मुंबई : विद्यार्थ्यांनी झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदला वृत्तानुसार मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी राज्यपाल बैस यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयाला वाचा फोडली आहे . त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागाला सूचना केली आहे की बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलेल्या असून रात्री उशिरा झोपण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे . रात्री उशिरा झोपण्याच्या संस्कृती मुळे शाळांची वेळ सकाळची असणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु लागलेले आहे .
या पार्श्वभूमीवर झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा या विद्यार्थीकेंद्री असाव्यात अशी सूचना त्यांनी केलेली आहे . राज्यपालांच्या सूचनेचा आदर करत शाळांच्या वेळा बदलाव्यात आणि कुठल्याही परिस्थितीत पूर्वप्राथमिक -माध्यमिक वर्गांची शाळा 9 च्या आत नकोच असे धोरण अंमलात आणावे . अलीकडच्या काळात शाळा 2 शिफ्टमध्ये भरवल्या जात असल्याने अगदी केजीचे , प्राथमिकचे वर्ग देखील 7 वाजता सुरु होतात . हा एक प्रकारे चिंमुरड्या मुलामुलींवर अन्यायच म्हणावा लागेल . शहरांमध्ये अनेक विद्यार्थी हे 5-10 किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत स्कुलबसने जात असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ३० मिनिटे ते एकतास आधी घरातून बाहेर पडावे लागते . याचाच अर्थ त्यांना किमान 5.30 ते 6 च्या दरम्यान झोपेतून उठणे आवश्यक आहे .
आजकाल शहरात झोपण्याची वेळ हि रात्री 11 नंतरचीच असल्याने मुलांची झोप पूर्ण होत नाही . सकाळी उठायला उशीर होत असल्याने बरेच विद्यार्थी हे प्रातर्विधी न आटोपताच तर काही स्नान न करताच शाळेत जातात . शाळा सकाळची असल्याने 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांच्या मम्मी पोळी -भाजी असा डबा न देता स्नॅक्स डब्यात देतात . हे सर्व प्रकार मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत . अपुरी झोप , अपुरे पोषण यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा दीर्घकालीन दुष्परिणाम होताना दिसत आहेत . बरे ! लहान मुलांच्या शाळा सकाळी तर माध्यमिक ,उच्चमाध्यमिक कॉलेजेस दुपारी असा उलटे वेळापत्रक असते .
यासर्व पार्श्वभूमीवर शारीरिक स्वास्थ्य सर्वात महत्वाचे असते याचा विचार करून किमान केजी आणि प्राथमिक शाळांची वेळ हि संपूर्ण राज्यात सकाळी 9 वाजताची करणे अनिवार्य असायला हवे . तसा नियमच राज्य सरकारने
करायला हवा . शाळा 2 शिफ्ट मध्ये असल्या तरी केजी -प्राथमिकची वेळ 9 वाजताच्या आत असूच नये असा नियम करावा . वर्तमानात मुलांमध्ये व्यायामाचा अभाव आहे आणि दुसरीकडे लवकरच्या शाळेमुळे आरोग्याची होणारी ससेहोलपट यामुळे सुदृढ भारताच्या उद्दिष्टावरच घाला घातला जात आहे .
अनेक पालक , शिक्षणतज्ञ , सामाजिक संस्थांनी शाळा खूप सकाळी नकोत अशा प्रकारची मागणी शिक्षण विभागाकडे केलेली आहे . पण अशा सूचनांकडे कानाडोळा करण्याची संस्कृती शिक्षण विभागाची असलयाने त्याचा विचार केला गेलेला दिसत नाही . मा . राज्यपाल महोदयास राज्यातील सर्व पालकांच्या वतीने विनम्र निवेदन आहे की त्यांनी केवळ सूचना देण्यावर न थांबता या सूचनेची अंमलबजावणी होते की नाही यावर देखील लक्ष ठेवावे आणि आगामी शैक्षणिक वर्षांपासून बालवाडी ते 8 वी पर्यंतच्या वर्गाच्या शाळा या सकाळी 9 वाजेच्या आत नको या धोरणाची अंमलबजावणी राज्य सरकारला भाग पाडावे .
वर्तमानात अनेक शाळा या 2 सत्रात भरवल्या जात असल्याने सकाळच्या सत्राची वेळ बदलताना शाळा प्रशासनाला कसरत करावी लागणार ही बाब रास्त असली तरी सकाळी 7 वाजता शाळेची वेळ असल्याने लहान
मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला नजरेआड करणे उचित ठरणार नाही . खरे तर बालवाडी , 5 वी च्या वर्गांची शाळा रोज 5/6 ला ठेवणे खरेच गरजेचे आहे का ? याचा देखील विचार करून पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक वर्गाच्या शाळेची वेळ कमी करून २ सत्रात शाळा चालवण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर मात करता येऊ शकेल .
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी देखील शाळेच्या वेळा सकाळी नको अशी मागणी करताना आपली मुले टीव्ही , मोबाईल , संगणकावरील खेळ अशा गोष्टींमुळे उशिरापर्यत जागणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी . शाळा उशिरा आहे या कारणास्तव मुले जर 12/1 वाजेपर्यत इलेक्ट्रॉनिक पडद्यासमोर व्यस्त राहणार असतील तर शाळेच्या वेळा बदलून काहीच फायदा होणार नाही .