काव्यशास्त्रविनोदेन कालौ गच्छति धीमताम्। म्हणजेच विद्वान माणसं आपला वेळ कविता, शास्त्र, आणि हास्यविनोदात व्यतित करतात. कवितेची पहिली ओळख बाळाला त्याच्या आईच्या गर्भातच होते. कशी? आईच्या हृदयाचे लयबद्ध ठोके हे त्या नऊ महिन्यांच्या काळात बाळासाठी एक आश्वासक काव्यच असतं. पण याच काव्याला मूर्त रूप केव्हा मिळालं? जेव्हा माणसाची शब्दांशी गाठ पडली तेव्हा या कवितेने मूर्त रूप धारण केलं.
वाक्यम रसात्मकं काव्यम। अर्थात रसपूर्ण वाक्याला काव्य असं म्हणतात. शृंगार, शांत, भक्ती, वीर, हास्य, करूण, बीभत्स, भय आणि रौद्र हे नवरस इतर कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा कवितेतून अधिक प्रभावीपणे निष्पन्न होतात. म्हणूनच व्यास-वाल्मिकींसारख्या ऋषीमुनींनी आपली प्रतिभा काव्यरूपानेच आविष्कृत केली... रामायण आणि महाभारत यासारखी आर्षमहाकाव्य त्यातूनच जन्माला आली.
कवितेत इतकी ताकद आहे की सर्वसामान्यांच्या मनाची ती पटकन पकड घेते, आणि म्हणूनच संतांनी आपली शिकवण कवितेतूनच मांडली. मग त्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या असतील, एकनाथांची भारुडं असतील, तुकोबाचे अभंग असतील किंवा रामदासांचे मनाचे श्लोक असतील. या सगळ्या संतांनी वेगवेगळ्या काव्यप्रकारांचा आधार घेत त्याकाळच्या समाज प्रबोधनाची गरज भागवली.
कविता माणसाला इतकी जवळची असते कारण शब्दांचा अर्थ कळत नसला तरी अगदी बालपणापासून त्याची कवितेशी नाळ जोडलेली असते. 'नीज नीज बाळा रे, गाणे गाते आई, करी आता जो जो गाई' च्या तालावर तो निजलेला असतो. 'अडगळ मडगुलं' च्या तालावर तो छानपैकी तयार झालेला असतो, 'सोनू उभा राहिला, आम्ही नाही पहिला' च्या तालावर तो उभं राहायला शिकलेला असतो. 'एक पाय नाचाव रे गोविंदा' च्या तालावर तो चिमुकले पाय आपटत नाचलेला असतो आणि 'ये रे ये रे पावसा' च्या तालावर पावसात चिंब भिजलेला असतो.
कवितेची काय आणि किती अंग सांगावी? अभंग, भक्तीगीतं, भावगीतं, लोकगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कुटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गौळण, लावणी, ओव्या, पोवाडे, आर्य, गझल, हायकू, रुबाई, शायरी, वात्रटिका, चावटिका, क्षणिका, गोंधळ, भारूड, सवाल-जवाब, श्लोक, सुनीता, पटके, दोहे या सगळ्या प्रांतात कविता मुशाफिरी करते.
पूर्वीच्या काळी लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रीला कवितेचाच आधार होता. जात्यावरच्या ओव्या, मंगळागौरीची गाणी... व्यक्त होण्यासाठीची तिची ही साधनं होती. आणि ही व्यक्तता अगदी सहज असायची. बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर 'अरे घरोटा घरोटा तयातून पडे पिठी, तसं तसं माझं गानं पोटातून येई ओठी' म्हणजेच जात्यातून जितक्या सहजतेने पीठ यावं तितक्या सहजतेने माझं गाणं जन्म घेतं.. आकार घेतं..
तमाशा ही महाराष्ट्राची ओळख... महाराष्ट्राची लोककला... त्यात नृत्याची लय आणि ढोलकीच्या तालाइतकं शाहिराचं कवन देखील महत्वाचं आहे. तमाशाला खरी रंगत चढते ती शाहिराच्या सवाल-जवाबाने. पण या सवाल-जवाबासाठी शाहिराच्या ज्ञानाइतकंच त्याच्या काव्यप्रतिभेलाही महत्त्व आहे. उदाहरण बघा... एकाने सवाल केला 'बीज ही असते जरी नराचे, रुजते नारीच्या उदरी, जन्म देउनी जीवास नारी घेते आईपण पदरी. नियम असे हा निसर्गातला घडले पण रे अकल्पित, कोण जाहला पुरुषची ऐसा, आई म्हणुनी जगतात?' तर याला उत्तर देणारा म्हणतो 'सवाल ऐसा बरवा केला, धन्यवाद घे तुज म्हणुनी, युगपुरुषाचे नाव ऐकता ऊरही येई हा भरुनी. ज्ञानेशाच्या ओठी ओवी या भूमीवर अवतरली, ब्रह्मचारी हा योगी नर होई ज्ञानेश्वर माउली.'
काव्य हे मुळात एक शास्त्र आहे. शास्त्र हे नियमात बांधलेलं असतं. तशीच कवितासुद्धा छंद, वृत्त, अलंकार, यात गुंफलेली असावी अशी अपेक्षा असते. असच छंद, वृत्त, अलंकार यांनी परिपूर्ण काव्य मराठी साहित्याला लाभलं ते पंतकाव्याच्या रूपाने. अनेक अलंकारांपैकी 'अन्योक्ती' अलंकार समर्थपणे पेलला तो कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी. आता त्यांचीच कोकोलान्योक्ती पहा 'येथे समस्त बहिरे वास्तती लोक, का मधुर भाषणे तू करिसी अनेक? हे मूर्ख! यांना किमपीही नसे विवेक, वर्णावरून तुजला गणतील काक'
कवी आणि त्यांच्या कवितांच्या शैलीबद्दल लिहिताना कुसुमाग्रज म्हणतात 'धरेस सांगाल का कधी? वाहत जा तू जलापरी, धगधगत्या विजेस म्हणाल का? येऊन बैस तू दवापरी?' प्रत्येक कवीची व्यक्त होण्याची पद्धत निराळी असते. कवीच्या स्वभावानुसार कवितेचा स्वभाव ठरतो. आणि म्हणूनच कवितेचे हे शब्द त्या कवीच्या अंतर्मनाची एक झलक आपल्याला दाखवून जातात.
कविता हा भाषेचा सर्वप्रथम आविष्कार आहे. इतर साहित्यप्रकारांपेक्षा तिचा रूपबंध वेगळा आहे. कारण कथा, कादंबरी, म्हंटल की तिथे कथनात्मकता आवश्यक असते, नाटक म्हंटल की तिथे नाट्यमयता येते. पण कवितेत सगळ्यात आधी आणि सर्वाधिक महत्वाचा असतो तो भाव. जागतिक दर्जाच्या कवी वर्ड्सवर्थ म्हणतो की 'A spontaneous overflow of powerful feelings means poetry' म्हणजेच उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आणि सौंदर्यपूर्ण अविष्कार म्हणजे कविता.
कवीच्या ठायी असणाऱ्या उत्स्फूर्ततेचा दाखल देणारा एक किस्सा आहे. एकदा काही कवी मंडळी गप्पा मारत बसली होती, विषय अर्थातच कवितांचा होता. त्यात एका कवीने शेर ऐकवला. 'लोग काटों की बात करते है, हमने तो फुलोंसे जख्म खाये है।' अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या शांताबाई शेळके तिथेच उपस्थित होत्या, त्या पटकन म्हणाल्या 'काटा रुते कोणाला? आक्रंदतात कोणी, मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे'... शब्दांची एवढी चपखल गुंफण करत आपल्या भावना एवढ्या उत्कटतेनं व्यक्त करणं कवींना कसं जमतं असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. या प्रश्नाचं उत्तर गुरु ठाकूर यांनी फार सोप्या शब्दात दिलंय.. ते म्हणतात कविता सुचणं म्हणजे सेलोटेपचं टोक सापडण्यासारखं असतं.. एखाद्या क्षणी जमलं तर फक्कड जमून जात.'
छंद, अलंकार, गेयता, उत्स्फूर्तता, आर्तता, उत्कटता ही कवितेची महत्वाची अंग आहेत. तशीच शब्दांची आणि भावनांची सुयोग्य सांगड घालत रचना करणं हा कवितेचा गाभा आहे. शब्द आणि भावनांची सुयोग्य रचना मला ठायी ठायी जिथे प्रत्ययाला आली ते म्हणजे ग. दि. माडगूळकरांचं गीतरामायण. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतरही अपत्यप्राप्ती न झालेल्या दशरथाबद्दल लिहिताना गदिमा म्हणतात 'कल्पतरूला फुल नसे का? वसंत सरला तरी'...
जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात प्रभावीपणे मांडणं हे कवितेचं बलस्थान विं.दा. करंदीकरांच्या 'घेता' या कवितेत आपल्याला कवितेच्या या बलस्थानाची प्रचिती येते. सावरकरांनी मातृभूमीच्या विरहामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली व्याकुळता एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली असती तर कदाचित ती हृदयाला इतकी भिडली नसती जितकी ती त्यांच्या 'सागरास' या कवितेतून मनाला भिडते.
वंगभंगाच्या चळवळीत 'वंदे मातरम' या काव्याचा प्रभाव एवढा जास्त होता की संपूर्ण भारतीय जनतेसाठी ते काव्य वेदमंत्रांइतकं वंदनीय ठरू लागलं होतं. संयुक्त महाराष्टाच्या चळवळीत आचार्य अत्रे, ना.ग. गोरे, यांसारख्या दिग्गजांच्या भाषणांने, वक्तृत्वाने, महाराष्ट्र जितका ढवळून निघाला होता, तितकाच तो शाहीर अमरशेखांच्या पोवाड्यांनीही ढवळून निघाला होता. मोर्चाच्या अग्रभागी उभं राहून 'जाग मराठा जाग, जमाना बदलेगा' असं खड्या आवाजात म्हणणाऱ्या अमरशेखांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक रस्त्याच्या कडेला दुतर्फा गर्दी करत असत. ही असते कवितेची ताकद.
प्रेम, निसर्ग, करुणा या भावात्मिक अवस्थतेतून कवितेला बाहेर काढत 'एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने' असं म्हणत केशवसुतांनी आधुनिक कवितेची तुतारी फुंकली. तर याच मराठी कवितेला वास्तवाचं भान दिलं ते दलित कवींनी... नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांच्या जीण्यातली दाहकता कवितेच्या माध्यमातून जगासमोर आणली. 'शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली... भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली...' आकाशातील चंद्राच्या शीतल सौंदर्यापेक्षा पोटातली आग शांत करणारा भाकरीचा चंद्र कष्टकरी जनतेसाठी किती महत्वाचा आहे हे नारायण सुर्वेंच्या कवितेने दाखवून दिले.
कवितेचं गाव नाही, तर कवितेचं अवघं विश्व आहे... जे अफाट आणि सुंदर आहे. पण आज कुठेतरी आमची पिढी कवितेपासून काहीशी दूर जाताना दिसतेय. आधुनिकतेमुळे रोजच जीवन गतिमान झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे ४००० ओव्यांचं दीर्घकाव्य, त्यानंतर ४०० ओळींचं खंडकाव्य, ४ कडव्यांचं गीत, १४ ओळींचं सुनीत ते आता अवघी चारोळी असा कवितेचा प्रवाह आक्रसत गेलाय. अभ्यासक्रमातल्या कवितासुद्धा गुण मिळवण्यापुरत्या मर्यादित राहिल्यात.. प्रश्नपत्रिकांच्या सबजेक्टिव्ह ते ऑब्जेक्टिव्ह या प्रवासात पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधल्या 'कवितेचे रसग्रहण करा' या प्रश्नाऐवजी 'काव्यपंक्ती पूर्ण करा' हा प्रश्न येऊ लागला आणि त्यामुळे कवितेच्या अर्थापेक्षा तिच्या पाठांतराला महत्व प्राप्त झालं. मग मुलांना त्या कवितेची गोडी कशी लागायची? त्यांना त्या कवितेबद्दल आत्मीयता कशी वाटायची?
पण असं जरी असलं तरी एक गोष्ट मात्र खरी, आपण सगळेच कायम कवितेच्या गावात जगत असतो. माणसाला कविता पावलो पावली भेटत असते, गवसत असते. आनंदात असलो की आपण गाणं गुणगुणतो, दुःखात आपल्याला आर्त गाणी आठवतात, प्रेमात पडलेल्या माणसाचं तर अवघ विश्वच काव्यमय झालेलं असत. कवितेचं एक अक्ख गाव आपल्या आत वसलेलं असतं... दडलेलं असतं.... गरज असते ती ते गाव शोधण्याची, त्या गावात रमण्याची.. एकदा का या कवितेच्या गावात आपण रमलो की मग आपसूकच हृदयातून गाणं स्फुरतं... म्हणूनच म्हंटल जात ... 'कवितेच्या गावा जावे, हृदयाचे गाणे गावे'
BLOG | कवितेच्या गावा जावे..
प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा
Updated at:
21 Mar 2020 09:48 PM (IST)
कवितेचं गाव नाही, तर कवितेचं अवघं विश्व आहे... जे अफाट आणि सुंदर आहे. पण आज कुठेतरी आमची पिढी कवितेपासून काहीशी दूर जाताना दिसतेय. आधुनिकतेमुळे रोजच जीवन गतिमान झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे 4000 ओव्यांचं दीर्घकाव्य, त्यानंतर 400 ओळींचं खंडकाव्य, 4 कडव्यांचं गीत, 14 ओळींचं सुनीत ते आता अवघी चारोळी असा कवितेचा प्रवाह आक्रसत गेलाय. अभ्यासक्रमातल्या कवितासुद्धा गन मिळवण्यापुरत्या मर्यादित राहिल्यात.. प्रश्नपत्रिकांच्या सबजेक्टिव्ह ते ऑब्जेक्टिव्ह या प्रवासात पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधल्या 'कवितेचे रसग्रहण करा' या प्रश्नाऐवजी 'काव्यपंक्ती पूर्ण करा' हा प्रश्न येऊ लागला आणि त्यामुळे कवितेच्या अर्थापेक्षा तिच्या पाठांतराला महत्व प्राप्त झालं. मग मुलांना त्या कवितेची गोडी कशी लागायची? त्यांना त्या कवितेबद्दल आत्मीयता कशी वाटायची?
फोटो- गुगलवरुन साभार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -