फेसबुकवर नुकतीच एका मित्राने गणेशोत्सवानिमित्त एक पोस्ट टाकली होती. यातून त्याने आगामी गणेशोत्सवासाठी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन, पक्षविरहित गणेशोत्सव समिती स्थापन करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. संकल्पना चांगली होती. त्यावरुनच एक नवी कल्पना सुचली, अन् त्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली, की यंदाचा गणेशोत्सव प्रदुषणमुक्त साजरा करा! पण काही कार्यकर्त्यांना ती पोस्ट खटकली. त्यावरुन त्यांची अपेक्षित आगपाखड सुरु झाली. पण मी जो मुद्दा मांडत होतो, त्यावर कुणाची ऐकून घेण्याचीच मनस्थिती नव्हती.
कारण मला वाटतं की, गणेशोत्सव साजरा करताना त्यातलं ओंगळवाणं प्रदर्शन कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी सर्वात आधी गणेशमूर्तींच्या उंचीवर बंधन आली पाहिजेत. मी स्वत: एक मूर्तिकार असल्याने टोलजंग मूर्ती बनवताना मूर्तिकाराला काय आग्निदिव्य पार करावं लागतं? हे चांगल्यानं माहिती आहे. किमान 12 फूटाचा गणपती बनवायचा झाला, तर त्या मूर्तीच्या अंगाखांद्यावर चढून मूर्तीकाराला काम करावं लागतं. विशेष म्हणजे, काही कारागीर तर तिथेच सिगरेटचे धुरके ओढतात, पान खाऊन त्याच्या पिचकाऱ्या मारतात. आणि गणपतीच्याच दिवशी आपण त्याच मूर्तीची मनोभावे पूजा करतो. मग तिथं त्या मूर्तीची विटंबना होत नाही का?
मुंबईतलं टोलेजंग गणेशमूर्तींचं प्रस्थ काही नवीन नाही. कारण का तर इथं विसर्जनाची व्यवस्था आहे. म्हणून गणेश मंडळांमध्ये मूर्तीसाठी चढाओढ असते. पण आता ही चढाओढ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फोफावत आहे. यात त्या गावात गणेशमूर्तींची विसर्जनाची व्यवस्था नसतानाही, केवळ व्यक्तीगत खुन्नस काढण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मोठमोठ्या टोलेजंग गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करत आहेत.
पण या अशाच टोलेजंग गणेशमूर्तींमुळे दुर्घटनाच्या घटनांही दरवर्षी समोर आल्या आहेत. 2014 मध्ये मुंबईत काळबाईदेवी गणेशोत्सव मंडळाची 12.5 फूट मूर्ती कोसळल्याची घटना घडली होती. तर 2015 मध्ये हैदराबादमध्ये गणेशमूर्ती अंगावर कोसळून काहीजण जखमी झाले होते. गेल्या वर्षी हैदराबादमधूनही अशीच एक घटना समोर आली होती. या घटनेत विसर्जनासाठी निघालेली बाप्पाची मूर्ती कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. गेल्यावर्षी उल्हासनगरमध्ये टोलेजंग गणेशमूर्तीवर विजेची तार पडून दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला होता. पण तरीही गणेश भक्तांनी यातून हवा तो बोध घेतलेला नाही.
बरं...! दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर विसर्जनावेळी तर त्याचं पावित्र्य राखलं जाईल, असं वाटत असताना तिथंही उल्हास. कारण एकदा का गणेश मूर्ती
पाण्यात विसर्जित झाली की, लगेच त्यावर काही अतिउत्साही कार्यकते मूर्ती पाण्यात जाण्यासाठी, त्यावर उभे राहून थयथयाट सुरु करतात.
मग अशावेळी बेंबीच्या देठापासून ओरडणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते शांत का राहतात. गणरायाचं पावित्र राखलं पाहिजे, असं यांना वाटत नाही का? ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली, त्यांनाही या सर्व प्रकाराची लाज वाटत असावी.
कारण ज्या उद्दात्त हेतून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याला हारताळ फासण्याचं काम आजच्या तथाकथित गणेश मंडळांकडून होत आहे.
काही शहरांमध्ये तर गणरायाच्या आगमनापेक्षा त्याच्या निरोपाचीच गणेशभक्तांना ओढ लागलेली असते. कारण का..? तर त्या दिवशी उंचच्या उंच डॉल्बी लावून नंगानाच करता येतो. किंवा पारंपरिक वाद्यांची झुल पांघरुन 100-200 ढोल बडवत हवं ते केलं जातं. म्हणजे, यांच्यासाठी गणेशोत्सव हा उत्सव नाही, तर स्वत:ची एन्जॉयमेंट पूर्ण करण्यासाठी सुरु असलेला, नंगानाचच म्हणावा लागेल. त्यामुळेच लोकमान्य टिळकांनीही याचसाठी अट्टाहास केला होता का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.