सत्ताकेंद्र म्हणून विचार केला तर अमित शहा हे सध्या देशातलं दोन नंबरचं व्यक्तिमत्व आहे. एरव्ही ते सतत निवडणूक व्यवस्थापन, प्रचार, दौरे यातच व्यस्त असतात. पण दरवर्षी 26 मे म्हणजे मोदी सरकारच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मात्र ते नियमितपणे पत्रकारांसमोर येतात.

यावेळी तर दोन दिवस राष्ट्रीय मीडिया, डिजिटल मीडिया, प्रादेशिक अशा विविध पत्रकारांना ते गटागटानं भेटले. दिल्लीत आल्यापासून त्यांना असं अनौपचारिकरित्या भेटण्याची ही दुसरी संधी.

अशोका हॉटेलमध्ये देशभरातल्या प्रादेशिक मीडियाला सरकारचं प्रगतीपुस्तक दाखवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. कार्यक्रम सुरु झाला एका प्रेझेंटशननं. भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल नरसिंह राव यांनी त्यांच्या नावाइतकंच लांबलचक प्रेझेंटेशन केलं. जवळपास एक तास मोदी सरकारच्या जमिनीपासून ते आकाशापर्यंतच्या कामगिरीचा वेध ते घेत होते. साडेआठ वाजता त्यांचं प्रेझेंटेशन संपलं आणि आकडेवारीच्या माऱ्यानं त्रस्त झालेल्या उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.

त्यानंतर अनौपचारिक गप्पा सुरु झाल्या. निवडणूक रणनीतीचे शहेनशहा मानले जाणारे भाजपचे अमित शाह हे आता सगळ्यांना गप्पांसाठी उपलब्ध होते. व्यंकय्या नायडू, पीयूष गोयल,राज्यवर्धन राठोड हे तीन मंत्रीही यावेळी उपस्थित होते.

अमित शहांनी सुरुवातीला सगळ्या पत्रकारांची तोंडओळख करुन घेतली. त्यानंतर जेवणाच्या टेबलवरच गप्पांचा फड सुरु झाला.

महाराष्ट्रात नुकतंच एका माजी मंत्र्यानं मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं होतं. आपल्याला त्याची कितपत शक्यता वाटते हा पहिला प्रश्न संधी मिळताच विचारला.

त्यावर अमित शहांनी मध्यावधी निवडणुकांबाबत असं वक्तव्य करणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. सत्ताधारी कधी असे वक्तव्य करतात का,  असं उत्तर दिलं. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची आपल्याला बिलकुल शक्यता दिसत नाही. पण जरी समजा अशी वेळ आलीच, तर भाजप बहुमतानं पुन्हा सत्तेवर येईल असंही ठासून सांगितलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं शेतक-यांबद्दलचं वक्तव्य फारच गाजलं होतं. ‘तरीही रडतात साले’ असा शेतक-यांचा उल्लेख केल्यानं बराच वाद झाला होता. पण दानवेंच्या या वक्तव्याला अमित शाह यांनी एकप्रकारे क्लीनचिटच दिली. रावसाहेब हे कधीकाळी निजामाचं शासन असलेल्या भागातून येतात. त्यामुळे त्यांचं ना धड मराठी स्पष्ट आहे, ना हिंदी. कदाचित हाच त्यांचा प्रॉब्लेम असावा असं हसून सांगत अमित शहांनी हा वाद निष्कारण आहे असं दाखवायचा प्रयत्न केला. पण तरीही दानवेंच्या याआधीच्या वक्तव्यांचा दाखला पत्रकारांनी दिल्यावर त्यांनी ‘अरे क्यूं पीछे पडे हो उनके, जाने दीजिए ना, रावसाहेब एकदम भला आदमी हैं. मै अच्छी तरह से जानता हूं उनको’ असं सांगून त्यांची पाठराखणच केली.

खरंतर भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यानं तुरीच्या ऐन वादात पक्षाच्या प्रतिमेचं नुकसानच केलं होतं. त्यावेळी त्यांना जपून बोला असाही संदेश दिल्लीकडून तातडीनं मिळाला होता. पण आमच्या मराठवाड्यात साला हे कसं बोलीभाषेतलं संबोधन आहे हे दानवेंचं स्पष्टीकरण अमित शहांना अगदीच पटलेलं दिसतंय. त्यामुळे तूर्तास तरी दानवेंनी सुटकेचा निश्वास टाकून हुश्श करायला हरकत नाही.

राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफीवरुन राजकीय वातावरण पेटलेलं आहे. पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व काही महाराष्ट्रातल्या कर्जमाफीच्या बाजूनं दिसत नाहीय. कारण यूपीमध्ये इतक्या सहज आणि जलद कर्जमाफी होते, मग महाराष्ट्रात ती का नाही होत हा प्रश्न जेव्हा विचारला त्यावर, यूपीत झाली म्हणून ती इतर सगळीकडे व्हायला पाहिजे असं नाहीय असं उत्तर दिलं. पण एकाच पक्षाची, एकाच मुद्द्यावर वेगवेगळी भूमिका कशी असू शकते असा प्रतिप्रश्न केल्यावर, त्यांचं उत्तर होतं, का नाही असू शकत. प्रत्येक राज्याचे प्रश्न, त्या राज्याची रचना ही वेगळी असते, त्यानुसारच पॉलिसी बनवावी लागते. एकूण अमित शहांच्या या वक्तव्यावरुन कर्जमाफीचं घोंगडं अजून बराच काळ भिजतच राहणार असं दिसतंय. निवडणुका जवळ येईपर्यंत भाजप कर्जमाफीबद्दल काही हालचाल करणार नाही असा निष्कर्ष तूर्तास तरी काढता येईल.



राणेंच्या भेटीवर अमित शहा

महाराष्ट्रातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची सध्या चर्चा सुरु आहे. मागे ते मुख्यमंत्र्यांसह आपल्याला अहमदाबादमध्ये भेटल्याचीही चर्चा होती. यावर अमित शहांनी राणे अहमदाबामध्ये आपल्याला भेटल्याचं वृत्त अपेक्षेप्रमाणे फेटाळलं. देवेंद फडणवीस आणि राणे हे एकमेकांना विमानतळावर भेटले. तिथून राणेंना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी फडणवीस यांनी आपल्या गाडीतून सोडलं. पण मला भेटायला येताना देवेंद्रजी हे एकटेच आले होते असं शहांनी म्हटलं.

राणेंच्या भेटीचं वृत्त नाकारण्याशिवाय खरंतर शहांकडे पर्यायच नाही. पण ज्या मोदी-शहांच्या गुप्ततेच्या कारभारात एकही बातमी हाती लागत नाही, तिथं राणेंच्या या भेटीचा गवगवा होणं ही कदाचित भाजपच्याच एका गटाची कमाल असू शकते असा संशय घ्यायला जागा आहे. काल दिल्लीत भेटलेले गुजरातमधले काही पत्रकारही त्याचबद्दल बोलत होते. अर्थात राणेंच्या भाजप प्रवेशाची कितपत संभावना आहे, यावर अमित शहांनी काँग्रेसमधले असे अनेक नेते भाजपमध्ये यायला उत्सुक आहेतच. एवढंच बोलून हा विषय टाळला.

शिवसेनेसोबत खरंच इगोचा प्रश्न आहे का?

शिवसेनेसोबत खरंच इगोचा प्रश्न आहे का, कधी काळी भाजपचे ज्येष्ठ नेते कधी मुंबईत आले की आवर्जून मातोश्रीवर येत. पण तुमच्या काळात असं घडताना दिसत नाहीय. मातोश्रीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय का. तुमच्यातला जो वाद आहे तो वाद इगोचा म्हणजे अहंकाराचा मुद्दा आहे का. या प्रश्नावर अमित शहांनी इगो तो बिल्कुल भी नहीं है. अगर कोई मुझे बुलाता हैं, तो मैं जरुर जाऊंगा असं उत्तर दिलं. पण त्यांच्या या उत्तरातला ‘अगर’ हाच जास्त कळीचा प्रश्न आहे.

शिवसेनेबद्दलच पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही खरंतर महाराष्ट्रात त्यांच्या विरोधाला जास्त गांभीर्यानं घेत नाही. शिवसेना गप्प बसली तरी या मुद्द्यांवर काँग्रेस किंवा इतर कुणी बोलत राहणारच आहे. आमच्या सरकारसाठी काम करणं जास्त महत्वाचं आहे. जे काही निर्णय घेतले जातायत, त्यात शिवसेनेचेही मंत्री सहभागी आहेतच. त्यामुळे सरकारमध्ये राहून अधिकाधिक काम करायचं की विरोध करत राहायचा हा त्यांचा प्रश्न आहे.

गडकरींच्या षष्ठ्यब्दपूर्तीला गैरहजेरी का?

परवाच नागपूरमधे गडकरींच्या षष्ठ्यब्दपूर्तीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते हजर होते. शिवाय आमंत्रण पत्रिकेवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचंही नाव होतं. पण अमित शहा काही या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. त्याबद्दल विचारलं असता शहांनी आपण या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. माझा 26,27,28 तारखेचा कार्यक्रम आधीच ठरलेला होता. तुम्हा लोकांना ( पत्रकारांना ) आमंत्रणं पण कधीच गेली होती या कार्यक्रमाची. असं उत्तर दिलं. पण कार्यक्रम पत्रिकेवर तुमचं नाव तर छापलेलं होतं. असं म्हटल्यावर हा, ते त्यांनी असंच छापलं असेल. असं म्हणून झालेला घोळ लपवायचा प्रयत्न केला. पण मुळात गडकरींच्या षष्ठयब्दपूर्तीचे जे आयोजक असतील, ते राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव असं उगीच आमंत्रणाविना छापण्याचं धाडस करणार नाहीत. त्यामुळे शहांच्या या ऐनवेळच्या अनुपस्थितीमागे काही वेगळंच कारण असावं अशी चर्चा दिल्लीत रंगतेय. कदाचित कार्यक्रमाच्या भव्यतेबद्दल काही आक्षेप असल्यानंच हा प्रकार घडला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

कोल्हापूरच्या जावयाला मराठी बोलता येत का?

शेवटच्या गप्पांमध्ये जरा हलकेफुलके विषय सुरु झाले.  अमित शहा हे कोल्हापूरचे जावई आहेत. त्यामुळे तुम्हाला मराठी बोलता येतं का...असा प्रश्न विचारला. त्यावर ते अगदी जोरात हसून म्हणाले, मराठी बोल तो नहीं सकता, लेकिन मराठी के सब गुस्सेवाले शब्द मुझे समझते हैं.

थोडक्यात भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा देशाच्या सत्ताकेंद्रात नंबर दोनच्या स्थानावर असलो तरी पत्नीच्या रागाचा आपल्यालाही सामना करावा लागतो याची स्पष्ट कबुलीच त्यांनी यानिमित्तानं दिली.

या उत्तरावेळी त्यांच्याभोवतीची सगळी नामाभिधानं, विशेषणं गळून पडून पत्नीसमोर शरण जाणारा एक नवरोबा हे त्यांचं एकच रुप दिसत होतं.  कोल्हापूर तर एकदम तिखटासाठी प्रसिद्ध आहे पण ते मांसाहारी शौकिनांसाठी, तुम्ही तर शुद्ध शाकाहारी असं काही पत्रकारांनी त्यांनी म्हटल्यावर अमित शहांनी पण कोल्हापूरची मिसळ आहे ना, ती पण तिखट असते असं सांगून आपल्याला मराठी संस्कृतीची किमान थोडीफार माहिती असल्याचा पुरावा दिला.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक

महाराष्ट्राशिवाय जे काही इतर प्रश्न त्यांना विचारले जात होते, त्यात राष्ट्रपतीपदाबद्दल सगळ्यांनाच सर्वाधिक उत्सुकता होता. साहिजकच अमित शहा मात्र अत्यंत खुबीनं हे सगळे प्रश्न टोलवत होते. एकही हिंट द्यायला ते तयार नव्हते. पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत नुकतीच काँग्रेसनं 17 पक्षांना एकत्र करुन बैठक बोलावली, पण मग तुमची तयारी कधी सुरु होणार या प्रश्नावर त्यांनी आपल्या एका वेगळ्या रणनीतीचा हसतहसत गौप्यस्फोट केला. त्यांचं म्हणणं होतं की जर आम्ही आत्ताच राष्ट्रपतीपदासाठी काही बैठका घेऊ लागलो, तर मीडियात त्याचीच चर्चा, अंदाज सुरु होतील. मग आमच्या तीन वर्षपूर्तीच्या बातम्या कमी होणार नाहीत का? त्यामुळे किमान 16 जूनपर्यंत तरी यासंदर्भात काहीही हालचाल होणार नाही एवढी निश्चिंती बाळगा. शिवाय शेवटपर्यंत तुम्हाला नावाचा पत्ता लागणार नाही असाही चिमटा त्यांनी पत्रकारांना घेतला.