लालूंच्या कुटुंबावर सीबीआयची धाड सुरु झाल्यानं जो राजकीय भूकंप सुरु झाला, त्याचे हादरे बिहारच्या सत्तास्थानाला बसू लागलेत. 2015च्या विधानसभा निवडणुकीत नितीश आणि लालू हे एकमेकांचे राजकीय वैरी एकत्र आले होते, ते केवळ मोदींना हरवण्यासाठीच. राजकारणातली अतिशय अकल्पित आणि धक्कादायक अशी ही युती अजून 2 वर्षेही पूर्ण करु शकलेली नाहीय. या सत्तासोपानाच्या पहिल्या दिवसापासूनच ज्या शंका उपस्थित केल्या जात होत्या, त्या आता ख-या ठरु लागल्यात.


खरंतर नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक या तीनही महत्वाच्या घटनांमध्ये नितीशकुमार हे अगदी उघडपणे मोदींच्या बाजूनं उभे राहिलेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत पुन्हा जुळवून घ्यायच्या संधीची ते जणू वाटच पाहतायत की काय अशी स्थिती. आता सीबीआयच्या कारवाईनं वातावरणनिर्मिती तर झालीय, फक्त नितीशकुमार घाव घालायचे बाकी आहेत. शिवाय ज्या तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालाय, ते केवळ लालूंचे पुत्रच नाहीत तर नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. सुशासन बाबू अशी नितीशकुमारांची प्रतिमा आहे. याआधी तीनवेळा जेव्हा त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले होते, तेव्हा त्यांनी तातडीनं त्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे आता तेजस्वीबाबत तोच न्याय लावून नितीशकुमार आपला रामशास्त्री बाणा जपणार का? याची उत्सुकता आहे. अर्थात राजदनं तेजस्वीच्या राजीनाम्याची शक्यता बिलकुल धुडकावून लावली आहे. तेजस्वीवर तर केवळ गुन्हा दाखल झाला आहे, पण ज्या उमा भारती, अडवाणी यांच्यावर आरोपपत्र दाखल होऊन कोर्टानं त्यांना शिक्षाही सुनावली आहे, त्यांच्याबद्दल काय? असा राजदचा सवाल आहे. उमा भारतींचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा भाजप का नाही घेत? असा प्रतिप्रश्न राजदकडून करण्यात येत आहे.



पण निर्णय नितीशकुमार यांच्यासाठी तितका सोपा असणार नाही. मुळात बिहार हे असं राज्य आहे जिथं भाजपला अजून आपलं बहुमताचं सरकार स्थापन करता आलेलं नाही. शेजारच्या यूपी, झारखंड, छत्तीसगढ, हिमालच प्रदेशात भाजपनं अनेकदा बहुमतानं सरकार बनवलं आहे. पण बिहारमध्ये भाजप, संघाला पाय रोवता आलेले नाहीत. गौतम बुद्धांची ज्ञाननगरी गया, नालंदाचं प्राचीन विदयापीठ आणि पाटलीपुत्रासारखं राज्य याच गंगेच्या काठावर वसलेलं होतं. बिहार आर्थिक आघाडीवर मागास राहिलेलं असलं तरी या राज्याची राजकीय समज नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. देशात सत्तरीच्या दशकात नवचेतना निर्माण करणारं विद्यार्थी आंदोलन, जेपींच्या चळवळीचा केंद्रबिंदू हाच होता, याच बिहारमध्ये 1990 साली अडवाणींची रथयात्रा लालूंनी रोखली होती. शेजारचं यूपी अतिप्रचंड बहुमतानं काबीज केल्यानंतर भाजपला बिहारची जखम सलणं साहजिकच आहे. सीबीआयच्या कारवाईमागे याच स्वप्नपूर्तीचा ध्यास तर नाही ना, अशी दबकी चर्चा त्यामुळेच राजधानीत सुरु आहे.

अर्थात नितीशकुमारांनी असं पाऊल उचललं तर ते Historic blunder ( ऐतिहासिक घोडचूक) ठरेल असा इशाराही काही जण देत आहेत. देशात सध्या सगळीकडे भाजपचं वारं असल्यानं हा मोह होणं साहजिक आहे. पण एनडीएच्या कळपात सामील होऊन मोदींच्या आडोशात एखाद्या रोपट्यासारखं जगायचं की भाजपला पर्याय म्हणून उभं राहत एखाद्या वटवृक्षासारखं बहरायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. दुसरा पर्याय स्वीकारला तर त्यांचं नेता म्हणून महत्व अधिक राहील यात शंका नाही. कारण अशा स्थितीत ते केवळ बिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत, तर राष्ट्रीय स्तरावरच्या प्रत्येक हालचालीत त्यांना प्रमुख स्थान असेल. सध्या त्यांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यात काँग्रेसला जी धडपड करावी लागतेय, त्यातूनच ते लक्षात येईल. उपराष्ट्रपतीपदासाठी जी यूपीएची मीटिंग दिल्लीत झाली, त्याला नितीशकुमार स्वत: उपस्थित नव्हते, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून शरद यादव हजर होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी जवळपास दोनवेळा नितीशकुमार यांच्याशी स्वत: फोनवर चर्चा केल्याच्याही बातम्या आहेत. त्यानंतर नितीश उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएसोबत राहायला तयारही झाले आहेत. अजूनही त्यांचे पाय दोन दरडीवर आहेत. राष्ट्रपतीपदासाठी एका टोकाला, उपराष्ट्रपतीपदासाठी एकदम दुसऱ्या टोकालाच अशी भूमिका घेणारा त्यांचा पक्ष भारतीय राजकारणाच्या इतिहासातला पहिला पक्ष ठरावा.



2019 साठी मोदींच्या समोर कोण? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा राहुल गांधी, नितीशकुमार, केजरीवाल ही नावं प्रामुख्यानं समोर येतात. त्यात राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याबद्दल बोलायला नको, केजरीवाल यांनी सततच्या नकारात्मक राजकारणानं स्वत:च आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. राहता राहिले नितीशकुमार. भाजपचं सरकार आल्यानंतर देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर संकट ओढवल्याची भीती ज्या बुद्धिजीवी लोकांना वाटते, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आशा हे नितीशकुमारच आहेत यात शंका नाही. परवा दिल्लीतल्या कार्यक्रमातही त्याचा प्रत्यय आला. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या इंडिया आफ्टर गांधी च्या दशकपूर्ती आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडला. तेव्हा गुहांनी सध्याच्या राजकारणात आपली एक भन्नाट फँटसी ऐकवली. देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा सध्या कुशल नेतृत्वाविना आहे, तर जो सर्वात कुशल विरोधक आहे त्याच्याकडे लायकीचा पक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसनं आपला अध्यक्ष म्हणून नितीशकुमार यांना नेमावं हा आपला रम्य कल्पनाविलास असल्याचं गुहांनी सांगितलं. राहुल गांधींच्या दिशाहीन नेतृत्वामुळे काँग्रेस रसातळाला पोहचली आहे, तर नितीशकुमार यांच्यात नेतृत्वाचे गुण असले तरी त्यांचा पक्ष धड नाही. अर्थात हे प्रत्यक्षात येणं अजिबात शक्य नाही. गांधींच्या पलीकडे गेल्याशिवाय काँग्रेसचं पुनरुज्जीवन होणार नाही आणि गांधींना सोडणं कधी काँग्रेसला जमणार नाही. हेही गुहांनीच सांगून टाकलं. यातला कल्पनेचा भाग सोडा, पण नितीशकुमार हे मोदींना सर्वात सक्षम विरोधक म्हणून पुढे येऊ शकतात हे खरं आहे. मुळात दोघांमध्ये साम्यही खूप आहेत. दोघेही विवाहित असून सध्या एकटे, दोघेही ओबीसी, दोघांनाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव. अर्थात नितीशकुमार यांनी आपल्या सेक्युलर इमेजवर कोणताही डाग येऊ दिलेला नाही. शिवाय महिलांसाठी विशेष योजना राबवून भारतीय राजकारणात अतिशय दुर्मिळ असलेला गुणही त्यांनी दाखवून दिला आहे, हे गुहांचं निरीक्षणही महत्वाचं.

देशात एका पक्षाची सरकारं याआधीही आली आहेत. एकछत्री अंमल सुरु झाला की बाकीचे पालापाचोळाच वाटू लागतात. पण याआधी अशाही परिस्थितीत व्ही पी सिंह यांनी राजीव गांधींचं सरकार उलथवून दाखवलं होतं. त्यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांनी सगळ्या पक्षांना एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. 2019च्या लढाईसाठी नितीशकुमार देवीलाल बनणार का? हा खरा प्रश्न आहे.

‘दिल्लीदूत’ सदरातील याआधीचे ब्लॉग ब्लॉग:

दिल्लीदूत : मोदींची कुणाशी स्पर्धा सुरु आहे?


दिल्लीदूत: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?


दिल्लीदूत : राष्ट्रपतीपदासाठी मोदींचं दलित कार्ड


BLOG: मनमोकळ्या मूडमधले अमित शहा


दिल्लीदूत : कोण असणार मोदींचे कलाम?


दिल्लीदूत : भ्रमाचा भोपळा


दिल्लीदूत : लोकसभेत ‘सेना स्टाईल’ कामगिरीनं गाजलेला दिवस !


दिल्लीदूत : मराठा तितुका झोडपावा..


इलेक्शन डायरी- मोदी वाराणसीत, तसे राहुल अमेठीत का नाही?


इलेक्शन डायरी : गोरखपूरचं समांतर सरकार- योगी आदित्यनाथ


इलेक्शन डायरी : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी?




हार्दिक पटेल गुजरातचा बाळासाहेब ठाकरे होऊ शकेल?


दिल्लीदूत : सत्तांतराचा लखनवी एपिसोड


दिल्लीदूत : एक अनुभव राजधानीतल्या बाबूशाहीचा

दिल्लीदूत : गालिब की हवेली


दिल्लीदूत : शांतता, गोंधळ चालू आहे!


दिल्लीदूत : काही ( खरंच) बोलायाचे आहे…


दिल्लीदूत : दीदी बडी ड्रामा क्वीन है..


दिल्लीदूत : जेव्हा मनमोहन सिंह बोलतात…