प्रिय अमिताभ…


खरतर हे वाचूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील… पण खरं सांगू का? माझ्या लहानपणी सगळ्यांनीच तुझी ओळख 'हा अमिताभ' अशीच करुन दिली आहे. त्यांची तरी काय चूक म्हणा? कारण तुझा कुली असेल, अॅन्थनी असेल, इन्पेक्टर विजय खन्ना असेल, शोले मधला जय असेल किंवा मग डॉन असेल, डॉ. भास्कर बनर्जी (बाबू मोशाय) किंवा मग बागबान मधला राज मल्होत्रा, या प्रत्येक भूमिकेत तू इतका लिलया वावरलास की प्रेक्षक तुझ्या जागी स्वतःला पाहू लागायचे..खलनायकांच्या गराड्यातून नियिकेला वाचवणारा तू... सारा जमाना हसीनोंका दिवाना असं म्हणत, ते भन्नाट जॅकेट घालून थिरकणारा तू... विरु सोबतची यारी दोस्ती निभावणारा तू... मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता म्हणत, समाजातल्या मध्यमवर्गीय लोकांच्या स्वाभिमानाला जागवणारा तू...अशी असंख्य रुपं पडद्यावर साकारत तू प्रत्येकाच्या मनातल्या वेगवेगळ्या छटा, भावभावना, त्यांची कथा…त्यांच्या व्यथा.. त्यांचीच स्वप्न पडद्यावर, जीवंत केली आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी फक्त ‘अमिताभ’ हे एकेरी संबोधन. तू आहेसच तितका जवळचा. मी तुला पहिल्यांदा पाहिलेलं आठवतय. खूप लहान होते तेव्हा कौन बनेगा करोडपतीच्या प्लॅटफॉर्मवर. तेव्हापासून तू आणि केबीसी हे अतुट नातं मनात तयार झालय. इतकं, की आता केबीसी चं म्युझिक कुठेही ऐकू आलं की त्यानंतर लगोलग तुझा जादूई आवाज कानात घुमू लागतो. अमिताभ तुझा आवाज... तुझ्या आवाजात कानांना काहीही गोड लागतं.


तुला खरं सांगू.. अनेकदा परिस्थितीसमोर हार पत्करावी असं वाटत असताना केवळ तुझ्या आवाजातली एखादी प्रेरणा देणारी कविता ऐकली की मग समोर काहीही परिस्थिती का असेना, तिच्यावर मात करण्यासाठी दहा हत्तींचं बळ येत. अमिताभ तू एकदा सांगावस की, ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती’, आणि मग त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची मनाची तयारी होते, अमिताभ म्हणून तू जवळचा आहेस.


कित्येक सिनेमांच्या दोन प्रसंगातली गोष्ट तुझ्या आवाजात ऐकली आहे, लगान सिनेमा सुरू झाल्यानंतर तो लगेच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो कारण त्याच्या गोष्टीची सुरूवात तुझ्या आवाजातून होते. त्या सिनेमाचा माहोल तू तयार करतोस. पडद्यामागे राहूनही प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणं तुला ठाउक आह  आणि म्हणूनच अमिचाभ तू इतका जवळचा आहेस.


तुला एक सांगू? बॉलिवुडमधली तुझी पहिली ओळख अँग्री यंग मॅन असेलही पण तुझा तो अँग्री यंग मॅन मला फारसा कधीच आवडला नाही, पण मला हे ही माहितेय, की ती फक्त झूल होती…त्या भूमिकांची. त्या झूलीमागे असलेला संवेदनशील अमिताभ जेव्हा जेव्हा समोर आला तेव्हा तेव्हा त्याने मन काबीज करून टाकलय. आणि जेव्हा तुझी ती संवेदनशीलता तुझ्या भूमिकांमध्ये प्रतिबिंबित झाली तेव्हा तू एक अभिनेता म्हणूनही खूप जवळचा वाटलास. मग तो ब्लॅक असेल पिंक असेल किंवा बदला सारखा सिनेमा असेल. आणखी एक गंमत सांगू? सिनेमांमधल्या हिरोंना बघून अनेकदा क्रश म्हणून त्यांचा विचारही केला, पण जेव्हा जोडीदार कसा असावा याचा विचार येतो तेव्हा विश्वास ठेव माझ्या डोळ्यासमोर बागबान मधला तूच उभा असतोस… आणि म्हणूनच तू खूप जवळचा वाटतोस अमिताभ…


अनेकजण म्हणतात की बापुडवाणा अमिताभ नाही बघू शकत… पण जेव्हा बापुडवाणेपणामागची भावनिकता, संवेदनशीलता समोर येते, आणि त्या संवेदनशीलतेच्या जोरावर नव्याने उभा रहाणाऱ्या तुला आणि तुझ्यातल्या अभिनेत्याला आणि माणसाला पाहिलं की तुझी ती संवेदनशीलता व्यापून टाकते. म्हणजे बघ ना, 2012 साली जेव्हा निर्भया प्रकरण झालेलं तेव्हा पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरून लिहिलं जात होतं, मतं, प्रतिक्रिया छापून येत होत्या, पण त्या सगळ्यात लक्षात राहिली ती त्याच पेपरमध्ये एका कोपऱ्यातल्या चौकोनात छापून आलेली तुझी ‘अगले जनम मोहो बिटीया ही किजो’ ही कविता. एक पुरुष असूनही एका असहाय्य मुलीच्या असह्य यातना तू तुझ्या शब्दात अशा रितीने मांडल्यास की त्या अजूनही मनात खोल रूतून बसल्यात.


हे ही वाचा- BLOG | म्हणून बच्चन.. 'बच्चन' असतो!


आणखी एक गोष्ट सांगू? ‘पिंक’ सिनेमात तुझ्या आवाजातली पियुष मिश्रांची एक कविता आहे. ‘तू खुद की खोज मे निकल’… अर्थात तिथे शब्दांचं सामर्थ्य आहेच पण तू ज्या पद्धतीने ती सादर केली आहेस ते ऐकून कोणत्याही स्त्री चं आत्मभान, आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत होईल, तो जागृत करण्याची करण्याची तुझी जी कळकळ आहे ती थेट ह्रदयाचा ठाव घेते. त्या कवितेचं सामर्थ्य शब्द असले तरी त्या कवितेचा आत्मा मात्र तुझा आवाज बनलाय.. आणि म्हणून अमिताभ तू खूप आपलासा वाटतोस…


तुझ्या दोन भूमिका मी कधीच विसरू शकत नाही त्या म्हणजे लहान वयात म्हातारपण आलेला ‘पा’ मधला ‘ओरो’ त्याचा ऑरा काही वेगळाच होता आणि दुसरा आयुष्याच्या शेवटच्या इनिंगमध्ये पंचवीशीतल्या तरूणाला लाजवणारा ‘102 नॉट आउट’ मधला ‘दत्तात्रय वखारीया’. तो सिनेमा संपल्यानंतर डोळ्यात पाणी होत, पण ते आनंदाचं होतं कारण त्या सिनेमातल्या प्रत्येक प्रसंगातून तू भरभरून सकारात्मकता दिलीयेस.


गहराई आणि उंची या दोन्ही गोष्टी तुझ्या ठाई सापडतात.  तुझ्या आवाजाच्या गेहराईचा तळ गाठता न येणारा आहे, आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वाची उंची मोजता न येणारी आहे, पण तरीही तू आपलासा वाटतोस कारण,  प्रेक्षकांसमोर आल्यावर ज्या नम्रतेने तू हात जोडतोस ते या दोहोंमधला सुवर्णमध्य साधतात.


बॉलिवुडमध्ये किंग अनेक असतील, होतील पण अनभिषिक्त सम्राट मात्र एकच आहे, आणि तो तूच आहेस, राहशील.. कारण अमिताभ आजही जेव्हा तू पडद्यावर हसतोस आमच्याही चेहऱ्यावर हसू येतं, तू रागवतोस, त्वेषाने काहीतरी बोलतोस तेव्हा अमच्याही मनाला स्फुरण चढतं, तू हतबल होतोस तेव्हा आमच्याही मनात निराशेचे ढग दाटून येतात. तुझ्या डोळ्यात पाणी आलं की आमच्याही पापण्या ओलावतात. आजही आम्हाला सिनेमाच्या शेवटी तुझा मृत्यू दाखवला तर तो शेवट पचवणं आमच्यासाठी अवघड होऊन जातं.


अमिताभ तुझ्या नावात अमीत आहे…तू साकारलेल्या भूमिका… तुझं कर्तृत्त्व अमीट आहे… आणि तुझ्या वयाच्या या टप्प्यावरही तुला पडद्यावर पहात राहणं अवीट आहे…. बाकी आता अमिताभ म्हातारा झालाय असं म्हणणाऱ्यांना तुझ्या शैलीत ठणकावून सांग ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’. आणि एक गोष्ट,  आत्ताशी 77 वर्षांचा झालायस 102 नॉट आउट मधला दत्तात्रय वखारियाचा रेकॉर्ड लक्षात ठेव, तुला तो ब्रेक करायचाय… शेवटी काय मला बाकी रेखांचं माहित नाही, पण तुझ्या हातावरची आयुष्यरेखा मात्र तुझ्या उंचीइतकी लांब असूदे याच शुभेच्छा...


हॅप्पी बर्थडे अमिताभ