बरबादे गुलिस्ता करने को बस एकही उल्लू काफी था

हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा?

सर्जिकल अटॅकनंतर गेल्या आठवडयात राजधानीत जो खेळ सुरु आहे, त्याचं वर्णन या एका शायरीतच व्यक्त करता येईल. त्यामुळे प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते संबित पत्रांनाही याच ओळी आठवल्या तर त्यात आश्चर्य काहीच नाही. केजरीवाल, चिदंबरम, दिग्विजय सिंह यांनी व्हिडिओ जाहीर करुन पुरावे देण्याची मागणी केली. तर संजय निरुपम यांनी त्यापुढे जाऊन हा सर्जिकल अटॅक खोटाच वाटत असल्याची राळ उडवून दिली. दोन दिवस या वक्तव्यांवरुन वातावरण तापलेलं होतंच. पण याचा क्लायमॅक्स घडवला तो काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीच. देवरिया ते दिल्ली या किसान यात्रेचा समारोप गुरुवारी दिल्लीत झाला. त्या समारोपात बोलताना राहुल गांधींनी जवानांच्या रक्ताआड लपू नका, त्यांच्या रक्ताची दलाली करु नका असे शब्द वापरले. खून की दलाली ! सायंकाळी सहाच्या सुमारास राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं. त्यापाठोपाठ भाजपच्या 11 अशोका रोडमधली हालचाली वाढली. भाजपच्या चाणक्यांनी याला तातडीनं उत्तर द्यायचं ठरवलं. रातोरात मेसेज आला. उद्या दुपारी 12 वाजता पक्षाध्यक्ष अमित शहा पत्रकार परिषद घेऊन याचा समाचार घेतील.

पुढचं सगळं ऐकण्याआधी पुन्हा थोडंसं रिकॅप करुयात. म्हणजे ज्या दिवशी सर्जिकल अटॅक झाले, त्या दिवशीचं वातावरण. मला खरंच त्या दिवशी फार अभिमान वाटत होता आपल्या राजकीय संस्कृतीचा. म्हणजे अटॅक झाल्याचं लष्करानं जाहीर केलं. त्यानंतर या सगळ्या कारवाईची माहिती द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची तब्येत गेल्या दोन महिन्यांपासून बरी नाहीय. त्यामुळे त्या या बैठकीला स्वतः येऊ शकणार नव्हत्या. तर सुषमा स्वराज त्यांना भेटायला 10 जनपथवर गेल्या. या कारवाईचं ब्रीफिंग सुषमांनी सोनियांना घरी जाऊन दिलं. त्या दिवशी सगळेच राजकीय पक्ष एकमुखात बोलत होते. अशा कारवाईवेळी लागणारं एक राजकीय शहाणपण आपल्याकडे अजून जिवंत आहे हे पाहूनच बरं वाटत होतं. नॉर्थ ब्लॉकच्या पॅसेजमध्ये मीटिंग संपल्यावर ज्या अनेक पक्षाच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्यात कुठंही सरकारवर शंकेचा सूर नव्हता. पण हे छानछोकीचं वातावरण काही फार दिवस टिकलं नाही. चार दिवसातच त्याचा कचरा झाला.

तर मग हे सगळं वातावरण बिनसायला कुठे सुरुवात झाली...खरं तर या आठवड्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये पंतप्रधानांनी आपल्या नेत्यांना बजावलं, की सर्जिकल अटॅकबद्दल फाजील, बढाईखोर वक्तव्यं टाळा. सीमेवरचं वातावरण अजूनही तापलेलं आहे.
पण तरीही या कारवाईबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स लखनौ, आग्र्यात काही ठिकाणी लागले. त्यातही वाराणसीमधले पोस्टर्स हे शिवसेनेचे होते हे विशेष. अर्थात हे पोस्टर्स उत्साहाच्या भरात कुठल्या तालुकाध्यक्षानं लावलेले असावेत, त्याला इतकं सिरियसली घ्यायची गरज नाही असं भाजपचे ज्येष्ठ नेते पत्रकार परिषदेत सांगत होते. दुसरीकडे भाजपनं आणखी एक कूटनीतीचं पाऊल उचललं. यावेळी 11 ऑक्टोबरला दसरा साजरा करायला पंतप्रधान मोदी हे लखनौमध्ये जातील हे जाहीर करुन टाकलं. खरंतर पंतप्रधानांनी दसऱ्याच्या दिवशी दिल्लीतल्या रामलीलेला उपस्थित राहायची एक अघोषित प्रथा. त्यांच्या हस्ते रावणदहनाचा कार्यक्रम होतो. पण यावेळी भाजपनं यूपी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे ठिकाण निश्चित केलं. भाजपच्या या खेळीनं काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढवली नसती तरच नवल. म्हणजे एकतर आधीच सर्जिकल अटॅकमुळे मोदी ब्रँडच्या लोकप्रियतेचा मीटर वाढतोय, त्यात भाजप लखनौमध्ये जाऊन मिरवणार याची कुजबूज 24 अकबर रोडवर सुरु झालेली.

दरम्यानच्या काळात चिदंबरम यांनी एका मुलाखतीत दावा केलेला होता, की सर्जिकल अटॅक तर यूपीएच्या काळातही झालेत. पण आम्ही त्याबद्दल कधी बोललो नाही. तिकडे केजरीवाल महाशयांनी एक व्हिडिओ जाहीर करुन सांगितलं की पाकिस्तान सर्जिकल अटॅक झालेच नाहीत असा दावा करतंय, तर पाकिस्तानचा हा खोटा प्रचार तुम्ही मोडून काढा. या व्हिडिओत त्यांनी पुरावे, किंवा व्हिडिओ द्या असं म्हटलेलं नाही. पण बिटवीन द लाईन्स त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचाच प्रयत्न केला. मुळात पाकिस्तान काही झालं तरी उलट्याच बोंबा ठोकणार, तर त्याला एवढं गांभीर्यानं घेऊन, त्यांच्या दाव्यानं प्रभावित व्हायची काय गरज होती...आणि पुरावे सादर करुन न्यायाची अपेक्षा करायला पाकिस्तान म्हणजे रामशास्त्री बाण्याचं राष्ट्र आहे का...याच्याआधी 26-11 च्या मुंबई हल्ल्यापासून ते देशात कुठेही स्फोट झाल्यावर आपण पुराव्यांचं डोसियरच पाठवत होतो ना पाकिस्तानला...पठाणकोठला तर त्यांच्या पथकासाठी पायघड्या घातल्या. मग त्यानं काय साध्य झालं...त्यामुळे केजरीवाल यांनी कुठे काय चुकीचं म्हटलंय अशी भलामण करायचा प्रयत्न करु नये. मुळात पाकिस्तान सोडून दुसरं एकही राष्ट्र म्हणत नाहीय की सर्जिकल अटॅक झाला नाहीय. केजरीवाल यांचा निशाणा पाकिस्तानवर असला तरी त्यांचं लक्ष्य मोदी आणि केवळ मोदीच होते.

निरुपम यांचं हे वक्तव्य तर त्यांच्या एकूण आजवरच्या कारकीर्दीला शोभणारंच होतं. निरुपम यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी बोलणं झालं. तेव्हा सगळ्यांनी या वक्तव्याचा निषेध केला. या वेळी असा शहाणपणा दाखवायची गरज नव्हती, स्वतःला अतिशहाणे समजणाऱ्या लोकांचा हा असा प्रॉब्लम असतो. लोकांची भावना काय आहे हे यांना समजत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्याच एका नेत्यानं दिलेली. पण अर्थात निरुपम यांच्या या उचापतीनंतरही त्यांना हायकमांडकडून अभयच मिळणार होतं. उलट त्यांचे नेते यापुढचं पाऊल टाकणार आहेत हे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झालं. देवरिया ते दिल्ली या 25 दिवसांच्या किसान रॅलीचा समारोप दिल्लीत होत होता. पण या महिनाभराच्या कष्टाचा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवाज देशवासियांपर्यंत पोहचावं या हेतूने वक्तव्य करण्याऐवजी या रॅलीत राहुल गांधींनी मीडियाला हेडलाईन दिली ती खून की दलाली या वाक्याची.. या वाक्याचा परिणाम असा होता. गुरुवारी संध्याकाळी हे वक्तव्य झालं. शुक्रवारी सकाळपासून दिल्लीत दिवसभर एकापाठोपाठ एक मॅरेथॉन पत्रकार परिषदा सुरु होत्या. राहुल गांधींचा समाचार घ्यायला 12 वाजता अमित शहा. त्यांना उत्तर द्यायला 2 वाजता काँग्रेसचे कपिल सिब्बल. या पत्रकार परिषदेत सिब्बल यांनी जैश ए महंमद स्थापन व्हायला कारणच भाजप आहे, कारण त्यांनी मसूद अजहरची सुटका केली असा आरोप केला. त्याला उत्तर द्यायला लागलीच 4 वाजता भाजपच्या रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद. आणि पुन्हा 6 वाजता त्यावर काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला..

पत्रकार परिषदेत अमित शहांनी 'राहुल गांधी के मूल में खोट है' असं एक वाक्य उच्चारलं होतं. त्यावरुन पत्रकारांमध्ये कुजबूज सुरू झालेली. नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? असा प्रश्न विचारल्यावर याचा अर्थ त्यांच्या आईच्या विदेशीपणाबद्दल जोडू नका. काँग्रेसच्या विचारधारेतच खोट आहे असं म्हणायचं असल्याचं सांगितलं. शिवाय वर 'अच्छा हुआ, तुमने ये पूछ लिया. बचा लिया मुझे ' अशी हसतहसत कमेंट केली. पण काँग्रेस ही संधी थोडीच जाऊ देणार होती. कपिल सिब्बलांच्या पत्रकार परिषदेची सुरूवातच मुळी या वाक्यावरून झाली. अब तडीपार होनेवाले हमें बताएंगे क्या, कि किसके मूल में खोट है? अशी सुरूवात करत पहिली पाच मिनिटे त्यांनी या एकाच मुद्द्यावर फायरिंग केलं. मूळ विषय बाजूला ठेवून हव्या त्याच मुद्द्यावर वाद न्यायचा हा प्रयत्न दोन्ही बाजूंनी दिसत होता.

मौत का सौदागर...जहर की खेती...यानंतर काँग्रेसनं मोदींवर केलेला हा आणखी एक तिखट वार...खून की दलाली...ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी म्हटल्याप्रमाणे कदाचित काँग्रेसवाले 80 च्या दशकातले सिनेमे जास्त पाहत असल्यामुळे त्यांना अशा कॅचलाईन सुचत असाव्यात. अर्थात आधीच्या आठवड्यात सुषमा स्वराज यांनी युनोत जिनके घर शीशे के होते है...तर सिंधु नदीच्या पाण्यावरुन मोदींनी खून और पानी एक साथ नही बह सकते हा डायलॉग हाणलेला. हे डायलॉग काहीसे 70 च्या दशकात वाटणारे आहेत ना.?  असो. पण गंमत म्हणजे त्या दिवशी जेव्हा अमित शहांची पत्रकार परिषद होत होती. तेव्हा भाजपचे नेते राहुल गांधींनी हा सेल्फ गोल केल्यानं खुशीतच होते. खरंतर आम्ही पत्रकार परिषद घ्यायच्या आधी राहुलबद्दल एक धन्यवाद प्रस्ताव पारित करायला पाहिजे अशी एका भाजप नेत्यानं हसता हसता केलेली कमेंट होती. मौत का सौदागर हे विधान गुजरात निवडणुकीवेळचं, त्यात भाजपचा मोठा विजय झाला. जहर की खेती हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळचं. त्याचे परिणाम सगळ्यांना माहिती आहेत. आणि आता खून की दलाली..लवकरच युपीच्या निवडणूका आहेत. अशी एक संगती या भाजप नेत्याच्या डोक्यात होती. शिवाय भाजपच्या लोकांचं म्हणणं होतं की 1971 चं युद्ध आठवा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचं कौतुक करताना वाजपेयींनी त्यांना दुर्गा म्हटलेलं होतं. जे कुणी काँग्रेसवाल्यानंही केलं नव्हतं, त्या शब्दांत कौतुक करण्याचा मनमोकळेपणा वाजपेयींनी दाखवला. त्यामुळे आता किमान कौतुक नको, किमान चिखलफेक तरी थांबवा.

अर्थात इंदिरा गांधींनी त्यावेळी एक युद्ध जिंकलेलं होतं. इथं फक्त एक कारवाई झालीय. कुठल्याही क्षणी पाकिस्तान प्रत्युत्तर देऊ शकतं अशी स्थिती आहे. ही कारवाई धडाक्याची असली तरी ती काहीशी नियंत्रणात्मकच होती. त्यामुळे इतक्या लवकर युद्ध जिंकल्याचा उन्माद डोक्यात जाणं योग्य नव्हे. दुसरा मुद्दा लष्करानं एखादी गोष्ट सांगितल्यावर तो आपल्यासाठी पुरेसा नाही का याचा..अर्थात काही खुमखुमी बाण्याच्या पत्रकारांना अशी कुठली गोष्ट लगेच मान्य करण्यात कमीपणा वाटतो. त्यामुळे लष्कर असलं म्हणून काय झालं, त्यांच्यावरही आपण प्रश्नचिन्ह निर्माण करु शकतो. त्यांनी सांगितलं की सगळं सत्य असं का मानायचं असं काहीचं म्हणणं आहे. यातला एक मुद्दा बरोबर आहे. लष्करानं सांगितलेलं अंतिमच असलं पाहिजे असं नाही. देशांतर्गत कारवाईबद्दलचे काही प्रश्न असतील तर तिथं जरुर प्रश्न उपस्थित करावेत. पण किमान अशा परकीय आक्रमणावेळी तरी लष्कराला प्रश्न विचारुन, त्यांच्यावर शंका घेऊन हैराण करण्याऐवजी त्यांना त्यांचं काम करु द्यावं. शिवाय पाकिस्तान किंवा इतर देशांप्रमाणे आपल्या लष्कराचं राजकीयकरण झालेलं नाहीय. दिलेली चौकट कधीही न ओलांडता भारतीय लष्करानं एक प्रकारे या देशाची लोकशाहीच दृढ केलीय. त्यामुळे पत्रकारितेच्या भाषेत तुम्ही कुठल्या राष्ट्राचे नसता हे खरं असलं तरी किमान अजून भारतीय लष्कराच्या दाव्यावर, तेही परकीय कारवाईबद्दलच्या प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आलीय असं वाटत नाही.

एकूण काय तर खून की दलालीचा हा एपिसोड दिल्लीत जोरदार गाजला. 24 अकबर रोड आणि 11 अशोका रोड या मुख्यालयांना जणू युद्धभूमीचं रुप आलेलं. दोन्ही बाजूंनी वाग्बाणांचा मारा सुरु होता. थिंक टँक एकदम वॉर रुम बनल्या होत्या. एकापाठोपाठ एक फेकली जाणारी शब्दास्त्रं पकडताना दिल्लीतल्या पत्रकारांचीही दमछाक होत होती. भारत पाक सीमेपेक्षाही इथलाच युद्धज्वर जास्त पेटलेला होता. फरक इतकाच की इकडच्या लढाईत शिल्लक फक्त चिखलच राहणार आहे. 1999 ला कारगील युद्ध झालं, त्यावेळी मीडियाचा पसारा एवढा वाढलेला नव्हता. त्यामुळे सर्जिकल अटँकची बातमी आल्यानंतर आता मीडिया याचं कव्हरेज कसं करणार, त्यात उथळपणा दिसणार का असा एक विचार मनात येत होता. पण झालं उलटंच. उथळपणात मीडियाच्या पुढे नेत्यांनीच बाजी मारलीय. यूपीच्या निवडणुका सुरु झाल्या की कळेल, जास्त चिखलात कुणी हात बरबटून घेतलेत ते.

दिल्लीदूतमधील याआधीचे ब्लॉग :


दिल्लीदूत : पाकिस्तानसोबत आता साम-दाम-दंड-भेद!


दिल्लीदूत : रामचंद्र गुहा असं का म्हटले असतील?


दिल्लीदूत : जेएनयूमधला ‘गुलाल’ नेमके काय इशारे देतोय?


दिल्लीदूत: आग्र्याहून सुटकेचा थरार अनुभवताना…


दिल्लीदूत : एकत्र निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी आग्रही का?


दिल्लीदूत : जीएसटीच्या ऐतिहासिक चर्चेतले 10 किस्से..