थोर्थोर लेखक पु. ल. देशपांडे आणि मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ कलाकार शरद तळवलकर यांची पहिली भेट झाली त्याचा हा किस्सा....पटकथा लेखक वसंत सबनीसांनी त्यांची  ओळख करून देताना म्हटले, "हा माझा मित्र शरद तळवलकर."
"अरे व्वा! चांगला माणूस दिसतोय हा", पु.ल. म्हणाले.
सबनीसांनी विचारलं..."तुला कसं कळलं बुवा?"
"अरे याचं नावच बघ ना, शरद तळवलकर! काना, मात्रा, वेलांटी, आकार-उकार काही तरी आहे का याच्या नावात? त्याच्या नावासारखाच तो सरळ असणार." इति पु.लं!


आता या किश्श्यात आणि शरद पवारांमध्ये काय साम्य आहे? असं वाचणाऱ्याला वाटू शकेल. कारण, एकतर पवारांच्या नावात ‘काना’ आहे आणि दुसरं म्हणजे ते नेहमीच्या पठडितल्या अर्थानं ‘सरळ’ नाहीत. मात्र, मुळात ही अपेक्षा राजकारणातल्या व्यक्तीकडनं ठेवणंच चूक आहे असं मला वाटतं. कारण हा प्रदेशच चौसष्ठ घरांच्या बुद्धीबळाचा मात्र जिथं काळ्याच काय पण पांढऱ्या सोंगट्यांकडूनही हत्तीचा घात होऊ शकतो आणि वजीरच काळ्या किंवा पांढऱ्या राणीला फितूर होऊ शकतो. अशा या राजकारणात ‘सरळ’ असण्याचा अर्थ एकच...सरळ सरळ धूर्त असणे! शरद पवार त्या अर्थानं खरंच ‘सरळ’ म्हणजे आपल्या राजकारणाबाबत Straight-स्पष्ट आहेत. त्यामुळेच  त्यांच्या कुठल्याच वागणुकीचा-बोलण्याचा आपापल्यापरिनं गृहित अर्थ काढू नये, तुमची फसगत नक्की होऊ शकते. त्यांच्या उक्ती-कृतीचा अंतिम अर्थ काढण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे. मात्र, धूर्तपणाच्या एकाच निकषावर पवारांना मोजणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. महाराष्ट्राच्या-देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक राजकारणाचे ते उत्तम जाणकार आहेत. राज्यातल्या मंत्रिपदापासून ते संरक्षणमंत्री, कृषीमंत्री पद व्हाया असंख्य संस्थांचे (वसंतदादा शुगर, कुस्तीगीर परिषद, रयत शिक्षण वगैरे वगैरे) अध्यक्ष, प्रचंड जनसंपर्क असा हा त्यांचा पन्नासहून अधिक वर्षांचा करियर कॅनव्हास आहे.

नमनाला हे घडाभर तेल यासाठी कारण अशा थोर्थोर व्यक्तीसोबत दुष्काळ दौऱ्यावर जाण्याची अचानक संधी मिळाली.  तेव्हा पवारांसोबत वावरताना या सगळ्याचा अदृश्य ताण तुमच्यावर असतो. मी राज ठाकरेंची मुलाखत घेतलीये, प्रकाश आंबेडकरांसोबत लाईव्ह वाद झालाय, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना बीडमध्ये ‘रणसंग्राम लोकसभेचा’ या आमच्या लाईव्ह कार्यक्रमात प्रश्न विचारलेत (तिथे त्यांचे कट्टर समर्थक जमले होते, मला आठवतंय, मी  “गोपीनाथ मुंडे आपल्यासोबत आहेत” असं कार्यक्रमाच्या सुरूवातीला म्हटलं तर समर्थकांनी “गोपीनाथराव म्हणा...” असा गलका केला होता). सांगायचा मुद्दा असा की तेव्हाही मला कधी ताण जाणवला नाही पण यावेळी स्थिती वेगळी होती. पवारांसोबत दोन दिवस असणार होतो, त्यांची मुलाखतही घ्यायची होती. अधेमधे त्यांच्याशी बोलणं होणार हे तर उघडंच. राजकारण्यांचे टॅट्रम्स माहित असल्यानं शदर पवार आपल्याला कसं वागवतील यावर सगळ्या दौऱ्याचा टोन सेट होणार होता....

सोमवारी रात्री निघून सकाळी 8 ला बारामतीला ‘गोविंदबागे’त आलो.  पवारांच्या वेळेच्या शिस्तीचे इतके किस्से ऐकले असल्यानं दिलेल्या वेळेच्या तासदीडतास आधीच आलो होतो. गोविंदबाग हे निवासस्थान एखाद्या सिरियलच्या सेट इतकं देखणं आहे. दारापाशीच गाय-वासरू यांचं शिल्प आहे. कधीकाळी हे काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. घरातून मागे हिरवळीवर खुल्या होणाऱ्या भागात पवार आणि ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे बसले होते. थोडं औपचारिक बोलणं झाल्यावर आम्ही निघालो. बारामती विमानतळावर हेलिकॉप्टर गाठण्यापूर्वी बारामती कृषी विज्ञान केंद्रात (KVK) जाणं झालं. KVK हा एका मोठ्या लेखाचा विषय आहे. मात्र, प्रयोगशाळेतलं तंत्रज्ञान बांधावर न्यायचं म्हणजे काय करायचं? त्याचं मॉडेल म्हणजे KVK होय. शेतीत रस असणाऱ्या किंवा अन्य कुणालाही निसर्गाची करणी मानवी शास्त्राच्या हस्तक्षेपानं  किमयेत कशी बदलता येऊ शकते, हे पाहायचं असेल तर कधीकाळच्या खडकाळ नापीक जमिनीवरून आता हिरवाईच्या कुशीत वसलेल्या  KVKत जावं लागेल. तिथून पुढे एअरपोर्टपर्यंत जाताना पवारांनी बारामतीतले उद्योग-धंदे,स्थित्यंतरं यांची माहिती दिली. आज दिवाळीत मराठी माणसं अनेकांना सर्रास ‘फरेरो रॉशर’चे सोनेरी लाडू-चॉकलेट देतात. ते ‘स्विस मेड’ असल्याचा गोड गैरसमज आहे. ती ‘फरेरो’ची फॅक्टरी बारामतीत आहे. इथपर्यंत पवारांची पटकन लक्षात आलेली बाब म्हणजे गोविंदबागेतली झाडं-फुलं असोत की KVK किंवा बारामतीतले उद्योग...पवार त्यावर भरभरून बोलतात.

आमचा दौरा पहिल्या दिवशी सांगोला, मंगळवेढा आणि दुसऱ्यादिवशी उस्मानाबाद असा असणार होता. बारामतीहून हेलिकॉप्टरनं सांगोल्याचा प्रवास सुरू झाला. हा दौरा सुरू होण्यापासून माझ्या मनात एक गोष्ट घोळत होती की लोकसभेचं मतदान संपल्याच्या दोनच दिवसात पवार दुष्काळ दौरा करण्यातून काय संकेत देताहेत? दुष्काळाची तीव्रता पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत शेती, शेतकरी आणि परिणामी ग्रामीण जनतेचे प्रश्न हेच केंद्रस्थानी राहणार आहेत का? ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असल्याचं पवारांनी जोखलंय का? दौऱ्या दरम्यान मी जितकं समजावून घेत होतो त्यावरून तरी या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशीच येत होती.

सांगोला. सोलापुरातला सांगोल्याचा भाग डाळिंब्यांसाठी प्रसिद्ध. इथली डाळिंब प.बंगाल, बांग्लादेश आणि आखाती देशात निर्यात होतात. कलकत्त्यातील व्यापारी तर सांगोल्यात मुक्काम ठोकून व्यवहार करतात. कमी पाण्यात, पुरेशा मशागतीवर एकरी सर्व खर्च जाऊन ४ लाखांपर्यंत उत्पन्न देणाऱ्या डाळिंबानं सांगोल्याचा चेहरा मोहरा बदललाय. इथल्या तरूणांनी बोलताना सांगितलं की, वयात आलं की इथलं पोर ट्रॅक्टर चालवायला शिकतं. कॉलेजापर्यंत फारसं कुणी जात नाही. मात्र ही सगळी टेम्भू-म्हैसाळच्या 5व्या कालव्याची कृपा. पावसानं साथ दिली तर चांगभलं! मात्र, यंदा स्थिती बिकट आहे. अजनाळे-मंगेवाडीतल्या जनावरांच्या छावणीत दुष्काळाच्या झळा सोसत बसलेली जित्राबं आणि माणसं त्याची साक्ष होती. जी छावणी जानेवारीतच सुरू व्हायची ती आता सुरू झालेली. तोपर्यंत बारामतीच्या आठवडी बाजारात सांगोल्यतली जनावरं पोचली होती. परिसरात ज्यांना जमलं त्यांनी धोतरं-लुगड्यांनी डाळिंबं तगवली होती तर अनेक ठिकाणी बागा जळून गेल्या होत्या. ही स्थिती शेतकऱ्यांची तर शेतमजूरांचं काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी. 40 डिग्री उन्हात 79 वर्ष वयाच्या पवारांसमोर हीच सारी परिस्थिती छावणीच्या तात्पुरत्या शेडमध्ये लोक सांगत होते. निवेदनं दिली जात होती. आमदार गणपतराव देशमुख पवारांना अन्य माहिती देत होते. मध्येच गलका व्हायचा मग पुन्हा एक एक करून निवेदनं. मी आणि आमचा कॅमेरा बघत होतो. दुष्काळ, पूर, भूकंप अशा आपत्तींची हेलिकॉप्टर पाहणी करणं वेगळं आणि त्याचा सभोवताल तिथं उतरून पाहणं निराळं....

पुढे एके ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पवार आणि अन्य काही लोकांची भाषणं झाली. मध्यम वयीन, म्हातारीकोतारी, तरूण-बापे थोड्या बाया आलेल्या. विषय हाच दुष्काळ वगैरे. ग्रामीण भागाचं मला भावणारं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय घटनांबद्दल ते सजग असतात. राजकारण्यांच्या सभा भले कंटाळवाण्या असतील पण ग्रामस्थ त्यात सहभागी होऊन राजकारणाचा भाग बनत असतात. त्याशिवाय त्यांना गत्यंतरच नसतं! दरम्यान, राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांच्या निधनाची बातमी आली. पवारांनी दौरा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी उस्मानाबादला जाणं खुंटलं.

पत्रकाराचं एक विचित्रंच असतं. सोयर आणि सुतकाची चिंता करून चालत नसतं. पवारांचा दौरा रद्द झाल्यानं सकाळी बारामतीहून निघालेलो आम्ही दुपारीच परतणार होतो. माझ्या हाती अजून काही बातमीमूल्य असलेला ‘ऐवज’ लागला नव्हता. दुसऱ्या दिवशी मुंबईला जाणं भाग होतं. रिकाम्या हातानं जाणं पटणारं नव्हतं. मी पवारांना संध्याकाळी ‘गोविंदबागे’तच मुलाखत देण्याची विनंती केली आणि पवारांनीही ती मान्य केली. आम्ही बारामतीला परतलो. संध्याकाळी मुलाखत झाली. मुलाखतीचा एक भाग 60व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्रावर पवारांचं भाष्य असा होता. दुसरी एक छोटी मुलाखत ताजी राजकीय परिस्थिती, मुद्दे यांना घेऊन होती. प्रत्येक उत्तरागणिक मला कळत होतं की ही मुलाखत स्फोटक आहे. खासकरून ईव्हीएममशिनवरील पवारांच्या वक्तव्याला सर्वच ठिकाणी ठळक प्रसिद्धी मिळाली. एका वाहिनीच्या कार्यक्रमात तर पंतप्रधान मोदींनाही यावर विचारलं गेलं. आजही त्याचं कवित्व सोशल मीडियावर सुरू आहे. माझ्यासाठी मात्र; पवारांनी आघाडीला मनसेचा विधानसभेसाठी विचार करावा लागेल, असं म्हणणं ही मोठी बातमी होती. विधानसभेच्या चर्चांच्या वादळाची सुरूवात अशाप्रकारे या मुलाखतीनं बारामतीतून केली.

एक पूर्ण दिवस पवारांसोबत मला अनुभवता आला. अनेक वर्ष त्यांच्या सेवेत असलेले त्यांचे वाहन चालक गामांनाही यानिमित्त भेटता आलं. पवारांचे स्वीय सहाय्यक आणि कवी असलेले सतीश राऊत (ते मुळात उपजिल्हाधिकारी आहेत) मुंबईपर्यंत सोबत होते. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यासोबत काम करणं, त्यांचा दृष्टीकोन याबद्दल अनेक गोष्टी राऊतांकडून समजल्या. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हे लिहिलंय. ते किस्से मुळातूनच वाचण्यासारखे!

पवार सध्या सत्तेत नाहीत. मात्र, सत्तेत असोत वा नसोत; त्यांच्या भूमिकेला गांभीर्यानं घेतलं जातं. हिंदीत पर्व या शब्दाला समानार्थी शब्द दौर आहे. आज त्या अर्थानं पवारांचा ‘दौर’ नसला तरी त्यांचा याही वयात अव्याहत सुरू असलेला दौरा ‘नवा दौर’ आणणारच नाही असंही नाही....