एक चान्स देना भगवंत माननुं...
एक चान्स देना केजरीवालनुं....


पंजाबच्या रस्त्यांवर फिरताना हे गाणं सातत्यानं कानावर पडायचं. सबको मौका दे चुके, किसीने कुछ नही किया, अब हमे बदलाव चाहिए... हे मतदारांच्या बोलण्यातून सातत्यानं दिसायचं. आजच्या निकालांची आकडेवारी बघितल्यावर पंजाबी मतदारांच्या भावना किती तीव्र होत्या होत्या हे दिसून आलं. पगडी नसलेल्या नेत्यांना म्हणजे शिख नसलेल्या नेत्यांना पंजाबनं कधीच विजयी केलं नाही. बसपाचे संस्थापक कांशिराम हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अशावेळी केजरीवाल यांना हा जनाधार मिळणं, भलेही भगवंत मान हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते. मात्र हा विजय पगडी नसलेल्या केजरीवाल यांचा आहे, हे नाकारून चालणार नाही. हा ऐतिहासिक विजय त्यामुळेच महत्वाचा ठरतोय. दुसरीकडे आपलं सूर्यप्रकाशाएवढं स्पष्ट बहुमत देतानाच दिग्गजांना पंजाबी मतदारांनी सपशेल नाकारलं. जे मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. त्या सगळ्यांना एका झटक्यात पंजाबी मतदारानं जमिनीवर आपटलंय.

हमारे पचास साल सड गए, कुछ नहीं हुआ, और पाच साल बर्बाद हो गए तोे चलेगा लेकीन बदलाव चाहिएं. एवढी स्पष्ट मतं लोक मांडत होती. अकाली दलाला २५ वर्षे दिली, काँग्रेसलाही २५ वर्षे दिली. त्यामुळे पंजाबमध्ये पर्यायाची कमतरता होती. आपनं ही संधी हेरली. गेल्या निवडणुकीत उत्तम वातावरण निर्मिती झालेल्या आपनं या निवडणुकीत शेतकरी, महिला, विद्यार्थिनी यांना केंद्रस्थानी ठेवत घोषणांचा पाऊस पाडला. पंजाबच्या जनतेत विश्वास निर्माण केला. दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपनं जवळ केलं. खरंतर हे करणं काँग्रेसला सहज शक्य होतं. पण काँग्रेस तेव्हाही अंतर्गत कलहाच्या शीतयुद्धात अडकून पडला होता. केजरीवाल यांनी शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. पंजाबच्या माळवा प्रांतातून हे शेतकरी पंजाबच्या सीमेवर बसले होते. माळवा प्रांतात 117 पैकी 69 जागा आहेत. जो माळवा काबिज करेल तोच पंजाब काबिज करतो. केजरीवालांनी माळवा प्रांतातल्या संगरुर मतदारसंघातून भगवंत मान यांना उमेदवारी देते आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारीही घोषित केलं. याचा मोठा फायदा केजरीवालांना झाला. पण फक्त माळवा प्रांतातच नाही तर माझा, दोआबा या भागातही केजरीवालांच्या आपनं पाय पसरले. आज आम आदमी पक्ष हा पॅन पंजाब पक्ष म्हणून उदयाला आलाय. पण आपच्या या विजयाचं श्रेय काँग्रेसलाही दिलं पाहिजे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं अभूतपूर्व यश मिळवलंय. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानतानाच एक फोन कॅप्टन अमरिंदर सिंग, दुसरा फोन चरणजीतसिंह चन्नी आणि तिसरा फोन नवज्योेतसिंग सिद्धूंना करायला हवा. आणि आभार मानायला हवे. या तिघांनी कुरघोड्या केल्या नसत्या तर कदाचित आपचा एवढा मोठा विजय झाला नसता.

कधीकधी पराभवाचं फार दुख होत नाही, पण तो लाजिरवाणा असेल तर मात्र ती सल कायम बोचत राहते. पंजाबमध्ये काँग्रेसचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झालाय. या पराभवाचं चिंतन काँग्रेस पक्ष करेलच पण अंतर्गत कुरघोड्यांना रोखण्याची आणि पक्षाला उभारी देण्याची जी जबाबदारी शीर्ष नेतृत्वावर असते. ती सुद्धा राहुल गांधी यांना पार पाडता आलेली नाही. सुरुवातीचे साडे चार वर्ष मुख्यमंत्री असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पायउतार व्हावं लागलं. त्यांनंतर दलित चेहरा म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं गेलं. त्यानंतर जी खेकडेगिरी पंजाबमध्ये सुरू झाली ती या पराभवानंतरच संपली असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्दधू यांची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. ज्येष्ठ नेते सुनील जाखड हे सुद्धा दुखावले गेले. त्यामुळे चन्नींची वाट बिकट झाली.

मतदान १५ दिवसांवर असतानाही काँग्रेसला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवता येत नव्हता. यासाठी राहुल गांधी यांना आपली शक्ती खर्च करावी लागली. पाच वर्ष सत्तेत असताना साडे चार वर्ष मुख्यमंत्री असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे किती निष्क्रीय होते हे सांगण्यात काँग्रेसची शक्ती खर्च झाली. त्यामुळे काँग्रेस कुठल्या तोंडानं पंजाबमध्ये मतं मागत होती हा संशोधनाचाच विषय आहे.

चरणजीत सिंग चन्नी हे तीन महिनेच मुख्यमंत्री होते, मात्र या तीन महिन्यात त्यांनी स्वतःची सर्वसमावेशक लोकांमधला नेता अशी प्रतिमा तयार केली. पण त्याचा फारसा फायदा काँग्रेसला झाला नाही. शेवटी जो गोंधळ काँग्रेस पक्षात दिसत होता. त्यामुळे लोकांनी चन्नी यांनाही सपशेल नाकारलं. पाच वर्षे दिली पण कुठलंही भरीव काम काँग्रेसला करता आलं नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, ड्रग्ज तस्करी, वाळू तस्करी, बेरोजगारी या असंख्य प्रश्नांवर काँग्रेस काहीच करू शकली नाही. याची राग पंजाबी मतदारांच्या मनात होता. अब बस बदलाव चाहिए, हीच भावना सर्वजण बोलून दाखवत होतेे. आणि त्याचा परिणाम म्हणजे काँग्रेसचा हा अत्यंत वाईट पराभव.

काँग्रेसनं गेल्या सात वर्षात सातत्यानं होणाऱ्या पराभवाचं चिंतन केलं असेलही, मात्र त्यातून काँग्रेसची सुधारणा काहीच झालेली दिसत नाही. काँग्रेसच्या हातात काही मोजकी राज्य उरली होती. त्यातलं पंजाब हे प्रमुख राज्य होतं. ते सुद्धा काँग्रेसनं गमावलंय. नेतृत्वाचा पक्षातल्या नेत्यांवर जो दरारा असावा लागतो तो काँग्रेसमध्ये कधीच दिसत नाही. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो, पंजाबमध्ये कपुरथला मतदारसंघ आहे. तिथून काँग्रेसचे विद्यमान मंत्री राणा गुरजित सिंह हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवताहेत. याच मंत्रिमहोदयांचा मुलगा शेजारीच असलेल्या सुल्तानपूर लोधी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होता, ती सुद्धा काँग्रेसच्या विरोधात. तर मंत्रिमहोदय दुुपारपर्यंत स्वतःचा काँग्रेसचा प्रचार करायचे आणि दुपारनंतर काँग्रेस विरोधात लढत असलेल्या आपल्या अपक्ष मुलाचा प्रचार करायचे. सांगण्याचा उद्देश एकच की, हे सगळं एवढं उघड होत असताना. सातत्यानं तक्रारी देऊनही या मंत्र्यावर काहीही कारवाई झाली नाही. नेतृत्व म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यात थोडी रिस्क असू शकते पण पक्षाचे तत्वंही महत्वाची असतात अन्यथा विनाश अटळ असतो. हे कठोर निर्णय घेण्यात गांधी कमी पडले. अगदी चन्नी - सिद्धू वादातही तेच घडलंय. त्यामुळे पुढच्या काळात काँग्रेसला फक्त आपल्या हातात असलेली मोजकी राज्यच नव्हे तर स्वतःचं अस्तित्वही टीकवावं लागणार आहे.

स्पष्ट बहुमत देत पंजाबी मतदारांनी आपकडे आपली सत्ता सोपवली. बदल हवाय ही भावना पंजाबी मतदारांमध्ये दिसून येत होती. शिवाय अरविंद केजरीवाल महिलांना प्रतिमहिना अकराशे रुपये, वर्षभरात ८ फ्री सिलिंडर, पाच लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन, वयोवृद्धांना ३१०० रुपये प्रतिमहिना पेन्शन, प्रत्येकाला पक्कं घर,सरकारी शाळा प्रायव्हेट शाळांपेक्षाही चांगल्या बनवणार, मोफत वैद्यकीय सोईसुविधा, बारावी पास विद्यार्थिनींना २० हजार रुपये आणि कॉम्प्युटर, सरकार आपल्या दारी योजना, सरकारी कागदपत्रांची घरपोच डिलिव्हरी अशा लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. खरंतर आम आदमी पक्षाकडे पंजाबमध्ये कुठलाही मोठा चेहरा नव्हता. फक्त भगवंत मान यांचा चेहरा पुढे करत त्यांनी सर्वसामान्यांना उमेदवारी दिली. हाच साधेपणा पंजाबला भावला.

भगवंत मान पंजाबच्या विजयाचा खऱ्य़ा अर्थानं चेहरा बनले. कुणी त्यांना दारुडा म्हणून हिणवलं, कुणी कॉमेडियन म्हणून त्यांची मस्करी केली. पण स्वतःची प्रतिमा सुधारत अल्पावधीतच पंजाबचे मुख्यमंत्री बनणारे भगवंत मान यांचं यश अनेक अर्थानं महत्वाचं ठरतं. भगवंत मान हे पंजाबच्या बदलत्या राजकीय इतिहासाचे हीरो आहेत. शहीद भगतसिंग यांना ते आपला आदर्श मानतात. शहीद भगतसिंग यांच्यासारखी पिवळ्या रंगाचीच पगडी बांधतात. एवढंच काय मुख्यमंत्रीपदाची शपथही भगतसिंह यांच्या मूळ गावातच घेण्याची घोषणा त्यांनी केलीय. भगवंत मान यांचा हा इन्कलाब पंजाबच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करतो का हे पाहावं लागेलच. त्याचं वेळोवेळी समीक्षण होत राहील. पण आपनं मिळवलेलं हे यश सर्वच राजकीय पक्षांना, त्यातही प्रादेशिक पक्षांना उभारी देणारं आणि प्रेरणा देणारं ठरणार आहे. भगवंत मान यांचा चेहरा याच बदलत्या राजकारणाचा चेहरा आहे. सध्या रशिया युक्रेनमध्ये हल्ले करतोय. पण ज्या जिद्दीनं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमिर झेलेन्स्की लढा देत आहे त्याचं विशेष कौतुक होतंय. झेलेन्स्की आणि भगवंत मान यांच्यात बरंचसं साम्य आहे. एकतर दोघेही जवळपास एकाच वयाचे आहेत. दुसरं म्हणजे दोघेही टीव्ही शोवरचे प्रसिद्ध कॉमेडियन होते, आणि तिसरं म्हणजे युक्रेनसारखा लढाऊ बाणा असलेल्या पंजाब राज्याचे ते मुख्यमंत्री होत आहे. त्यामुळे देशाबाहेर झेलेन्कींची जेवढी चर्चा होतेय. तशीच चर्चा राज्यात भगवंत मान यांची होणार आहे.