कालच दशक्रिया सिनेमाचा ट्रेलर पाहिला. ट्रेलरमुळे सिनेमाचा विषय चांगला वाटला. यातील एक सीन पाहून तर शालेय जीवनात शिकलेला 'स्मशानातील सोनं' धडा आठवला. कारण, यातील एक व्यक्तीरेखा त्या धड्यातील 'भीमा' या व्यक्तीरेखेसारखीच वाटली. सध्या दशक्रिया या सिनेमाला ब्राह्मण समाजाकडून विरोध होत आहे. पण हा विरोध कशासाठी हे मात्र कळत नाही. ब्राह्मण समाजाच्या मते, या सिनेमातून संपूर्ण समाजाची बदनामी होत आहे. पण ट्रेलर पाहून तर तसं मूळीच वाटत नाही. उलट यातून काही कर्मठ ब्राह्मण कशाप्रकारे सर्वसामान्यांना (तो स्वतः ब्राह्मण असला तरी) लूटतात हे दाखवण्यात आलंय. आणि हे खरंच आहे.


सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एके ठिकाणी दाखवण्यात आलंय की, दशक्रिया विधीसाठी 'गोदान' केलं तरच मृतात्म्यास सद्गती मिळते. पूर्वी या दशक्रियेसाठी खरी गाय ब्राह्मणाला दान मिळायची. पण आता चांदीची गाय दान म्हणून द्यावी लागते. जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसेल, तरीही त्याला पर्याय नाही. शास्त्राचा दाखला देऊन त्याच्याकडून बळजबरीने करुन घेतलंच जातं.

काही दिवसांपूर्वीच माझ्या एका जवळच्या मित्राच्या वडिलांचं अपघाती निधन झालं. अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला डॉक्टरांनी आम्ही त्यांना वाचवू म्हणत आयसीयूमध्ये दाखल केलं. पण तीन दिवसानंतर डॉक्टरांनी आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही, म्हणून हात वर केले. यानंतर डॉक्टरांनी रुग्णालयाचं बिल केलं, पाऊण लाखाच्या आसपास. अन् बिल भरल्याशिवाय पार्थिव देणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. यानंतर त्या मित्राची पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड सुरु होती. कसेबसे पैसे गोळा करुन भरले आणि अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घरी आणलं.

पण यावेळी वेगळीच अडचण. गावात मोजकीच ब्राह्मण कुटुंबं आणि त्यातही शेवटचं कार्य करणारं कुणीच नाही. त्यामुळे दूरच्या गावावरुन एक भटजी आणावा लागला. त्यानं अंत्यसंस्काराचे बक्कळ पैसे घेतले. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी त्यांनी दुसरा ब्राह्मण शोधला. तोही तसाच. एका दिवसाच्या दशक्रिया विधीसाठी त्यानं 10 हजार दक्षिणा सांगितली. पण नंतर कमीजास्त करुन शेवटी सात हजारावर तो तयार झाला. मात्र, दशक्रिया विधीसाठी साहित्याची भली मोठी यादी दिली. या यादीत शिदा, नवीन वस्त्र, चांदीची गाय, एक ना अनेक गोष्टी होत्या. त्यासर्व आणून दिल्यानंतर यांनी हा विधी संपन्न केला. अन् दान म्हणून मिळणाऱ्या सर्व वस्तू स्वतःच्या झोळीत टाकल्या. पण यावेळी त्यानं कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली नाही. वास्तविक, तेही ब्राह्मणच होतं. पण तरीही त्याने त्यांच्या परिस्थितीकडे पाहिलं नाही.

आता या दशक्रिया विधीनंतर आणखी काही विधी असतात, ज्यातून हे भटजी सर्वसामान्यांना लूटतात. ते म्हणजे नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध. हे तिन्ही विधी संबंधित व्यक्तीच्या पितरांना गती मिळावी, या उद्देशाने केले जातात, असं सांगितलं जातं. तसेच त्यासाठी ‘प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या एक दशांश खर्च करावा’, असे शास्त्र सांगते, अशीही बतावणी केली जाते. यातही पुन्हा त्या संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ठीक आहे का नाही? हे पाहिलं जात नाही.

शिवाय, विधी करण्याकरिता पुरुषांसाठी नवं धोतर, उपरणं, बनियन, तर महिलांसाठी साडी व इतर कपडे खरेदी करण्यास सांगितले जातात. विशेष म्हणजे, हे सर्व विधी संपल्यानंतर नंतर ती वस्त्रे दान करायला लावतात, हे वेगळं. त्याशिवाय या विधीसाठी सुवर्ण नाग तोही कमीतकमी सव्वा ग्रॅमचा, पूजेसाठी आणावा लागतो. तोही पूजेनंतर यांच्याच झोळीत जातो. अन् वरुन दक्षिणा मिळते ती वेगळीच. हे सर्व करायचं का? तर मृतात्म्यास मोक्ष मिळावा म्हणून.

त्यासाठी या भटजींचं फावतंय, कारण दशक्रियेचे विधी करण्यासाठी सर्वसामान्य भटजी तयार होत नाहीत. कारण हे करणाऱ्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं म्हणे. पण हे दशक्रिया करणारे किती भटजी प्रायश्चित्त घेतात देवच जाणे. मात्र, जन्माला येताना जितके विधी होत नाहीत, त्यापेक्षा जास्त विधी मृत्यूनंतरच्या 13 दिवसात करुन घेतले जातात. त्यावर ब्राह्मण महासंघाकडून 'ब्र' ही काढलं जात नाही. विधीच्या नावावर हे इतकी लूट करतात की, त्या गरीब ब्राह्मणाचं कुटुंबच कर्जबाजारी होतं. त्याला सोडवण्यासाठी कोणी येत नाही. केवळ सर्व येऊन सांत्वन करुन, चांगलं दहा दिवस खाऊन जातात. अन् या दुकानदारीवर सिनेमातून भाष्य केलं तर त्याला विरोध का व्हावा? हे विचित्रच म्हणावं लागेल.