कोरोनाच्या (Covid-19) जागतिक महामारीनंतर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांना (Retail Investors) अनेक संधी उपलब्ध झाल्या, तसेच काही आव्हानांचा सामनाही त्यांना करावा लागला. कोरोना महामारीच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक अनपेक्षित बदल झाले. त्यातून भांडवली बाजारातही अनेक प्रकारचे चढउतार पाहायला मिळाले. परंतु जे गुंतवणूकदार मोठ्या कालावधीसाठी एकदाच पैसे गुंतवतात, आणि बाजारात सातत्याने सक्रिय राहत नाहीत त्यांना या चढउतारांचा फायदा उचलता आला नाही. विशेषतः स्मॉल कॅप, मिड कॅप, बँकिंग, फायनान्स आणि कन्झंप्शन क्षेत्रातील तेजीचा फायदा घेणं अशा गुंतवणूकदारांना शक्य झालं नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे या गुंतागुंतीच्या परिस्थितीत आणखी भर पडली. महागाई वाढली आणि जगाचा वस्तू उपभोगण्याचा पॅटर्नही बदलला.


महागाईच्या काळात बदललेलं कन्झंप्शनचं चक्र


किमतींमध्ये झालेली वाढ: गेल्या काही वर्षात घडलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची भू-राजकीय घटना म्हणजे रशिया आणि युक्रेन या दोन देशांत झालेलं युद्ध. जागतिक वित्त बाजारात या युद्धाचे अनेक पडसाद उमटले. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश ऊर्जेच्या क्षेत्रात जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर जागतिक पातळीवर ऊर्जेच्या किमती वाढल्या. सोबतच जागतिक पुरवठा साखळी बाधित झाल्याने जगभरात वस्तूंच्या किमती वाढल्या आणि परिणामी अनेक देशांमध्ये महागाई वाढली.


ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीत झालेले बदल : जगभरात महागाई वाढल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पैसे खर्च करण्याच्या सवयीही बदलाव्या लागल्या. कित्येक ग्राहकांनी तर येत्या काळात महागाई आणखी वाढेल या भीतीने फक्त आवश्यक तेवढ्याच वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. त्यामुळे उपभोग्य वस्तूंच्या बाजारात मागणी वाढली, आणि परिणामी त्या वस्तू महाग झाल्या. अशा वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आणि व्यवसायांना या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा फायदा झाला. 


कन्झंप्शन क्षेत्रात उपलब्ध झालेल्या गुंतवणुकीच्या संधी : ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे रोजच्या वापरातील वस्तू बनवणाऱ्या कंपन्या, एफएमजीसी, कंझ्युमर ड्युरेबल आणि रिटेल क्षेत्रातील कंपन्यांची झपाट्याने वाढ झाली. हा ट्रेंड ओळखण्यात जे गुंतवणूकदार यशस्वी झाले त्यांनी या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि चांगले रिटर्न्सही मिळवले.


बँकिंग आणि फायनान्स : वाढणाऱ्या व्याजदराच्या लाटेवर स्वार होताना...


व्याजदरांवर झालेला महागाईचा परिणाम : देशांत महागाई वाढल्यानंतर मध्यवर्ती बँकांना आपली मॉनेटरी पॉलिसी, अर्थात आर्थिक पतधोरण बदलावं लागतं. बाजारात उपलब्ध असलेलं चलन कमी करण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळेच काही देशांच्या मध्यवर्ती बँकांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


वित्तीय संस्थांसाठी सुवर्णसंधी : मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवला की साहजिकच बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था त्यांच्या कर्जाचा व्याजदर वाढवतात. त्यातून कर्जावर व्याजाच्या माध्यमातून मिळणारा नफा वाढतो. महागाईमुळे चलनाचं किंवा पैशाचं वास्तव मूल्य कमी होतं, आणि पर्यायाने गुंतवणूक आणि वित्त व्यवस्थापन सेवांची मागणी वाढते. यामुळे आर्थिक क्षेत्राला चालना मिळते.


व्हॅल्युएशनचे महत्त्व


गुंतवणूकदारांसाठी व्हॅल्यूएशन हे एखादी गुंतवणूक फायद्याची ठरेल की नाही याचा अंदाज घेण्याचं साधन असतं. एखाद्या स्टॉकची किंवा बाँडची मूळ किंमत काय आहे हे पाहूनच गुंतवणूकदार त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. अनिश्चिततेच्या काळात, विशेषतः कोविड सारख्या मोठ्या जागतिक संकटांच्या काळात व्हॅल्यूएशनमध्ये मोठे चढउतार होण्याची शक्यता असते. अस्वस्थ होऊन, भावनेच्या आहारी जाऊन घेतलेल्या खरेदी विक्रीचा निर्णयांमुळे मूळचे मूल्य चांगले असणाऱ्या स्टॉकच्या किमती तेवढ्या काळासाठी ढासळू शकतात, आणि काही वेळा कमी मूल्य असलेल्या स्टॉकच्या किमती वाढूही शकतात.


जागतिक महामारीच्या सुरुवातीच्या काळात चांगले रिटर्न्स मिळवून देण्याची क्षमता असलेल्या काही स्मॉल, मिड कॅप फर्म आणि बँकिंगसह वित्तीय क्षेत्रातील इतर संस्थांची बाजारातील किंमत ढासळली. ज्या गुंतवणूकदारांनी त्या कंपन्यांच्या स्टॉकची क्षमता लक्षात घेऊन आपली गुंतवणूक तिथेच कायम ठेवली त्यांना कालांतराने मार्केटमध्ये करेक्शन झाल्यानंतर चांगले रिटर्न्स मिळाले. यातून हे लक्षात घेतलं पाहिजे की अनिश्चिततेच्या काळात मार्केटमध्ये सुरू असलेल्या तत्कालीन ट्रेंडला भुलून न जाता काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास करून, व्हॅल्यूएशनचा बारकाईने विचार करून स्वतंत्रपणे निर्णय घेतल्यास चांगला नफा कमावता येऊ शकतो.


वेळ साधण्याची कला : एन्ट्री आणि एक्झीट (The Art of Timing: Entry and Exit)


वेळ सर्वकाही आहे असं आपण म्हणतो, ते गुंतवणुकीच्या बाबतीत शंभर टक्के लागू होतं. मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची योग्य वेळ कोणती आणि ते काढून घेण्याची योग्य वेळी कोणती, यावरून तुम्हाला त्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होणार की तोटा होणार हे ठरत असतं. परंतु योग्य वेळ कोणती हे ओळखणे बोलायला सोपं वाटत असलं तरी ते तितकं सोपं नाही.


कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात मार्केटमधील चढ उतारामुळे काही क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला. हा परिणाम दीर्घकाळ असाच राहील आणि त्या क्षेत्राची क्षमता वाढणारच नाही या भीतीने अनेक गुंतवणूकदारांनी त्या क्षेत्रातील गुंतवणूक काढून घेतली. बँकिंग आणि वित्त ही दोन्ही क्षेत्रे याचं उदाहरण म्हणून पाहता येतील. ज्या गुंतवणूकदारांनी या क्षेत्रांमध्ये आपली गुंतवणूक कायम ठेवली, आणि विशेषतः ज्यांनी येणाऱ्या ट्रेंडचा अंदाज घेऊन या क्षेत्रात नव्याने गुंतवणूक केली, त्यांनाच सर्वात जास्त नफा मिळवता आला. 


वेळेचा योग्य अंदाज हा सहज येत नाही. मनाला वाटलं म्हणून ती वेळ निवडली, असं होत नाही. मार्केटमध्ये कोणते ट्रेंड सुरू आहेत यावर सतत लक्ष ठेवल्यामुळे, जगभरातील आर्थिक चढउतरांचा अभ्यास केल्यामुळे, किंवा काहीवेळा तर इतर गुंतवणूकदार झटपट निर्णय घेत असताना आपण आहोत तिथेच थांबण्याच्या आंतरिक क्षमतेमुळे आपल्याला योग्य वेळ गाठता येते. कोविडच्या जागतिक संकटाचा आर्थिक परिणाम अत्यंत गंभीर असला तरी तो कायम राहणार नाही आणि मार्केट पुन्हा पूर्वपदावर येईल याची खात्री असणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या दूरदृष्टीचं आणि संयमाचं योग्य फळ मिळालं.


पॅसिव्ह गुंतवणुकीचे काही तोटे


संधी गमावणे: वर उल्लेख केल्याप्रमाणे, पॅसिव्ह गुंतवणूक केल्यानंतर काही क्षेत्रांमध्ये आलेल्या तेजीचा फायदा घेता येत नाही, त्यामुळे वाढीची संधी गमावण्याची वेळ येते.


मर्यादित वाढ: पॅसिव्ह गुंतवणुकीची वाढीची क्षमता ही ती गुंतवणूक कोणत्या मार्केट इंडेक्सवर आधारित आहे यावरून ठरते. त्यामुळे मार्केटच्या एकूण वाढीच्या पलीकडे जाऊन अशी गुंतवणूक रिटर्न मिळवून देत नाही. सतत वाढणाऱ्या मार्केटमध्ये यात चूक काहीच नाही, परंतु त्या मार्केटमध्ये जास्त वाढ होणाऱ्या क्षेत्रांमधून चांगले रिटर्न्स मिळवण्यावर मर्यादा येतात. 


आवश्यक ते बदल न करता येण्याचं बंधन : मार्केटमधील झपाट्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता पॅसिव्ह गुंतवणुकीत नसते. याचाच अर्थ ज्या क्षेत्रात तेजी आहे त्यांचा लाभ गुंतवणूकदारांना घेता येत नाही, आणि ज्या क्षेत्रात मंदी येण्याची शक्यता आहे तिथून गुंतवणूक झटपट काढूनही घेता येत नाही.


स्टॉकची किंमत वाढल्यास होणारा तोटा : पॅसिव्ह गुंतवणुकीत समाविष्ट असणाऱ्या एखाद्या स्टॉकची किंमत वाढली तरी ती गुंतवणूक कायम ठेवावी लागते. त्यामुळे तोटा होण्याची रिस्क आणखी वाढते.


पॅसिव्ह गुंतवणूकदारांसाठी काही क्षेत्रांमध्ये आलेली तेजीची लाट ही गमावलेली संधी आहे, परंतु विवेकाने निर्णय घेणाऱ्या आणि मेहनत घेण्याची तयारी असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही काही मूलभूत तत्वांचं महत्त्व अधोरेखित करणारी घटना ठरली आहे. ही मूलभूत तत्वे म्हणजे डायव्हर्सीफिकेशन, व्हॅल्यूएशन आणि टायमिंग!


नेहमीचा सल्ला, एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स मिळतील मार्केटमधील ट्रेंडनुसार दिसत असलं तरी प्रत्यक्ष गुंतवणूक करताना त्या क्षेत्राचा अभ्यास करणं, पर्सनल फायनान्सच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं गुंतवणूकदारांच्या फायद्याचं ठरतं.