सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैशाळमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडणारी घटना उघडकीस आली. वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासणाऱ्या या घटनेत म्हैशाळमधील एका हॉस्पीटलच्या परिसरात तब्बल 19 स्त्री जातीच्या अर्भकांचे अवशेष सापडले. या घटनेनं केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे नावाच्या महाभागानं कोवळ्या कळ्यांना तिच्या मातेच्या उदरातच नख लावण्याचं काम केलंय. या घटनेनं सांगलीसारख्या पुरोगामी जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासली गेली आहे. काल त्याला मिरज पोलिसांनी बेळगावमधून अटक केली असली, तरी अशी सडकी मनोवृत्ती असलेल्या डॉक्टरांचा त्यांच्या शैक्षणिक आवस्थेतच बंदोबस्त कराण्याची गरज आहे.
वास्तविक, सांगली जिल्ह्यातील मिरज शहराची ओळख केवळ पश्चिम महाराष्ट्रालाच नव्हे, तर महाराष्ट्र आणि जगाला एक प्रमुख वैद्यकीय केंद्र म्हणून आहे. या शहरात केवळ राज्यातीलच नव्हे, तर परदेशातलेही अनेक रुग्ण इथं उपचाराला येतात. अशा या डॉक्टरांची पंढरी असलेल्या शहरापासून केवळ 10 किमी दूर असलेल्या म्हैशाळमध्ये ही घटना घडल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय.
मिरजेच्या इतिहासात वैद्यकीय क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. यात मिरजेचे तत्कालिन संस्थानिक गंगाधरपंत पटवर्धन यांनी आपल्या संस्थांनच्या उत्पन्नातून आवश्यक ती सर्व मदत देऊ केली. शिवाय ब्रिटीश काळामध्ये अमेरिकेतून अलेल्या मिशनरी डॉक्टर विल्यम वानलेस हे इथला हवामानाच्या प्रेमात पडले, आणि त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीनं इथं वैद्यकीय सेवा सुरु केली, शाहू महाराजांमुळेच डॉक्टर वानलेय यांनी 1894 साली मिशन हॉस्पिटलची स्थापना केली. त्याचबरोबर टी.बी.सॅनिटोरियम, रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, मिरज वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक संस्था नंतरच्या काळात सुरु झाल्या. डॉ. वानलेस यांनी एकप्रकारे वैद्यकीय सेवेचं बीजारोपणच या शहरात केलं. त्यानंतर आलेल्या त्यांच्या सेवाभावी सहकार्यांनी त्याचा विस्तार केला. मिशन हॉस्पिटलला आता शंभर वर्ष झाली आहेत, पण या हॉस्पीटलमध्ये सर्व तर्हेच्या आजारांवरचे अद्ययावत उपचार मिळत असेल्याने, देश-विदेशातील रुग्ण आजही इथं उपचाराला येतात.
वैद्यकीय शिक्षणासाठी सुरु केलेल्या मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयातही वैद्यकीय सेवेचं शिक्षण घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी मिरजेत दरवर्षी दाखल होतात, आणि यातले काहीजण तर शिक्षण पूर्ण करुन इथंच स्थायिक होतात. त्यामुळे मिरजेत कुठल्याही गल्लीत वा रस्त्यावरून फिरताना दवाखानेच जास्त पाहायला मिळतात. आता तर याचे प्रस्थ आसपासच्या इतर गावांमध्येही पसरलं आहे. अनेक गावांमध्ये मोठमोठी रुग्णालंयं सुरु झाली आहेत.
दुसरीकडे ज्या गावात ही घटना घडली, त्या म्हैशाळची राज्याच्या जडणघडणीत वेगळी ओळख आहे. कारण या गावचे दिवंगत नेते स्वर्गीय आबासाहेब शिंदे म्हैशाळकर यांनी सहकार चळवळीचा झरा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला. तर त्यांचाच वसा पुढे नेणाऱ्या मोहनराव शिंदे यांनी महिला सबलीकरण आणि स्त्रियांना साक्षर करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि महिला बचत गट सुरु केले. विशेष म्हणजे, या शिंदे कुटुबातीलच एक डॉक्टर अजित शिंदे आपल्या सांगलीतल्या म्हैशाळकर शिंदे रुग्णालयाच्या माध्यमातून गरिब जनतेची सेवा करत आहेत. अशा या जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्याची मान शरमेनं खाली गेली आहे.
ज्या जिल्ह्याने बालगंधर्व, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतदादा पाटील, वी.स. पागे, क्रांतीसिंह नाना पाटील, चिंतामणराव पटवर्धन, सरोजिनी बाबर, मंगेशकर कुटुंबियांसारखी नररत्न राज्याला दिली. त्याच जिल्ह्यात कोवळ्या कळ्यांना नख लावण्याचं काम बाबासाहेब खिद्रापुरकरेसारखे डॉक्टर करताना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे अशा नराधमांवर पोलिसी दंडूका वापरण्यापेक्षा, यांना जाहीरपणे फासावर लटकवलं पाहिजे. तेव्हाच सुदाम मुंडे आणि खिद्रापूरकरेसारखे महाभाग निपजणार नाहीत.
ज्या मातेच्या उदरातून जन्म घ्यायचा, त्याच मातेचं उदर फाडून कोवळ्या कळ्यांना उखडून टाकणाऱ्या राक्षसांना वेळीच ठेचून काढायची गरज आहे. अन्यथा वैद्यकीय क्षेत्राला कलंक असलेली ही मंडळी या स्त्री वर्गाचाच नाश करतील.
खिद्रापुरेसारख्या महाभागांना वेळीच ठेचण्याची गरज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Mar 2017 12:56 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -