संगीत आणि अध्यात्म यांचं अजोड नातं आहे. साधं देवाचं नाव घेतानाही त्याला एक ऱ्हिदम असतो. याचाच अनुभव नुकताच मला घेता आला. शब्दांमध्ये ताकद असते, ते आपल्या समोर चित्र उभं करतात. आणि आवाजात ताकद असते ते आपल्याला दुसऱ्या विश्वात घेऊन जातात. याचीच अनुभुती मला मिळाली इंद्रायणी काठी...
आळंदी.. ज्ञानोबा.. माऊली.. वारकरी हे शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या परिचयाचे. तसे माझ्याही. वारी, वारकरी, आळंदी, देहू या बद्दल प्रचंड कुतुहल. वयाच्या 11 व्या किंवा 12 व्या वर्षी आळंदीला पहिल्यांदा गेले. तेव्हा फक्त देवदर्शन म्हणून आई वडिलांसोबत फिरले, इंद्रायणीवर पाय धुतले.
नंतर 'एबीपी माझा'सोबत 2011 साली वारी कव्हर करायला गेले तेव्हा अगदी धावत धावत आळंदीला गेले आणि पुढे पंढरीच्या दिशेने निघाले. तेव्हा कामाच्या निमित्ताने आळंदी पाहिली आणि वारकऱ्यांच्या गर्दीत इंद्रायणी भरलेली दिसली.
यावेळी कामाच्याच निमित्ताने पण शांत वातावरणात आळंदीला गेले. इंद्रायणी काठी तब्बल 3 ते 4 तास घालवले. कधीही पाहिलेली इंद्रायणी आज मला दिसली. उत्तम आणि स्वच्छ घाट, वाहणारं पाणी, तिच्या अंगाखांद्यावर
खेळणारे लहानगे हे चित्र भारावून टाकणारं होतं.
ज्ञानेश्वरांना याच इंद्रायणीने साद घातली आणि तिच्याच काठी ते कायमचे विसावले. त्यांचेच अभंग ऐकण्याची संधी ही इथे मिळाली. पं. आनंद भाटे यांचा आवाज याच इंद्रायणीच्या काठी ऐकणं ही पर्वणी होती.
पं. आनंद भाटे प्रसिद्धीचं एवढं वलय असूनही अत्यंत साधं व्यक्तिमत्व. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना आनंद गंधर्व ही उपाधी मिळाली. इतक्या वर्षांच्या संगीत साधनेनंतरही त्यांच्यातील साधेपण टिकून आहे. पं. भीमसेन जोशींचा सहवास लाभलेल्या आनंद भाटेंनी सादर केलेले अभंग पंडितजींच्याच तोडीस तोड होते.
अभंग, गप्पा आणि इंद्रायणीचा तो काठ. सगळंच जुळून आल्यासारखं. नंतर गाभऱ्यात समाधीचं दर्शन घेतलं. प्रसाद घेतला. पण मला इंद्रायणीचा तो काठच आठवत राहिला. आणि ज्ञानेश्वर जर खरंच तिथे कुठे असतील तर ते निश्चितच या इंद्रायणी काठी असतील.
अनेक नद्या पाहिल्या पण यावेळची इंद्रायणीची ही भेट कायमच स्मरणात राहील. ज्ञानदेवांचे अभंग पं. आनंद भाटेच्या आवाजात इंद्रायणीच्या साक्षीने ऐकल्याने ही भेट अविस्मरणीय राहील हे नक्की.
इंद्रायणी काठी...
एबीपी माझा वेब टीम Updated at: 16 Nov 2017 11:40 AM (IST)
ज्ञानेश्वरांना याच इंद्रायणीने साद घातली आणि तिच्याच काठी ते कायमचे विसावले. त्यांचेच अभंग ऐकण्याची संधी ही इथे मिळाली. पं. आनंद भाटे यांचा आवाज याच इंद्रायणीच्या काठी ऐकणं ही पर्वणी होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -