कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे 24 तास धावणारा देश क्षणात थांबलाय. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. सरकारपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण घरात बसा असं सांगतायेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना आता पोलिसांचा मार खावा लागतोय. एवढं करुनही नागरिक घराबाहेर पडत असेल तर आर्मी आणण्याचाही इशारा देण्यात येतोय. परिणामी संपूर्ण देशात एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरलंय. मात्र, यात एका माणसाला कोरोनाची भीती सतावत नाहीये. तो म्हणजे सर्वसामान्य. तो घाबरलाय हे खरंय, पण त्याच्या मनात निर्माण झालेली भीती ही कोरनामुळे तयार झालेली नाहीय.


आजही सरकारी कचेऱ्या, खासगी कंपन्या, विविध महामंडळे, उद्योगधंदे अशा क्षेत्रांमध्ये जे संघटित आहेत. ते आपल्या हक्कांसाठी लढून काही लाभ पदरात पाडून घेतात. या संघटित कामगारांचे, भारतीय कामगारांच्या संख्येत प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आजच्या घडीला 90 टक्केहून अधिक कामगार असंघटीत आहे. त्यांची संख्या 70 कोटींपेक्षा अधिक आहे. यात रस्त्यावर दुकान लावणारे, घरातून व्यवसाय करणारे, प्लंबर, चालक, गिरणी कामगार, शेतमजूर, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरावेचक, बिडी कामगार, चर्मकार, धोबी, भूमिहीन मजूर, ताडी गोळा करणारे, विटभट्टी आणि खाणीत काम करणारे, रेल्वे स्थानकावरील विक्रेत, घरोघरी जाऊन साफसफाई, धुणीभांडी करणारे, वेठबिगार, अशांसह कित्येकांचा समावेश होतो.


या असंघटीत कामगारांपैकी कित्येक असे आहेत, ज्यांना आज काम नाही केलं तर त्यांच पोट भरणार नाही. आता संपूर्ण देशच लॉकडाऊन केल्यामुळे या लोकांचे जास्त हाल झालेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी 1.70 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. प्रत्येकाच्या जनधन खात्यात थेट पैसे पाठवले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, यातील किती जणांचे जनधन खातं असेल? आज शहरातील गल्लीबोळात मोफत जेवण सुरू केलंय. पण, हा उत्साह संपूर्ण लॉक डाऊनपर्यंत असेल का? परदेशात अडकलेले चारदोन विद्यार्थी किंवा नागरिकांना आणायला राजकीय नेत्यांच्या हालचाली किती पटकन होताना दिसतात. अगदी सरकारी खर्चाने त्यांना मायदेशात आणलं जातं. त्यांना मदत करू नये असं माझं म्हणणं नाही. तेही आपल्या देशाचेच नागरिकच आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने दोनतीनशे किलोमीटर पायी निघाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक कंटेनर आणि दुधाच्या टँकरमधून धोकादायक प्रवास करताना दिसत आहेत.


खरंतर सर्वसामान्य माणसांना कोरोनाची भीती नाहीय. कारण, कोरोनापेक्षाही भयंकार जगण्यासाठी त्यांचा दरोरोज संघर्ष सुरुय. आज देशातील सर्वात जास्त लोक टीबी, न्युमोनिया, कुपोषण, भूकबळीने मरतायेत. का? तर उपचारासाठी यांच्याकडे पैसे नसतात. दर, 14 व्या मिनिटाला त्यांच्या मुलीवर, आईवर, बहिणीवर, बायकोवर बलात्कार होतात. न्यायासाठी आयुष्य जाते पण मिळत काहीचं नाही. दोनशे रुपये पासाला नसतात म्हणून ज्याची मुलगी आत्महत्या करते. बैकेचं हप्ते थकल्याने जो गळफास लावून घेतो. जो गटाराज्या मेनहोलमध्ये विषारी वायूचा शिकार होतो. माझा प्रामाणिक प्रश्न आहे. हे देशाचे नागरिक नाहीत का? यांच्यासाठी तुमच्या ट्विटर वर 280 शब्द लिहू नाही शकत? सर्वसामान्य लोकांच्या मतदानावर तुम्ही निवडून येता ना? कारण, ज्या चारदोन लोकांसाठी तुम्ही सरकारी यंत्रणा हलवता ना ती तुम्हाला किती मतदान करते?


पोलिसांना तर मोकळी सूट मिळल्यासारखच करत आहेत. काहीही विचारपूस न करता दिसेल त्याला मारत सुटलेत. अगदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची बातमी आहे. दुसरं असं की शेतकरी आता शेतीमाल शहरात घेऊन येत नाही. कारण, कोणताचं वाहनचालक तयार होत नाही. ते म्हणाले की पोलीस विचारत नाही आधी दोन काठ्या टाकतात. अशाने शहरी माणूस किती दिवस टिकेल? सर्वच असे करतात असं मला म्हणायचं नाहीये. विनाकारण, बाहेर पडणाऱ्याला तुम्ही नक्कीच शिक्षा करा. पण, चोर सोडून सन्याशाला फाशी देऊ नका. जे नागरिक विदेशातून भारतात आले. त्यातीलच काहीजण सहकार्य करताना दिसत नाहीये. मग प्रश्न पडतो राजकीय नेत्यांच्या बोलण्यात असलेला सर्वसामान्य माणूस कुठंय? 10×10 च्या खोलीत तो महिनाभर कसं राहणार? रोज काम केल्याशिवाय पोट न भरणारा तो कसा जगणार? खरंतर त्याला कोरोनाची भीती नाहीये. त्याचा रोजच जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.