जगात काळाच्या रेतीवर ज्या वास्तूंनी आपले ठसे उमटवले अशा अशा अनेक वास्तू भारतात हजारो वर्षांपासून उभ्या आहेत. मग ते औरंगाबादचं अजंठा, वेरुळ असो वा दिल्लीचा ताजमहाल. दक्षिण दिल्लीतच महरौली भागात अशीच एक वास्तू पर्यटनाचं केद्र आहे. मातीच्या विटांपासून बनविलेली तब्बल 237 फूट उंच कुतुब मीनार. दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबउद्दीन ऐबक याने कुतुब मीनार बांधायला सुरुवात केली ती 1192 मध्ये. अफगाणिस्तानातल्या जान की मीनारसारखी रचना ऐबकला करायची होती. कुतुब मीनारचा पाया कुतुबउद्दीननं बांधला, त्यानंतर मात्र त्याचा मृत्यू झाल्यामुळे नंतरचे तीन मजले इल्तूतमिशनं बांधले, ते 1220 पर्यंत.


त्यानंतर 1368 मध्ये फिरोजशाह तुघलकनं पुढचं बांधकाम पूर्ण केलं. कुतुब मीनारच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला अरुंद वाटेतून 379 पायऱ्या चढून जावं लागतं. दरम्यान या मीनारला नैसर्गिक आपत्तींचाही मोठा फटका बसला. कधी वीज पडून नुकसान झालं तर कधी भूकंपामुळे. 


स्वातंत्र्यपूर्व काळातही इंग्रजांनी नुकसान झालेल्या भागाची डागडूजी केली. काही काळापूर्वी कुतुब मीनारच्या मजल्यांवरती जाण्याची परवानगी असे, आलेले पर्यटक वरुन दिसणारा दिल्लीचा परिसर पाहण्यासाठी जात असत. पण अचानक एक दिवस असा उजाडला की सरकारला पर्यटकांसाठी वर जाणं बंद करावं लागलं.


4 डिसेंबर 1981 ला नेहमी प्रमाणे पर्यटकांची मोठी गर्दी कुतुब मीनार पाहायसाठी झालेली होती. एका शाळेच्या मुलांची ट्रीपही युनेस्कोनं आपल्या यादीत समाविष्ठ केलेली ही वास्तू पाहण्यासाठी आलेली होती.


अतिशय अरुंद वाटेतून सुमारे 400 लोक ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. कुतुब मीनारच्या  विविध मजल्यांवर होते. साधारणत 11.30 वाजता अचानक लाईट गेली. आतमध्ये असलेले दिवे अचानक बंद झाल्याने प्रकाशाचा इतर कुठलाही मार्ग नसलेल्या कुतुब मीनारमध्ये अंधार पसरला.


घाबरलेले पर्यटक अचानक बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले आणि मग एकच गोंधळ उडाला. वरती असलेले लोक खाली धावू लागले, परंतु खालीही पर्यटक असल्याने मोठी चेंगरा-चेंगरी झाली. यातच शाळेचीही मुलं होती. किंचाळ्या, रडारड आणि आरडा-ओरडा यामुळे एकच हलकल्लोळ माजला. 


जे बाहेर पडू शकले ते पडू शकले, बाकीच्यांची अवस्था काय सांगावी. अंधारात झालेल्या या चेंगरा-चेंगरीत अनेक जण जखमी झाले तर तब्बल 45 जण मृत्यूमुखी पडले. 


दिल्लीसह अवघ्या देशालाच नाही तर जगाला या घटनेनं हादरवून सोडलं. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. हाय...काय करावे...?? एका भीषण घटनेनं कुतुब मीनारचे दरवाजे कायमचे बंद झाले.


4 डिसेंबर 1981 हा काळा दिवस उगवला 45 निरपराध्यांचे प्राण हकनाक घेण्यासाठी. या घटनेनंतर मात्र मग सरकारनं कुतुब मीनारच्या कुठल्याही मजल्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला. कुतुब मीनारचे दरवाजे त्यानंतर बंद झाले ते कायमचेच...!!