तो त्याच्या विषाणूसमूहात जड म्हणून ओळखला जातो. विषाणू असूनही हवेत, धुळीकणात तरंगण्याचेही कौशल्य त्याच्यात नाही.मह्याउलट आपल्या जडत्वामुळे तो म्हणे ज्या पुष्ठभागावर पडून असतो तिथे त्याचा विखारी जीव बारा तासांपर्यंत तग धरतो. ह्या बारा तासात त्याला, ज्याचे बारा वाजवायचे असतात त्याच्या शरीरात सहजपणे प्रवेश करायची संधी मिळाली तर तो वळवळत त्या शरीराच्या फुफ्फुसाचे बारा वाजवणे सुरू करतो. ह्याचाच अर्थ प्रत्येक शरीर हे त्याचे घर असून त्याच्या उंबऱ्यावर हे सद्यभयकारक सन्माननीय कोरोनामहोदय भयघंटा वाजवत,' येउका', 'येउका ', विचारत उभे आहेत. हे वास्तव आहे. काही नतद्रष्ट मात्र ह्या वास्तवावर मुर्खपणाने वागून स्वतः सोबत अनेक निष्पाप मंडळींना कोरोनाबाधा व्हावी असे वागत आहेत. शेवटी हा आपला देश आहे. इथे घर का भेदी असणाऱ्यांचीच संख्या कोरोनापेक्षाही जास्त आहे. जिथे, इथे थुंकू नका म्हंटलेले असते तिथेच सर्वात जास्त थुंकण्याची परंपरा सदैव वृद्धिंगत होणारी आहे.


गलथान, बेजबाबदारपणे जगत स्वतः मरावे, आपल्यामुळे खुप जणही मरावे असे वाटणे म्हणजे "मी मरेन पण तुला रंडकी करेन" ह्या विस्मृतीत गेलेल्या जुन्या म्हणीची प्रचिती येण्यासारखेच आहे. आपण भारतीय आहोत. ईश्वरेच्छा बलियासी ही आपली श्रद्धा आहे. कोरोनाचा उद्भव ही ईश्वरेच्छा जरी मानली तरी ईश्वरानेच आपली भौतिक, वैज्ञानिक प्रगती घडवली असल्याने आता त्या प्रगतीद्वारे साध्य झालेली विलगास्त्रे वापरणे संयुक्तिक नाही काय. ह्यासंदर्भात एकादशी ह्या तिथीच्या उत्पत्तीची पौराणिक कथा उलट्या अर्थाने आठवली तर हे आठवेल की ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वराच्या एकत्रित श्वासोश्वासातून एकादशी ही आदी शक्ती निर्माण झाली होती. आपले शरीरही देवांश असल्याने, हे त्रिरुप त्यात अप्रत्यक्षपणे वास करीत असल्याने प्रत्येकाने एकांतात साधना करणे औचित्याचे नाही काय?

तसे गेल्या दोन दशकांपासून आपण अति चंगळवादाला चटावलेलो आहोतच. मौज, मजा आणि मस्ती ह्यातच गुंगून गेलो आहोत. गेल्या दोन वर्षांपासून हाताहातातील अँड्रॉइड फोनमुळे जगाचीही गरज आपल्याला राहिली नाहीये. तेव्हा ह्याच फोनचा उपयोग घेऊन जगापासून विवक्षित काळ अलिप्त राहायला काहीही हरकत नसावी असे वाटते. कोरोनामुळे किती मेले हे लक्षात न ठेवता, किती वाचले, कसे वाचले, कोणत्या काळजीने वाचले ह्यांचा शोध घेत जरी हा काळ आपण ढकलत राहिलो तरी पुढे नेहमीसारखे जगायला मोकळे होणार आहोतच. असह्य अश्या ह्या भयकाळात आपल्या सुरक्षित जगण्यासाठी स्वतःच्या घराबाहेर काम करत असणाऱ्या सर्व यंत्रणांच्या सुरक्षिततेसाठी विषाणूहारी शक्ती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहो हे ईश्वराला मागायला काय हरकत आहे?

संयम बाळगणे आणि "समय बलवान होता है" ह्यावर विश्वास ठेवणे हे आपल्या हातातच आहे. तेव्हा हा विश्वास शतगुणीत करून, प्रत्येक घटिका व प्रत्येक पळ पुढे पुढे ढकलण्याचा हा समय ह्या स्वतः वरील विश्वासानेच घालवायचा आहे. कोरोनाचे कोण लक्ष्य असेल हे कोणीही सांगू शकणार नाही. ते लक्ष्य आपण व्हायचे नाही हे मात्र ठामपणे ठरवायचेच आहे. उंबऱ्यावरच्या कोरोनाला उंबऱ्यावरूनच हाकलण्याचा निर्धार प्रत्येकाने केला तरच येणाऱ्या नवीन वर्षात पुढे दररोज प्रत्येक उंबऱ्यावर आनंदाने रांगोळ्या घातलेल्या दिसतील ही खात्री आहे.

रवींद्र तांबोळी यांचे अन्य ब्लॉग 

BLOG | का घाबरशी, कोरोनाशी!