भारतीय संघ गेल्या अनेक वर्षापासून 'ज्या' खेळाडूच्या शोधात होता तो बहुदा टीम इंडियाला सापडला आहे. पदार्पणातच जयंतनं आपली चुणूक दाखवून दिली. विशाखापट्टणमच्या कसोटीत भारताला गरज असताना आणि अगदी मोक्याच्या क्षणी केलेल्या धावा आणि घेतलेल्या 4 विकेट ही कामगिरी फारच बोलकी होती.
खरं तर संघात गोलंदाज म्हणून जयंतची निवड झाली होती. पण आपण चांगली फलंदाजी करु शकतो हे त्यानं विशाखापट्टणममध्येच दाखवून दिलं. त्यानंतर मोहाली कसोटीत अर्धशतक आणि तिसऱ्याच कसोटीत म्हणजेच मुंबईच्या वानखेडेवर त्यानं थेट शतकच ठोकलं. यावरुन त्याच्या फलंदाजीतील कौशल्यही दिसून आलं. फलंदाजीचं उत्कृष्ट तंत्र त्याच्याजवळ असून खेळपट्टीवर उभं राहण्याची क्षमताही आहे. करुण नायर, अश्विन, पार्थिव पटेल आणि जाडेजा बाद झाल्यानंतर हा पठ्ठ्या कर्णधाराला द्विशतक ठोकण्यासाठी साथ देतो. ही साथ देता-देता स्वत: शतकाजवळ पोहचतो. एवढंच नाहीतर थेट शतकही ठोकतो.
जयंत यादव एक चांगला क्रिकेटर आहे. अशी टिप्पणी खुद्द राहुल द्रविडनं केल्यानंतर निवड समितीचंही त्याच्याकडे लक्ष गेलं. त्यानंतर मिळालेल्या संधीचं त्यांनं 'सोनंच' केलं. मुंबई कसोटीआधी खुद्द कर्णधार विराट कोहलीनं जयंत यादवचं कौतुक केलं होतं. 'जयंत हा आम्हाला सापडलेला परिपूर्ण खेळाडू आहे.' विराटची ही प्रतिक्रिया बोलकी होती. कारण की, विराटसारख्या बड्या खेडाळूनं त्याच्या पाठीवर मारलेली ही कौतुकाची थाप फारच मोठी गोष्ट आहे. विराटनं दाखवलेला आत्मविश्वास जयंतनं मुंबईत खराही करुन दाखवला.
अवघ्या तीन कसोटीतच जयंतनं आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली. त्यामुळेच हा खेळाडू दिवसेंदिवस जास्तच चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.
चांगला गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज संघासाठी नेहमीच चांगली कामिगिरी करण्याचे प्रयत्न करतो. त्यामुळे भविष्यात जयंतकडे टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहिलं गेल्यास आश्चर्य वाटू नये. महेंद्रसिंह धोनीनं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराटकडं टीमची धुरा सोपविण्यात आली. तर इंग्लंड मालिकेसाठी अंजिक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण संपू्र्ण मालिकेत रहाणेला चांगली कामगिरी करता आली नाही. तर दुखापतीमुळे त्याला मालिकेतून बाहेर जावं लागलं आहे. अशावेळी जयंतनं केलेली ही कामगिरी बरंच काही सांगून जाते.
फलंदाजी करताना हवं असलेलं टेम्परामेंट जयंतकडे आहे. गोलंदाजीत कोणताही ढिसाळपणा त्याच्याकडे नाही. सध्या अश्विन संघातील नंबर 1चा गोलंदाज असतानाही जयंतनं गोलंदाजीत केलेल्या कामगिरीनंही त्यानं आपलं लक्ष वेधून घेतलं आहे. चेंडू वळवण्याची हातोटी जयंतकडे आहे. विशाखापट्टणमच्या कसोटीत जयंतनं बेन स्टोकचा उडवलेला त्रिफळा त्याच्याही कायम लक्षात राहिल. संघाला गरज असताना विकेट काढून देणं आणि धावा करणं ज्या खेळाडूला जमतं तो नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडू असतो आणि असेच उत्कृष्ट खेळाडू हे कर्णधारपदाचे दावेदार असतात.
टीम इंडियाचा कर्णधार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. भारताच्या जवळजवळ 125 कोटी लोकाचं दडपण तुमच्यावर असतं. याआधी सर्वसाधारणपणे सीनियर खेळाडूंना कर्णधारपदाची धुरा सोपावणं अशी प्रथा काही वर्षांपूर्वी सुरु होती. पण महेंद्रसिंह धोनी संघात आल्यानंतर त्यानं ही समीकरणं बदलून टाकली. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यानं कर्णधारपदासाठी आपली दावेदारी सिद्ध केली. त्यावेळी संघात सेहवाग, युवराज, गंभीर यांच्यासारख्या सीनियर खेळाडूंना मागे टाकून फक्त आपल्या कामगिरीच्या जोरावर धोनीनं भारतीय संघाचं कर्णधारपद मिळवलं होतं. त्यानंतर तीनही फॉर्मेटमध्ये त्याने कर्णधार म्हणून जगभरात छाप पाडली. त्यानंतर संघात आलेल्या विराटनंही आपल्या कामगिरीच्या जोरावरच कसोटी संघाचं कर्णधारपद पटकावलं. त्यामुळे भविष्यात विराट कोहलीनंतर कोण? असा जेव्हा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी आर अश्विन आणि जयंत यादव या दोन नावांचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो. अश्विन सध्या जगातील क्रमांक 1चा गोलंदाज आहे. आजवरचे जवळजवळ सर्व विक्रम तो मोडत आहे. त्यामुळे तो कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार ठरु शकतो. पण त्याचं आणि जयंतचं वय लक्षात घेता जयंतकडे कर्णधार होण्याची मोठी संधी आहे. पण त्यासाठी त्याला अश्विनसारखी कायमच उत्कृष्ट कामगिरी करणं अपरिहार्य आहे.
सध्या भारताकडे विराट कोहलीसारखा सक्षम कर्णधार आहे. पण भविष्याचा विचार केल्यास जयंत हा उत्तम ऑप्शन ठरु शकतो. जयंत उत्तरोत्तर अशीच कामगिरी करावी अशीच क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.
गुड लक जयंत!!!
संबंधित ब्लॉग: