दोन दिवस उलटले तरी राजधानीत अजूनही पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाचीच चर्चा सुरु आहे. कारण 8 नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर केल्यानंतरही जे आकडे रिझर्व्ह बँकेला अद्याप सादर करता आले नव्हते, नोटबंदीचा नेमका काय फायदा झाला हे शोधताना भल्या भल्या अर्थतज्ज्ञांना मोठ्या भिंगाचा चष्मा लावूनही काही हाती लागत नव्हतं, तिथे पंतप्रधानांनी अगदी सराईतपणे ही आकडेवारी देशवासियांच्या समोर मांडली. 3 लाख कोटी रुपये जे आजवर कधी बँकिंग सिस्टिममध्ये आले नव्हते, ते नोटबंदीमुळे परत आले. शिवाय पावणेदोन लाख कोटींहून अधिकचा बँकांमध्ये असलेला पैसा सध्या संशयाच्या घे-यात आहे. खरंतर जेव्हापासून नोटबंदी लागू झाली, तेव्हापासून किती पैसे परत आले या एका प्रश्नाचं उत्तर रिझर्व्ह बँकेला देता येत नाहीय. संसदीय समितीत रिझर्व्ह बँकेंच्या गव्हर्नरला या प्रश्नावर विरोधकांनी पळता भुई थोडं केलं होतं. त्यावेळी मनमोहन सिंग त्यांच्या बचावाला आल्यानं ते वाचले बिचारे. पण ते तरी काय शहाणे, सांगून टाकायचं ना त्यांनी ही आकडेवारी माननीय पंतप्रधानांना लाल किल्ल्यावरुन जाहीर करण्यासाठी राखून ठेवलीय म्हणून. पंतप्रधानांनी जी आकडेवारी सादर केली त्याबद्दल आज पत्रकार परिषदेत अर्थमंत्री जेटलींना प्रश्न विचारण्यात आला, तर सोर्स सांगायला पंतप्रधानांनी काही वृत्तपत्रात लेख लिहिलेला नाही असं तिरसट उत्तर त्यांनी दिलं. अर्थात त्यांच्या अशा झिडकारण्यानं प्रश्नाला पूर्णविराम काही मिळणार नाही. कारण विरोधकांनी यावरुन सरकारवर शरसंधान सुरु केलंच आहे. यावेळी नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईकचा डंका लाल किल्ल्यावरुन वाजणार याची शक्यता होतीच.
काश्मीर की समस्या का समाधान गोली और गाली से नहीं, बल्कि गले लगाने से होगा...हे चमकदार वाक्यही मोदींच्या यावेळच्या भाषणात होतं. मागच्या वेळी बलुचिस्तानचा थेट उल्लेख करुन मोदींनी आपल्या सरकारच्या परराष्ट्र धोरणातला बाष्कळपणा पुराव्यानिशी दाखवून दिला होता. आता यावेळी ते पाकिस्तानला किंवा भलतंच धाडस केलं तर चीनला काही सुनावताहेत की काय याची उत्सुकता होती. पण मोदींनी अत्यंत धूर्तपणे या दोन्हीचा साधा उल्लेखही केला नाही. देशाची अंतर्गत सुरक्षा करण्यास भारत सक्षम असल्याची ग्वाही तेवढी त्यांनी दिली. त्यानंतर हा इशारा पाकला आहे की चीनला या गोष्टीचा कीस पाडण्याची जबाबदारी चॅनेलवरच्या तज्ज्ञांनी उचलली.
लाल किल्ल्यावरुन मोदींचं हे चौथं भाषण होतं. यावेळी आपलं भाषण लवकर संपवण्याचं वचन जनतेला दिल्यानं त्यांनी ते ५५ व्या मिनिटाला आटोपलं. २०१६ मधे ९४ मिनिटांचं, २०१५ मध्ये ८६ मिनिटांचं भाषण मोदींनी केलं होतं. भाषणाच्या सुरुवातीलाच गोरखपूर हॉस्पिटलमधल्या दुर्घटनेचा त्यांनी उल्लेख केला. पण तो अगदीच ओझरता होता. म्हणजे गोरखपूर राहू द्या, त्यांनी राज्याचं म्हणजे उत्तरप्रदेशाचंही नाव घेतलं नाही. मागच्या वर्षीप्रमाणे याही वेळी त्यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कशाचा उल्लेख असावा याबद्दल नमो ऐपवर लोकांकडून सूचना मागवलेल्या. त्यावर अगदी सूचनांचा भडिमार झालेला. कुणी म्हणत होतं एक झाड लावल्याशिवाय आणि ते जगवल्याशिवाय जन्माचा दाखला मिळणार नाही असा कायदा करा तर कुणाला अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर मंदिर किंवा मशीद बांधण्याऐवजी तिथे एखादी शाळाच बांधा...एक ना दोन अशा तब्बल ८ हजार सूचना या ऐपवर पडल्या.
स्वातंत्र्यांच्या 70 वर्षांचं निमित्त साधून ‘संकल्प ते सिद्धी’ असा कार्यक्रम सरकारनं जाहीर केलाय. म्हणजे आणखी पाच वर्षांनी स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. त्यासाठी एका नव्या भारताचं स्वप्न मोदींनी उभं केलं. 1 जानेवारी 2018 हा दिवस साधारण असणार नाही असंही त्यांनी सांगितलं. कारण नव्या शतकात जन्मलेले लोक या दिवशी 18 वर्ष पूर्ण करतील. म्हणजे 2019 च्या निवणुकीतला नवा मतदार हा 21 व्या शतकातला असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
स्वातंत्र्यदिनाचं भाषण हे प्रत्येक पंतप्रधानाच्या व्यक्तिमत्वाची उंची, देशवासियांसाठी त्यांचा कनेक्ट दाखवणारं असतं. भाषणबाज पंतप्रधान इतरत्र सतत बोलत राहिले तरी या दिवशी ते काय बोलतात याकडे जरा जास्त लक्ष असतं. देशवासियांना संबोधित करण्याचं हे सगळ्यात मोठं व्यासपीठही आहे.
इतिहासात पंतप्रधानांच्या कार्याचा आढावा घेताना, त्यांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणांचाच जास्त आधार घेतला जातो. मोदी हे मुळातच भाषणकौशल्यात फार हुशार असे गृहस्थ आहेत. छोटे छोटे शॉर्टफॉर्म तयार करायचे, अवघड विषयही लोकांना समजेल अशा भाषेत सांगायचे ही त्यांची खुबी. मेक इन इंडिया, स्वच्छ भारतचा नारा मोदींनी लाल किल्ल्यावरुनच दिलेला. प्रत्येक पंतप्रधानाची भाषणाची शैली वेगळी असेल, पण लाल किल्ल्यावरुन सर्वांनीच देशाला एक नवी व्हिजन द्यायचा प्रयत्न केलाय. गेल्या तीन पंतप्रधानांच्या भाषणाचं तांत्रिकदृष्ट्या सर्वेक्षण करणा-या एका संस्थेचे निष्कर्ष याबाबतीत फारच गंमतीशीर आहेत. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी या तीन पंतप्रधानांच्या भाषणांचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलाय. त्यावर मोदींनी लाल किल्ल्यावरच्या आपल्या भाषणात ‘Sister’, ‘brother’ आणि ‘team’ हे तीन शब्द सर्वाधिक वेळा वापरलेत. तर मनमोहन सिंग यांच्या भाषणात ‘our’, ‘growth’ आणि ‘education’ हे तीन शब्द सर्वाधिक वापरले गेलेत. लोकांशी जोडण्यासाठी कुठले शब्द जास्त प्रभावी आहेत याचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. वाजपेयींनी लाल किल्ल्याच्या व्यासपीठावरुन ‘shall’, ‘Kashmir’ आणि ‘india’ हे तीन शब्द जास्तीत जास्त वापरलेत. ही पाहणी तांत्रिक असली तरी त्याचे एका ओळीचे हे निष्कर्ष प्रत्येक पंतप्रधानाच्या व्यक्तिमत्वाचं अंतरंग उलगडून दाखवणारी आहे. सतत brothers and sisters करणारे मोदी हे लोकांशी संवाद साधण्यात प्रभावी आहेत, our असा उल्लेख करणारे मनमोहन सिंह हे जास्त सर्वसमावेशक भूमिकेतले आहेत, shall मधून वाजपेयी हे किती नवी स्वप्नं पाहणारे होते हे दिसतं.
15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण दिल्लीत जवळून बघण्याची संधी मिळाली. लाल किल्ला हा एरव्ही तसा दुर्लक्षित असतो. त्याच्या अवतीभवती ज्या पद्धतीनं लोकवस्ती वाढलीये,ती पाहता या ऐतिहासिक वास्तूला एकप्रकारची कळा आल्याचं जाणवतं. पण पंधरा ऑगस्टला या लाल किल्ल्याची वास्तू अगदी उजळून निघते. लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटमधून पंतप्रधान जेव्हा प्रवेश करतात तेव्हा 17 व्या शतकातल्या या वास्तूचं रुप अगदी पाहण्याजोगं असतं. खरंतर स्वातंत्र्यदिनाचं भाषण या लाल किल्ल्यावरुन व्हावं हा अगदीच सुवर्णयोग. कारण हा किल्ला इंग्रजांविरोधातल्या लढाईचं,वसाहतवादाविरोधातलं एक प्रतीक आहे. मुघल बादशहा शाहजहाननं बांधलेला हा किल्ला वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या नावांनी ओळखला गेलाय. किला-ए-मुबारक ( नशीबवान किल्ला), किला-ए-शहाजहांबाद ही त्याची काही आणखी नावं. 1857 चं बंड असो किंवा सुभाष चंद्र बोस यांचं ‘चलो दिल्ली’चं आवाहन असो...इंग्रजांशी लढणा-या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तेव्हा हाच लाल किल्ला होता. त्यामुळेच इथून भारताचे पंतप्रधान जेव्हा स्वातंत्र्यदनाचं भाषण करतात तेव्हा तो इतिहासाचा एक काव्यगत न्यायच म्हणायला हवा.
दिल्लीदूत : लाल किल्ल्यावरुन 'मन की बात'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2017 09:44 PM (IST)
लाल किल्ल्यावरुन मोदींचं हे चौथं भाषण होतं. यावेळी आपलं भाषण लवकर संपवण्याचं वचन जनतेला दिल्यानं त्यांनी ते ५५ व्या मिनिटाला आटोपलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -