मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि राजस्थान निवडणूक जिंकल्यावर 2019 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उत्साही दिसत होती... शेजारच्या राज्यात मिळालेल्या विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातपण होईल, अशी स्वप्न राज्यातील काँग्रेसला पडू लागली.. मरगळलेली काँग्रेसअंतर्गत वाद , गमावलेला आत्मविश्वास सोडून कामाला लागली.. आता किमान मोदी आणि शाह यांना टक्कर द्यायला काँग्रेस तयार आहे ,असं चित्र उभे राहिले..
पण राज्यात काय काय झालं?
अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नारायण राणे पक्ष सोडून गेले.. आणि त्यानंतर झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांना विजय प्राप्त झाला.. अशोक चव्हाण म्हणाले राज्यात परतीचे वारे सुरू झाले, घोषणाही केली.. जनसंघर्ष यात्रेचा मुख्य चेहरापण अशोक चव्हाण राहिले त्यामुळे 2019 लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीचा काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण करणार हे स्पष्ट झालं..
जनसंघर्ष यात्रेत पक्षातील नेत्यांचा दुरावा दूर झाला, महाराष्ट्र पिंजून काढला.. कार्यकर्ते कामाला लागले .. काँग्रेस रिस्टार्ट झाली, असं चित्र तयार करण्यात आलं .. नोव्हेंबर 2018 मध्ये अशोक चव्हाण यांनी सर्व नेत्यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिला.. राज्यातील आघाडीची प्रक्रिया सुरू केली.. इथे युतीत भांडण सुरू असताना काँग्रेस राष्ट्रवादी मात्र परिवर्तन आणि जनसंघर्ष यात्रा काढत एकत्र असल्याचं भासवत होते.. आघाडीच्या बैठका होत होत्या, मित्रपक्ष येत होते.. पण हे नुसतं आभासी चित्रच होतं, हे आता मार्च महिन्यात स्पष्ट झालं..
उमेदवार निवड
निवडणुकीचा महत्वाचा टप्पा म्हणजे उमेदवार घोषित करायचे इथेच काँग्रेसच्या गाडीचा टायर पंक्चर झाला..
राज्यात विधान सभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली तर राज्यात नेतृत्वाची संधी मिळेल हे स्वप्न पाहत अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीकडे पाठ फिरवली.. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पण आपल्या बायकोचं नाव पुढे करून कामाला सुरुवात केली.. तर राजीव सातव ह्यांनी गुजरात प्रभारी म्हणून जबाबदारी असल्याने लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला! राज्यातील दोन सिटिंग खासदार निवडणूक लढवण्याचा मनस्थितीत नाही हा संदेश आधी गेला..
जागा आहेत पण उमेदवार कुठे?
राज्यात राष्ट्रवादीने 24-24 जागा मागितल्या पण 26-22चा जुनाच फॉर्म्युला आघाडीत ठेवण्यात यश काँग्रेसला आलं तरी त्याचा कवडीचा फायदा काँग्रेसला करून घेता आला नाही..
अनेक महत्त्वाच्या ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवारच नव्हते.. भाजप आणि शिवसेनेच्या अनेक खासदारांविरोधात anti incumbency आहे.. ग्रामीण भागात शेतकरी दुष्काळ, कर्जमाफी, बेरोजगारी, नोटबंदीचा फटका बसल्यामुळे लोक त्रस्त असताना काँग्रेसने चांगले उमेदवार शोधणं, उमेदवार नसतील तर दुसऱ्या पक्षातील नाराज गटावर लक्ष ठेवणे अपेक्षित होतं..
झालं काय?
पुणे, सांगली, जालना, औरंगाबाद, चंद्रपूर रामटेक ,उत्तर मुंबई , रत्नागिरी सिधुदुर्ग अशा अनेक मोक्याच्या आणि महत्वाच्या जागी काँग्रेसकडे उमेदवार नव्हते..
उमेदवार नाही तर बाहेरच्या पक्षातून त्यांना आणण्याचे विशेष प्रयत्न देखील झाले नाही..
जालनामधून नाराज अर्जुन खोतकर यांची दिल्लीवारी झाली, मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठका झाल्या.. पण त्यांना पक्षात आणाव्या म्हणून जितकी मेहनत काँग्रेसने करायला हवी होती त्याहून जास्त मेहनत खोतकर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतली..
पुण्यात संजय काकडे यांची फक्त औपचारिकता बाकी होती..पण स्थानिक पक्षातील लोकांनीच काड्या करत दिल्लीत काकडेंविरोधात फिल्डिंग लावली.. आणि मुख्यमंत्र्यांनी इथेही काकडे यांचा काँग्रेस प्रवेश लांबवला..
दक्षिण नगरसारखी जागा ज्या जागेवर डॉ. सुजय विखे पाटील काम करत होते ती जागा राष्ट्रवादीवर दबाव टाकून आपल्याकडे खेचून घेण्यात अशोक चव्हाण सपशेल अयशस्वी झाले... आणि मुख्यमंत्र्यांनी मोठा मासा गळाला लावला!
एकीकडे काँग्रेस म्हणत होती कोण जागा जिंकेल ते महत्वाचे प्रत्येक जागेवर लढाई आहे आणि काँग्रेसच्या ज्या जागांवर अनुकूल स्थिती आहे तिथेच काँग्रेसने स्वतःहून भरपेट माती खाल्ली..
दिल्लीत उमेदवार ठरवण्याच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काँग्रेस लढत असलेल्या जागांवर उमेदवारांची नीट यादी जाणं अपेक्षित होतं.. राज्यातून गेलेल्या यादीवर वेणूगोपाल आणि राहुल गांधी नाखूष असल्याची चर्चा होती.. आणि म्हणूनच राज्यातील प्रमुख 10-12 नेत्यांना दिल्लीत बोलवून त्यांच्याशी पक्षश्रेष्ठींनी one on one चर्चा केली..
दिलेल्या उमेदवारीचा घोळ
चंद्रपूर हे त्याचं उत्तम उदाहरण .. शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये येत होते पण प्रक्रिया पुढे जात नव्हती...इथे तिकीट मिळेल या आशेवर बाळू धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, शिवसेना पक्ष सोडला.. आणि दिल्लीत दुसऱ्याच उमेदवाराचे नाव जाहीर झाले.. सगळीकडे टीका, चर्चा.. हा कोण उमेदवार आहे.. डिपॉझिट जाईल. काँग्रेस काय करते.. काही समजेना.. त्यात अशोक चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप आली. त्यांनी मुकुल वासनिक ह्यांच्यावर बिल फाडत माझंच कोणी ऐकत नाही.. मीच राजीनामा देतो असा सूर लावला..अखेरीस अंतिम क्षणी हे तिकीट जरी बदललं.. तरी ह्या प्रकरणातून अशोक चव्हाण यांच्या शब्दाला दिल्ली दरबारी किती किंमत आहे अशीच चर्चा सुरू झाली..
रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं..
बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप झाला.. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली , अशोक चव्हाण यांना चौकशी करू म्हणत सारवा सारव केली... शेवटी पक्षाने त्यांनाच उमेदवारी कायम ठेवत वादावर पडदा टाकला! याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत किती बसेल हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल..
पण एकीकडे ठिगळ लावावं तर दुसरीकडे फाटतं, अशी काँग्रेसची अवस्था, कारण औरंगाबाद मध्ये अशोक चव्हाण समर्थक अब्दुल सत्तार यांनीच उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंड करत पक्ष सोडला..सोडताना काँग्रेसने माझ्यासारख्या एकमेव मुस्लिम उमेदवाराला न्याय दिला नाही, तर इतरांचं काय अशी टीका केली..
त्यामुळे एकूणच काँग्रेस जिंकण्यासाठी लढते की हरण्यासाठी लढत आहे, असा प्रश्न पडलाय..
काँग्रेस पक्षात नेत्यांना काही विचारलं तर ते शरद पवार आणि दिल्लीकडे बोट दाखवतात... राष्ट्रवादीला विरोध केला तर पवार थेट दिल्लीत राहुल गांधींशी बोलवून आपल्या सोयीने गोष्टी घडवून आणतात. मग राज्यातील नेत्यांनी भूमिका घेऊन उपयोग काय? आणि आम्ही काही निर्णय घेतला, कुणाला उमेदवारीबाबत आश्वासन दिलं तरी दिल्लीत तो निर्णय बदलतो त्यामुळे राज्यातील इतर नेत्यांशी आम्ही वाईटपणा का घ्यायचा, असाही प्रश्न नेते उपस्थित करतात..
मित्रपक्षाचा घोळ
मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या याबाबत तर अशोक चव्हाण एक निर्णय घेऊ शकले नाही.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा द्या, राहुल गांधी यांनी दोन वेळा सांगूनही काँग्रेस अजून निर्णय घेऊ शकली नाही..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वर्धा जागा मागितली होती पण अशोक चव्हाण यांनी सांगली जागा सोडतो सांगून वर्धा जागेवर तिकीट घोषित केले.. तर सांगली नको वर्धा किंवा अकोला द्या असा विरोध इतरांनी केला.. सांगली जागा मित्रपक्षाला जाणार कळल्यावर वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बंड केलं..
एका मित्र पक्षातील नेत्याची मार्मिक टिपण्णी होती ते म्हणाले काँग्रेस पक्ष म्हणजे हिंदू धर्मासारखा आहे..इथे 33 कोटी देव आहेत.. एखादी जागा हवी तर नेमकी कोणाशी बोलावं कळत नाही.. सोमवारी महादेव, मंगळवारी गणपती तसं काँग्रेसमध्ये आहे.. राज्यातील नेत्यांशी बोललं तर दिल्लीतला भरोसा नाही.. दिल्लीत नेमकी कोणाशी बोलावं समजत नाही.. सगळ्यांना मस्का लावत बसा.. जर नेत्यांच्या मनात आलं, जागा मिळाली तर देव पावला असं समजायचं!
अशोक चव्हाण यांच्याविरोधात पक्षात अनेक नेते नाराज आहेत की त्यांनी इतर नेत्याना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही..निवडणुकीच्या कामाचं वाटप करायला हवं होतं... कोणावरही विश्वास ठेवत नाही हा सूर ऐकायला मिळतो..
जनतेत सरकारविरोधी वातावरण तयार करायलाही काँग्रेस अपयशी ठरत आहे... काँग्रेस नेत्यांची रटाळ भाषण सुरू असताना लोक उठून जात असल्याचे चित्र जनसंघर्ष यात्रेत दिसून आलं.. चांगले वक्ते नाहीत, पक्षात शिस्त नाही.. कोणी कुणाचं ऐकत नाही.. सगळ्या नेत्यांची एकमेकांविरोधात कुरघोडीच राजकारण सुरु आहे.. कदाचित आपण विरोधी पक्षात आहोत ,आपल्याला एकमेकांविरोधात नाही तर सरकार विरोधात लढायचं आहे याची जाणीवच अजून काँग्रेसला झाली नाहीये... राम भरोसे आणि जनतेच्या विवेक बुद्धीवर सर्व सोडून काँग्रेस सध्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे!
ता.क. - हा ब्लॉग लिहीत असताना बातमी आली प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडला! प्रतीक पाटील हे माजी केंद्रीय राज्य मंत्री आहेत.. पक्षात प्रतीक पाटील यांचे धाकटे बंधू विशाल पाटील यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं.. निवडणुकीच्या तोंडावर जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊन विश्वजित कदम आणि इतर नेते पाटील कुटुंबियांचे खच्चीकरण करत असल्याचा अविश्वास त्यांच्या मनात आहे.. वसंतदादा पाटील या जुन्या काँग्रेस कुटुंबातील एक व्यक्ती पक्ष सोडते आणि गेले काही दिवस धुमसत असलेला असंतोष ही प्रदेशाध्यक्ष किंवा इतर नेते संपवू शकले नाही हे मोठ अपयश आहे!
काँग्रेसचे अ'शोक' पर्व!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2019 11:44 PM (IST)
मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि राजस्थान निवडणूक जिंकल्यावर 2019 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उत्साही दिसत होती... शेजारच्या राज्यात मिळालेल्या विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातपण होईल, अशी स्वप्न राज्यातील काँग्रेसला पडू लागली..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -