल्या घराघरांत ताब्याच्या शिक्क्याची टाकसळी सुरु झाली आणि या नव्या चलनाची किंमत घसरली.


या ताब्यांच्या शिक्क्याला आता दगडाचाही भाव मिळेना आणि दिल्लीतील गरीबीने शेवट गाठला. मोदींनीही आपल्या बुद्धीने असाच प्रयोग केला होता. देशातील काळ्या पैशाला अर्थव्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 साली रात्री अशाच प्रकारची घोषणा केली आणि देशाला धक्का दिला. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आता वैध नसल्याची घोषणा त्यांनी केली आणि या नोटा बँकेच्या माध्यमातून बदलता येऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाला अराजकतेत टाकलं, बँकांमध्ये नोटांचा तुटवडा झाला आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लाखो-कोट्यवधी लोकांचे दैनदिन जीवन विस्कळीत झालं. काही काळानंतर आपल्या रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं की नोटबंदीचा प्रयोग हा पूर्णपणे अयशस्वी ठरला. 99.3 टक्के नोटा या बँकिंग सिस्टमध्ये परत आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. त्यामुळे हे तर स्पष्ट झालं की, अर्थव्यवस्थेतून काळा पैसा बाहेर गेलाच नाही. 


मुस्लिम सुलतान मोहम्मद बिन तुघलक आणि भारतीय प्रजासत्ताकला हिंदू राष्ट्रामध्ये रुपांतर करण्याची इच्छा ठेवणारे मोदी यांच्यातील महत्वाचं साधर्म्य पहायचं असेल तर आपल्याला दिल्लीला एका साम्राज्याच्या राजधानीमध्ये रुपांतर करणाऱ्या मोदींच्या भव्य प्रोजेक्टकडे बघावं लागेल. तुघलकने आपला आदेश न मानणाऱ्या नागरिकांना दिल्ली सोडण्याचा आदेश देऊन त्यांना एक प्रकारची शिक्षा दिली होती. तशाच प्रकारे मोदींनी दिल्लीच्या नागरिकांवर 'सेट्रल विस्टा' नावाचा प्रकल्प लादला आहे. दिल्लीला नवीन सरकारी कार्यालयं आणि केंद्रीय सचिवालयाने मढवणाऱ्या या प्रोजेक्टच्या मध्यभागी भव्य संसदेची इमारत असेल. 2019 साली या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली होती आणि जानेवारी 2021 साली याच्या निर्माणाला सुरुवात झाली. जवळपास 100 वर्षापूर्वीची सध्याची संसद ही नव्या गरजांना पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचा प्रचार करत मोदींनी या आपल्या नव्या प्रोजेक्टला योग्य ठरवलं. 


सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आता टीकेचा धनी बनत आहे. प्रश्न असा आहे की खरचं अशा प्रकारच्या प्रोजेक्टची आपल्याला गरज आहे का? विशेषत: अशा वेळी, ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था तळाला पोहोचली आहे आणि जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. साल 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार हा 9.6 टक्क्यांनी आकसला होता. मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टची किंमत 20 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. ज्या देशातील आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला असेल आणि ज्या देशातील 90 टक्के लोकांना आपल्या रोजच्या गरजा भागवता येत नसतील त्या देशासाठी ही रक्कम प्रचंड मोठी आहे. या नव्या परियोजनेचे वास्तुशिल्प हे ब्रिटिशांच्या वेळच्या ल्युटिन्स आणि हर्बर्ट बेकरद्वारे डिझाइन केलेल्या वास्तुशिल्पाशी मेळ खाणार नाही यावरुनही अनेक लोक यासाठीही आक्षेप घेत आहेत. त्यामुळे या परिससराचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट होईल. 


दिल्लीत या क्षणी चोवीस तास प्रेतं जळत आहेत. व्हेंटिलेटर्स, अॅब्युलन्स, रुग्णालयांतील आवश्यक साहित्य, औषधं, पीपीई किट आणि तज्ज्ञांचा अभाव आहे, हजारो लोक यावेळी श्वास घेण्यासाठी धडपडत आहेत कारण ऑक्सिजनची कमतरता आहे. यामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे आणि देश पुन्हा लॉकडाऊनच्या खाईत जाण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त म्हणजे, 'द गार्डियन'ने लिहिल्याप्रमाणे, 'भारत कोविडच्या नर्कात अडकला आहे', तरीही सेंट्रल विस्टाचे काम दिवस-रात्र सुरु आहे. मोदींच्या शाही आदेशामुळे, सेंट्रल विस्टाचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. मानवी जीवाच्या मूल्याचा यापेक्षा जास्त काही उपहास असू शकतो का? 


(टीप : लेखकाचे मत हे वैयक्तिक आहे)
अनुवाद : अभिजीत जाधव