स्वातंत्र्यानंतर सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण यांचे वर्चस्व राहिले. त्यावेळी राजघराणे राजकारणात सक्रीय नव्हते. स्व. यशवंतराव चव्हाण लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अदालत वाड्यावर जाऊन राजमाता सुमित्राराजे भोसले यांचा आशिर्वाद घेत असत. यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांचे मतभेद झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी सुमित्राराजे यांना यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला. राजघराण्याची राजकारणात पहिली एंट्री उदयनराजे यांचे वडील प्रतापसिंहराजे भोसले यांच्या रुपाने झाली होती.


सातारा नगरपालिकेच्या थेट जनतेतून झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1978 मध्ये अभयसिंहराजे भोसले हे पहिल्यांदाच आमदार म्हणून सातारा विधानसभा मतदार संघातून जनता पक्षातून निवडून आले होते. त्यानंतर सलग 40 वर्ष एका निवडणुकीचा अपवाद वगळता अभयसिंहराजे आणि यांचे पुत्र शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1978 ते 1991 या कालखंडात अभयसिंहराजे यांचे एकतर्फी वर्चस्व सातारा विधानसभा मतदार संघावर होते.

1991 मध्ये पहिल्यांदाच रयत विकास आघाडीची स्थापना करुन उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीत पॅनेल उभे करून अभयसिंहराजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले होते. नगरपालिकेच्या राजकाराणात काही काळासाठी हे चुलते-पुतणे एकत्रही आले होते.

1996 मध्ये झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी अपक्ष निवडणूक लढवून आव्हान निर्माण केले होते. उदयनराजेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार प्रतापराव भोसले यांचा पराजय झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा मतदारसंघातून पहिल्यांदाच काँग्रेस ऐवजी शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर हे निवडून आले. या निवडणूकीत खऱ्या अर्थाने उदयनराजेंचा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उदय झाला. त्यांनी एक लाखाहून अधिक मते घेतली. ते जरी लोकसभेच्या तिसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी त्यांची लोकप्रियता वाढली, यात शंका नाही.

त्यानंतर, 1998 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी आग्रहाने अभयसिंहराजे भोसले यांना मैदानात उतरवले. काँग्रेसच्या ताब्यातून गेलेली ही जागा अभयसिंहराजे यांनी मोठ्या फरकाने जिंकून परत मिळवली. हिंदूराव नाईक-निंबाळकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर झालेल्या सातारा मतदार संघातील पोटनिवडणूकीत अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र शिवेंद्रसिहंराजे यांचा पराभव करून भाजपच्या तिकीटावर उदयनराजे निवडून आले. तेव्हापासून या दोन भावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली.

त्यानंतर 1999 च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजे यांनी स्वत:चा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत अभयसिंहराजे समर्थक नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. लेवे खून खटल्यात उदयनराजेंना अटक झाली. खून खटल्यात उदयनराजेंना अडकवले गेले, असा आरोप त्यांनी स्वत:हून केला. त्यामुळे दोन्ही राजेंनमधील संघर्ष विकोपाला गेला. 22 महिने जेल मध्ये राहिल्यानंतर उदयनराजेंसह सर्वच संशयितांची निर्दोष मुक्तता झाली.

त्यानंतर झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी प्रचंड सहानभूती मिळवली. त्यावेळेही थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड झाली. उदयनराजेंच्या आघाडीने नगराध्यपदासह 39 पैकी 36 जागांवर विजय मिळवला. त्यावेळी अभयसिंहराजेंच्या नगर विकास आघाडीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

2001 मध्ये उदयनराजेंचा झंजावात सातारकरांनी अनुभवला. 2002 मध्ये झालेल्या सातारा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे आमने सामने आले. उदयनराजेंच्या लाटेला रोखण्यात काही प्रमाणात शिवेंद्रसिंहराजेंना यश मिळाले.

सातारा पंचायत समितीची सत्ता त्यांनी काठावर राखली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र 9 पैकी 6 जागांवर उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने विजय मिळवला. या दरम्यान अभयसिंहराजे आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता निर्माण झाली. त्यामुळे अभयसिंह यांनी ‘सन अन्ड सैन्य’  काँग्रेसमध्ये पाठवली होती. अजितदादा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला काही जागा बहुमतासाठी कमी पडल्या होत्या. अजितदादांनी उदयनराजेंना एक सभापतीपद देऊन राष्ट्रवादीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवला. पुढे दोन वर्षातच अजितदादाचे आणि उदयनराजेंचे बिनसले. (यांच्या वादाला औंधच्या राणीचा मोठा इतिहास आहे.) दरम्यानच्या काळात अभयसिंहराजे यांचे अकाली निधन झाले.

2004 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांनी शिवेंद्रसिंहराजेंना आपल्यासोबत घेतले आणि सातारा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 10 हजाराचे लीड मिळवून दिले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. त्यावेळी अभयसिंहराजे यांच्या निधनामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना सातारच्या जनतेची सहानुभूती मिळाली.

2006 मध्ये झालेल्या सातारा पालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागला. शिवेंद्रसिंहराजेंच्या आघाडीला सर्वाधिक 19 जागा मिळाल्या तर उदयनराजेंच्या आघाडीला 18 जागा मिळाल्या. त्यावेळी या दोघांचे चुलते शिवाजीराजे भोसले यांनी मध्यस्थी करत राजघराण्यातील एकोप्यासाठी दोघांनाही अदालत वाड्यातून एकत्र आणले. (राजघराण्याला एकत्र आणण्याची राजकीय आयडिया ही उदयनराजेंचीच होती. हे गुपीत नंतर बाहेर आले.)

सलग दहा वर्ष दोघांनी एकोप्याने संसार केला. त्या दरम्यान झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या दोन निवडणुकीमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंनी मोठ्या फरकाने जिंकली. दोन्ही राजेंच्या मनोमिलनापुढे कोणाचाच टिकाव लागला नाही. (हे स्वत: उदयनराजेंनी पक्ष गेला खड्ड्यात, असे विजयाचा गुलाल अंगावर घेत सांगितले).

2016 मध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय सरकारने घेतला. दहा वर्ष अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात असलेले मनोमिलन तोडण्याची बुद्धी उदयनराजेंना झाली. त्यांनी नगरपालिकेत मोठा विजय मिळवला. नगराध्यक्षांसह 22 जागा त्यांच्या आघाडीच्या निवडून आल्या. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांना पराभव पत्करावा लागला आणि हा पराभव शिवेंद्रसिंहराजेंच्या वर्मी लागला. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली शांत संयमी प्रतिमा बदलून  उयनराजेंवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीय डावपेच आखण्यास सुरूवात केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली देह बोली तर बदललीच, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढीही वाढवून आपली प्रतिमा आक्रमक केली. उदयराजेंना जशास तसे उत्तर देण्यासाठी मी तयार असल्याचेच त्यांनी कृतीतून दाखवले. त्यामुळेच त्यानंतर टोलनाक्यावरुन सुरुची राड्यासारखे प्रकरण घडले.

राजघराण्याचा थेट वंशज असल्यामुळे आपण कसेही वागलो तरी जनता आपल्या वागण्याचे समर्थनच करते, हे गुपीत उदयनराजेंना फार लवकर समजले. त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा उचलला. आक्रमक वक्तव्य करणे, कॉलर उडवणे असे प्रकार करून आपली वेगळी स्टाईल समाजात रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मद्यप्राशन करुन गाडीचा टेप मोठा लावून भर रस्त्यात डान्स करणे, भेटलेल्या लोकांना मिठ्या मारत, पप्या घेऊन त्यांच्या मनात जागा निर्माण करणे हे उदयनराजेंचे खास वैशिष्ट्य आहे.

उदयनराजेंच्या या वागण्याला राजेघराणे म्हणून जनमान्यता आहे. राजेंनी असं नाही वागायचं तर कुणी वागायचं ??? असं उलट सातारची जनताच बाहेरच्या लोकांना प्रतीप्रश्न करत असते.

जेम्स बॉन्डच्या 007 या क्रमांकालाही त्यासाठी त्यांनी आपलेसे केले. उदयनराजेंच्या सगळ्या गाड्यांवर 007 हा क्रमांक असतो. उदयनराजेंच्या धरतीवरच शिवेंद्रसिंहराजेंनीही आपले ब्रॅन्डींग केले. शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून आपणही राजघराण्याचे वंशज आहोत हे जनसामान्यांमध्ये शिवेंद्रसिंहराजेंनी ठसवले. उदयनराजेंप्रमाणेच लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न सुरु केला. लोकांच्या खांद्यावर हात टाकणे, लोकांसोबत फोटो सेशनसाठी वेळ देणे यासह अनेक क्लृप्त्या त्यांनी वापरल्या. त्यातून त्यांना युवकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत गेला.

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन उदनराजेंनी वाढदिवसाच्या निमित्ताने शिवेंद्रसिंहराजेंकडे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला, मात्र शिवेंद्रसिंहराजेंनी हा मैत्रीचा प्रस्ताव धुडकावून लावला. सुरुची राड्यानंतर दोन्ही राजेंमधला संघर्ष काही काळासाठी थंडावला होता, मात्र काही दिवसांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या कारभारावरून शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर तोफ डागली. त्याला उदयनराजेंनीही जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर पुन्हा शिवेंद्रसिंहराजेंनीही उदयनराजेंना प्रतिउत्तर देऊन आगीत आणखी तेल ओतले. उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना खलनायक, खुडूक कोंबडी अशा उपमा दिल्या. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीमागून राजकारण खेऴणाऱ्या रामराजेंनाही बांडगूळ म्हणून उदनयराजेंनी हिणवले. शिवेंद्रसिंहराजें यांनीही उदयनराजेंना मी पणाची बाधा झाली आहे. मी खलनायक असेन तर उदयनराजे प्रेम चोपडा आहेत, अशा शब्दात त्यांना उत्तर दिले.

उदनयनराजे नेहमी शिवेंद्रसिंहराजेंना समोरासमोर येण्याची भाषा करतात. त्याचाही समाचार शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. सुरुचीवर राडा झाला त्यावेळी तुम्ही समोर आला होतात, त्यावेळी तेथून तुम्ही पळून का गेलात. अशी विचारणा करत उदयनराजेंवर वार केले.

एकूणच दोन्ही राजेंमधला संघर्ष विकोपाला गेला आहे. लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. उदयनराजे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. सगळ्या नाड्या पवार साहेबांच्या हातात आहेत. राजघराण्यातील संघर्ष मिटवून दोन्ही राजांना आता पवारच एकत्र आणू शकतात. पवार दोन्ही राजांना एकत्र आणणार का? की, दोघांमधील भांडणामध्ये आणखी तेल ओतून हा संघर्ष चिघळवणार यावरच दोन्ही राजांचे पुढचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

दोन्ही राजांच्या संघर्षामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या तत्त्वाने आणि निष्ठेने रयतसेवा केली ती कोणत्याच वाड्यातून दिसत नाही. दुर्दैवाने हे दोन्ही राजे खरेच शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का??? असा प्रश्न जनतेला नक्कीच पडतो. आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने राजघराण्याचा निवडणुकीसाठी वापर केला. हाच फॉर्म्युला आता भाजपवालेही वापरत आहेत. भाजपने आपले जाळे उदयनराजेंच्या दिशेने फेकले आहे. मात्र उदयनराजे हुशार आहेत. ते भाजपच्या जाळ्यात सहज अडकतील, असे चित्र सध्यातरी दिसत नाही.