दुसरा जन्म किंवा पुनर्जन्म.. Alleged reincarnation भारतीयांच्या सदैव उत्सुकतेचा विषय.. भारतीय धर्मशास्त्रातल्या कर्मविकापाच्या सिद्धांताने पुनर्जन्माच्या संकल्पेनाला बळकटी दिली. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाल्याचा दावा केला जातो.. मग त्याची खातरजमा करण्याचा प्रयत्न होतो..  लुब्धी किंवा शांतीदेवी यांची गोष्ट याच सदरातली.. बरीच चर्चिली गेलेली.. अगदी गांधीजींनाही पडताळणीसाठी समिती नेमायला लावणारी  



श्रीमद् भगवद् गीतेमध्ये सहाव्या अध्यायात पुर्नजन्मासंदर्भात निरुपण केलेलं आहे. पण जेव्हा एखादी सत्य घटना अशा पुर्नजन्माच्या संकल्पनेला पुष्ठी मिळते की काय काय असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मनुष्य उत्तरं शोधणं सुरु करतो. भारतात घडलेल्या अशाच एका घटनेची (पुर्नजन्म घटनेची?) चौकशी करण्यासाठी खुद्द महात्मा गांधीजींनी चौकशी समिती नेमली होती.., आज गोष्ट एका सो कॉल्ड पुर्नजन्माची..!!

मथुरेत चतुर्भुज यांच्या घरात 1902 साली लुब्धीचा जन्म होतो, हळू हळू लुब्धी मोठी होत होती. लुब्धी दहा वर्षांची झाल्यावर त्यावेळच्या रिती-रिवाजानुसार तिचा विवाह मथुरेतलेच कापड दुकानकार व्यापारी केदारनाथ चौबे यांच्याशी करुन दिला जातो. लुब्धीचा संसार सुरु होतो सगळे तिला चौबीयन म्हणू लागतात.

1924 साली लुब्धी एका मुलाला जन्म देते पण दुर्दैवानं ते मूल मृत जन्माला येतं. त्यानंतर म्हणजे 25 सप्टेंबर 1925 ला आणखी एका मुलाला जन्म देते.. हे दुसरं मूल सुदृढ असतं.. पण दुर्दैवानं 9 दिवसांनंतर लुब्धीचा आजारपणामुळे मृत्यू होतो. मृत्यूच्याआधी लुब्धी केदारनाथ चौबे यांच्याकडून पुन्हा लग्न न करण्याचं आश्वासन घेते, पण घरातल्यांच्या सांगण्यावरून काही दिवसांनी केदारनाथ पुन्हा लग्न करतात.

लुब्धीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी दिल्लीत माथूर यांच्या घरी 11 डिसेंबर 1926 ला एक मुलगी जन्म घेते, जिचं नाव ठेवलं जातं शांतीदेवी. हळू हळू शांतीदेवीही मोठी होऊ लागते.

शांतीदेवी चार वर्षांची होते आणि एकापाठोपाठ अकल्पित घटना घडू लागतात. दिल्लीत राहणारी शांतीदेवी अचानक मथुरेची बोली बोलायला सुरुवात करते. मथुरेचा कुठूनही संबंध नसणारे आपण, आपली मुलगी अचानक मथुरेच्या भाषेत कशी बोलते आहे याचं घरातल्यांना आश्चर्य वाटतं.

काही दिवसांनी पहिल्यांदाच ती तिच्या आईला सांगते की मी मथुरेची आहे, खरं घर मथुरेत आहे, मी चौबीयन आहे आणि मला एक मुलगा आहे. माझे पती मथुरेत राहतात. घरातल्यांना ही चिमुकली काय सांगते हे सुरुवातीला कळत नाही, सर्वजण आश्चर्यचकित होतात. लहानाची मोठी होत असलेली शांतादेवी मात्र सारखी मथुरेतल्या नवनवीन आठवणी घरातल्यांना बोलून दाखवू लागते. एक-दोन वेळा शांतीदेवीनं घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

आता मात्र घरातले लोक चिंताग्रस्त होतात, कधीही मथूरेत न गेलेली शांती हे काय सांगते आहे हे समजत नाही. शेवटी ते तिला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जातात. डॉक्टरांनाही ती हेच सर्व सांगते. सहा वर्षांची चिमुकली सिझर कसं झालं याबद्दल कसं बोलू शकते हे ऐकून डॉक्टरही चक्रावून जातात.

सहा वर्षांची शांतीदेवी आपल्या गेल्या जन्मीच्या नवऱ्याबद्दल बोलताना ते गोरे आहेत, गालावर तीळ आहे, चष्मा लावतात, घरासमोर मंदिर आहे, घरात विहिर आहे, मी काही पैसे एके ठिकाणी लपवले होते असं सांगू लागते.

शांतीदेवीचे आई-वडील एक दिवस दिल्लीतल्या आपल्या बाबू विशन चंद्र या आपल्या नातेवाईकाला बोलवतात. ते शांतीदेवीशी सविस्तर बोलतात.  शांतीदेवी पहिल्यांदा बाबू चंद्र यांच्यासमोर नवऱ्याचं नाव केदारनाथ आहे असं सांगते.

नाव समजल्यानंतर शांतीदेवीनं सांगितलेल्या मथुरेतल्या पत्त्यावर बाबू चंद्र केदारनाथ चौबे यांना पत्र लिहितात आणि घडणाऱ्या घटना कळवतात. मथुरेतल्या केदारनाथ चौबे यांना याचं आश्चर्य वाटतं.

केदारनाथ चौबे आपल्या भावाला पंडित कांदिलाल यांना दिल्लीत बाबू चंद्रा यांच्याकडे पाठवतात. चंद्रा कांदिलाल यांना घेऊन शांतीदेवीच्या घरी जातात. जाताना शांतीदेवीची परीक्षा पाहावी म्हणून कांदिलाल हेच केदारनाथ आहेत असं सांगायचं असं ठरतं. पण शांतीदेवी कांदिलाल हे माझे मोठे दीर आहेत असं म्हणत त्यांच्या पाया पडते. सर्वजण हबकून जातात.

कांदिलाल यांच्याशी शांतीदेवी काही वेळ बोलते, घरातल्यांची विचारपूस करते. पंडित कांदिलाल विस्मयकारी मनोवस्थेत मथुरेला परततात. केदारनाथ चौबेंना आश्चर्य व्यक्त करत सर्व काही सांगतात. आता केदारनाथ चौबेंनाही स्वत: दिल्लीला जाऊन सर्व काही  जाऊन पाहावं अशी उत्सुकता निर्माण होते.

नोव्हेंबर 1935 ला केदारनाथ आपला मुलगा नवनीतलाल याला घेऊन दिल्लीकडे रवाना होतात.  पुन्हा एकदा केदारनाथ चौबे आपण केदारनाथ यांचे मोठे भाऊ असल्याचं नऊ वर्षांच्या शांतीदेवीला सांगतात. पण शांतीदेवी मात्र या जन्मी कधीही न पाहिलेल्या केदारनाथ चौबे यांच्याकडे बघून लाजते आणि ओळखते आणि हेच माझे पती असल्याचं सांगते, पुन्हा सर्वजण अवाक होतात.

केदारनाथ चौबे यांच्यासह आपला मुलगा नवनीतलाल यालाही ती ओळखते, जवळ घेते. तिला विचारलं जातं की "तू मागच्या जन्मी बाळंपणानंतर याला एकदाच पाहिलं होतंस आणि तेव्हा हा नुकताच जन्मलेला होता, मग कसं ओळखलंस..??" तेव्हा ती एवढंच म्हणते, "आई आहे मुलाला कशी ओळखणार नाही..??" आणि रडू लागते.

काही वेळ गप्पा झाल्यानंतरच केदारनाथ चौबे यांचे आवडते पदार्थ जेवणात केलेले असतात, याला कारणही अर्थातच शांतीदेवी असते. काही वेळा नंतर केदारनाथ चौबे शांतीदेवीशी एकांतात बोलण्यासाठी विचारणा करतात. परवानगी दिली जाते. दोघं एकांतात बोलतात. शांतीदेवी यावेळी केदारनाथ यांच्याशी अशा काही गोष्टी बोलते ज्या गेल्या जन्मीच्या लुब्धी आणि केदारनाथ यांच्यात झालेल्या असतात.

केदारनाथ आता मात्र खरोखरच आश्चर्यचकित होतात आणि त्यांना खात्री वाटते की ही लुब्धीच आहे. या भेटीदरम्यान लुब्धी मात्र केदारनाथ चौबेंवर नाराज होते, कारण त्यांनी दिलेलं वचन मोडत लुब्धीच्या मृत्यूनंतर लग्न केलेलं असतं. चौबे परिवार मथुरेकडे रवाना होतो, शांतीदेवी पण हट्ट करते पण तिला जाऊ दिलं जात नाही.

आता हळू हळू ही शांतीदेवी आणि केदारनाथ यांची गोष्ट मीडियापर्यंत पोहचते. पेपरमध्ये या घटनेबद्दल लिहिलं जात होतं. दररोज अनेक रिपोर्टर्स शांतीदेवी आणि केदारनाथ यांना भेटायला, मुलाखतींसाठी येऊ लागतात.

ही गोष्ट मग खुद्द महात्मा गांधींपर्यंत पोहोचते. गांधीजी शांतीदेवीला भेटायला बोलवतात, ती गांधीजींना भेटते. त्यानंतर या पुनर्जन्माची(?) सत्यता तपासण्यासाठी महात्मा गांधी पंधरा जणांची कमिटी बनवतात, ज्यामध्ये पत्रकार, डॉक्टर, वकिल, जज, काही प्रतिष्ठित लोक यांचा समावेश असतो.

ही 15 जणांची कमिटी शांतीदेवीला भेटते, चौकशी करते. कमिटीकडून निर्णय घेतला जातो शांतीदेवीला तिच्या मागच्या जन्मीच्या सासरी म्हणजे केदारनाथ चौबे यांच्या घरी घेऊन जाण्याचा. दिवस ठरतो, सर्वजण रेल्वेने दिल्लीहून मथुरेला जातात.

मथुरेत सर्व उतरतात, अचानक शांतीदेवी गर्दीतल्या एक व्यक्तीच्या पाया पडते. केदारनाथ चौबे यांचे शांतीदेवीला कधी न भेटलेले आणखी एक मोठे बंधू शांतीदेवीला घेण्यासाठी आलेले असतात. तिथून शांतीदेवीच सर्वांच्या सांगण्यावरून सर्वजणांना पूर्वजन्मीच्या (?) सासरचं घर दाखवते. सर्वजण अवाक झालेले असतात.

शांतीदेवी केदारनाथ चौबे यांच्या घरी पोहोचते, घरातील मंडळीना ओळखते, विहिरी इतर गोष्टी, वस्तू सगळं सांगते. कमिटीला तिनं पैसे लपवल्याचं सांगितलेलं असतं ते पाहण्यासाठी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जातात. तिथे ती पैसे लपवलेली जागा दाखवते, पण तिथे पैसे नसतात पण ते पैसे मी घेतल्याचं केदारनाथ चौबे सांगतात. पहिल्यांदाच आलेल्या शांतीदेवीची घराबद्दल असलेली माहिती पाहून कमिटीसह सर्वचजण आश्चर्याने थक्क होतात.

कमिटी मग तिला घेऊन तिच्या कथित मागच्या जन्मीच्या (?) म्हणजे लुब्धीच्या माहेरच्या घरी जातात. तिच्या आई-वडिलांना ती भेटते. आई-वडिल, ती सर्वच भावनाविवश होतात. कमिटी हे सर्व पाहून अवाक झालेली असते. घडलेल्या सर्व घटनांचा रिपोर्ट गांधीजींना दिला जातो. गांधीजीही आश्चर्य व्यक्त करतात. अर्थात तत्कालीन काही रिपोर्टमध्ये हा पुर्नजन्म नसल्याचेही दाखले दिले गेले आहेत.

यानंतर जगभरातले पत्रकार, पुनर्जन्मावर रिसर्च करणारे लोक शांतीदेवीला भेटून गेले. एक न उमगणारं कोडं अशी काहीशी ही घटना जिची दखल खुद्द महात्मा गांधींनी घेतली होती.

या अति विशेष घटनेत आणखी भर पडली ती शांतीदेवीनं या जन्मातही केदारनाथ यांनाच आपला पती मानून आजन्म (या जन्मात) अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. अखेर 27 डिसेंबर 1987 रोजी शांतीदेवीचं निधन झालं. गेल्या जन्मातली लुब्धी, या जन्मातली शांतीदेवी गेली अनेक  प्रश्नांना "जन्म" देऊन....!!

पण खरोखरच असं काही घडणं शक्य आहे का..??  की हा मानसिक भ्रम, घटनांचा योगायोग वा परंपरेच्या वैचारिक चक्रव्यूहात माणसाची झालेली ही फसगत आहे..??  गीतेमध्ये जशी पुर्नजन्म संकल्पना मांडली गेली आहे, तशीच प्राचीन भारतीय संस्कृतीमधील चार्वाक दर्शनातही पुनर्जन्मावर ऊहापोह झाला आहे.., "भस्मी भूतस्य देहस्य पूनरागमनम् कुतह:" म्हणजे "एकदा देह भस्म झाल्यावर पुनरागमन ते कसले..?? शोध सुरु आहे आणि राहिल...!!

(सदर लेख इंटरनेटवरील माहिती तथा विविध माहिती माध्यमांच्या आधारे लिहिलेली आहे)