कुठल्याही भागाचा विकास होण्यासाठी त्या भागातील राजकीय नेतृत्वाचे महत्त्वाचे योगदान असावे लागते. विशेष करुन देशाच्या राजधानीत जर ते नेतृत्व आपला दबदबा निर्माण करू शकले तर मग विकासाच्या गंगेचे काही पाणी त्या भागाकडेही वळण्यास मदत होते असा साधारण समज आहे. म्हणून दिल्लीत आपला नेता कर्तृत्व सिद्ध करतो आहे म्हटल्यावर जनता विकासाच्या दृष्टीने आशावादी असते. अशीच आशावादी मराठवाड्याची जनता नेहमीच राहिली. कारण मराठवाड्याच्या मातीतून घडलेल्या राजकीय नेतृत्वाने थेट दिल्लीपर्यंत आपला ठसा उमटवला. आपला नेता दिल्ली गाजवतो आहे, दिल्ली दरबारी त्याचे वजन वाढते आहे म्हटल्यावर मराठवाड्याची आशा पल्लवीत झाली. पण इतके उत्तुंग नेते या मातीत निर्माण होऊनही या मातीच्या पदरी आली मात्र निराशाच. दिल्लीत मराठवाडी आवाज गाजायला जरा कुठे सुरूवात झाली की नियतीने तो आवाजच हिरावून घेतला. त्यामुळे मग मराठवाड्याला दिल्ली धार्जिण नाही, शापीत मराठवाडा अशा प्रतिक्रिया उमटताना दिसू लागल्या.



सध्या यावर चर्चा होण्याचे कारण म्हणजे खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन होय. राजीव सातव यांची कारकीर्द ऐन बहरात असताना त्यांचे निधन चटका लावणारे आहे. 2014 ला मोदी लाटेत जेव्हा भल्याभल्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली तेव्हा हिंगोलीतून सातव खासदार म्हणून निवडून गेले. चेहऱ्यावर हास्य, साधी राहणी, कमालीची सभ्यता, नम्रपणा, अभ्यासूपणा, सुसंस्कृतपणा म्हणजे राजीव सातव. खरंतर कुठल्याही आदर्श राजकारण्यात असावे असे सर्व गुण राजीव सातव यांच्यात होते. याला जोड अर्थातच त्यांच्या काँग्रेसी विचारांवरच्या निष्ठेची आणि संघटन कौशल्याची. या जोरावरच त्यांनी राहूल गांधींच्या जवळच्या गोटात स्थान मिळवलं. राहुल ब्रिगेडमध्ये सातव दाखल झाले नी त्यांनी दिल्ली जवळ केली. मग काय त्यांच्या कौशल्यामुळे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. त्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. राहुल गांधींवरती त्यांची मोठी निष्ठा. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे पक्षात कौतुक झाले. दिल्लीत मराठी नेते फार रमत नाही असे म्हणतात पण जे काही याला अपवाद ठरले त्यात सातवांचे नावही जोडले गेले. आणि या मराठवाड्याच्या सुपूत्राने पुन्हा एकदा मराठवाड्याला आशा दाखवली. येणारा काळ राजीव सातवांचा होता. उद्याचे राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या ताकदीचे ते नेते असणार होते. यात कोणाचेही दुमत असणार नाही. मोठी इनिंग खेळण्यासाठी ते मैदानात उतरले होते. म्हणून त्यांचे अकाली जाणे काँग्रेससाठी, देशासाठी आणि अर्थातच मराठवाड्यासाठी मोठी हानी आहे.


राजीव सातवांच्या जाण्यामुळे मराठवाड्याला दिल्ली धार्जिण नाही हा जो काही सूर उमटतो आहे, त्याला कारण गेल्या काही वर्षात मराठवाड्यातील महत्वाचे राजकीय नेते राजकीयदृष्ट्या कार्यरत असताना काळाच्या पडद्याआड गेले हे आहे. विशेष म्हणजे हे नेते दिल्लीत आपला दबदबा निर्माण करू लागले होते. त्यामध्ये सर्वप्रथम प्रमोद महाजन यांचे नाव घ्यावे लागेल. उत्तम संसदपटू, सभा जिंकणारे वक्ते असलेले महाजन दिल्लीत रमले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील ते महत्त्वाचे नेते होते, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. भावी पंतप्रधान म्हणून भारतीय जनता पक्षातील ज्या नेत्यांकडे पाहिले जायचे त्यातील एक महाजन होते. एवढा उत्तुंग नेता मराठवाड्याच्या मातीतला असल्याने मराठवाड्याच्या अपेक्षा साहजिकच वाढल्या होत्या. पण महाजनांचे दुर्दैवी निधन झाले अन् मराठवाड्यावर आघात झाला. 


पुढे मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीनंतर विलासराव देशमुखही दिल्लीत गेले. देशमुख वजनदार नेते, शिवाय हायकमांडच्या मर्जीतले म्हणून त्यांना महत्वाची खाती मिळाली. पण दिल्लीतील कारकीर्द बहरायच्या आतच देशमुखांचे निधन झाले. मराठवाड्यावर हा दुसरा आघात होता. यानंतर स्वाभाविकपणे मराठवाड्याला आशा वाटली ती गोपीनाथ मुंडेंकडून. अनेक वर्ष विरोधीपक्षात असणारे मुंडे 2014 ला सत्ताधारी झाले. मोदींच्या कॅबीनेटमधील महत्त्वाचे मंत्री म्हणून त्यांनी शपथही घेतली. ग्रामविकास सारखे महत्त्वाचे खाते त्यांना मिळाले. त्यांच्यामुळे दिल्लीची कृपादृष्टी मराठवाड्यावर राहील असे वाटू लागले असतानाच त्यांचे अपघाती निधन झाले. अन् मराठवाडा पोरका झाला. हा पोरकेपणा दूर व्हावा अन् मराठवाडी आवाज दिल्लीत घुमावा अशी आशा लावून असलेल्या मराठवाड्याला राजीव सातवांच्या रुपाने उद्याचा नेता दिसत होता. जो नेता मराठवाड्याचा आवाज दिल्लीला ऐकवणार होता. पण ही कहाणीही अधुरीच राहिली. खरंतर मराठवाड्याने महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. पण दिल्ली गाजवायला निघालेल्या मराठवाड्याच्या बहुतांश नेत्यांना आपली इनिंग पूर्ण करताच आली नाही. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर यांनी दिल्ली गाजवली हे खरे. पण गेल्या काही वर्षात घडले ते असे की मराठवाडा दिल्लीपासून दूर होत चालला. सातवांच्या जाण्याने हे आणखीन अधोरेखित होते. नेतृत्व सहजासहजी उभे राहत नाही .त्यासाठी मोठा काळ जावा लागतो. मराठवाड्याच्या मातीत असे नेते उभे राहिले. या नेत्यांनी दिल्लीही गाठली. पण त्यांच्या अकाली निधनाने मराठवाडा दिल्ली गाजवणाऱ्या नेतृत्वाला मुकला. आता ही पोकळी कधी भरून निघेल? हा प्रश्न मराठवाड्यासमोर आहे.