एवढी सजगता यापूर्वी कधी पाहिलेली मला आठवत नाही, डॉक्टर जेवढी वाट बघत नसतील तेवढे सध्याचे नागरिक कोरोनाच्या नावाने एखादं औषध आलं की माहिती घेण्यास उत्सुक असतात. ज्या दिवशी एखादी अमुक कंपनी किंवा संस्था, कोरोनासाठी औषध घेऊन एखादी घोषणा करतात त्यादिवशी नागरिकांकडे त्या औषधाची संपूर्ण माहिती आलेली सुद्धा असते. याकरिता कोरोनाला धन्यवाद! कोरोनाच्या अवतीभवती फिरणाऱ्या राजकीय, सामाजिक, वैद्यकीय सर्व घडामोडींवर बहुतांश नागरिकांचं बारीक लक्ष आहे. या दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहे, विशेष म्हणजे अजूनही रुग्ण वाचविण्याकरिता डॉक्टर्स सध्या जी प्रचलित औषध बाजारात अनेक वर्षांपासून आहे त्यांचाच आधार घेऊन रुग्णांवर उपचार करीत आहे. सध्या पुन्हा एकदा 'फॅबी फ्लू' या औषधाच्या चर्चेने बाजार गरम झाला आहे. कोरोनावरील हे नवीन औषध आणण्याच्या स्पर्धेत ग्लेनमार्क या कंपनीने सध्या बाजी मारली असून त्यांनी सौम्य ते मध्य स्वरूपाच्या लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी फॅबी फ्लू हे औषध बाजारात आणले आहे.


खरं पाहायला गेले तर वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी सध्या गंभीर ते अतिगंभीर स्वरुपाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी काही औषधं येत आहेत का याची वाट पाहत आहेत किंवा एखादी लस घेतली तर हा आजारच होणार नाही याची प्रतीक्षा सर्व जण करत आहे. सध्या सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणं असणारे रुग्ण प्रचलित औषधांना चांगला प्रतिसाद देत असून बहुतांश रुग्ण बरे होत आहे. कोरोनाच्या या काळात अनेक नवनवीन गोष्टी येत आहे, त्या शास्त्रीय सिद्धांतावर किती टिकतात हे पाहणं गरजेचं आहे. अजूनही अनेक देश या आजारावर औषध बनवत आहे काही काळाने त्या सुद्धा आपलं औषध हे कोरोनासाठी गुणकारी असा दावा करतील. यामध्ये सर्वसामान्य नागरिक फक्त या औषधाची माहिती गोळा करून आपल्या रुग्णांसाठी हेच अमुक औषध द्यावं म्हणून मागणी करतील. त्यावेळी डॉक्टरांनी नेमकं काय करायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण निर्माण होईल.


के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता, डॉ. अविनाश सुपे या प्रकरणी सांगतात की, "आपल्याला सध्या गंभीर ते अतिगंभीर रुग्णाला काही वेगळं औषध देता येतील का याबाबत आपण सगळेच प्रतीक्षेत आहोत. आपल्या डॉक्टरांना सौम्य ते मध्यम लक्षणं असणाऱ्या रुग्णांना बरे करण्यात चांगले यश मिळत आहेत. सध्या जे बाजारात नवीन औषध आलं आहे त्याबद्दल सांगणे आता तरी कठीण आहे. कारण त्याचे निकाल अजून काही प्रत्यक्षात बघितलेले नाही."


सध्या संपूर्ण देशात डेक्सामेथासोन, मेथीलप्रेडीनीसोलोन, रेमेडिसिवीर आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, बिकोझींक, सी व्हिटॅमिन, टॅमीफ्लू या आणि अशा विविध औषधांचा वापर कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही सर्व औषध वेगवेगळ्या आजारासाठी यापूर्वीच वापरली गेली आहेत. ही सर्व औषध बाजारात उपलब्ध आहेत. या सर्व औषधांचा वापर केल्यावर लक्षात आले आहे की त्याचा कोरोनाबाधित रुग्णांना फायदा होत आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात चांगलीच चलती होती, खरं तर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन भारतात बनवलं गेलेलं औषध आहे. हे औषध प्रामुख्याने मलेरिया आणि आणि संधिवाताकरिता वापरलं जातं.


तसेच अमेरिकेतील गिलियाड सायन्सेस या औषध कंपनीकडे ‘रेमडेसीवीर' या औषधाचे पेटंट आहे. अनेक देशातील औषध कंपन्या या औषध निर्मितीसाठी गिलियाड सायन्सेसच्या संपर्कांत आहे. रेमडेसीवीर हे औषध प्राथमिकरीत्या इबोला, सार्स या आजाराकरिता बनवलं गेलं होतं. मात्र या कंपनीने हे औषध कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर चांगलं काम करत असल्याचा दावा केला आहे, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाच्या चाचण्यांना हिरवा कंदील दाखविल्यानंतर तेथील औषध नियंत्रकांनी यास परवानगी दिली आहे. डेक्सामेथासोन आणि मेथीलप्रेडीनीसोलोन, हे एक प्रकारचं उत्तेजक (स्टिरॉइड) औषध असून गेली अनेक वर्ष ते जगातील अनेक डॉक्टर आपल्या प्रॅक्टिस मध्ये याचा वापर करत आहेत.


मुंबई येथील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर गर्दे सांगतात की, "पहिलं गोष्ट एक तर हे नवीन औषध तसं बऱ्यापैकी खर्चिक आहे. ह्या औषधाचा फायदा किंवा तोटा येणाऱ्या काळात दिसेल. कारण या औषधांबाबत जी काही माहिती आहे ती माध्यमांमधूनच मिळाली आहे. सध्या आपल्याकडे जी औषध आहेत त्यातून सौम्य ते माधयम स्वरूपाच्या रुग्णांना फायदा होत आहे. हे औषध फ्लू साठी आहे, जपान मध्ये हे औषध वापरलं गेले आहे. आपल्याकडे कोरोना रुग्णामध्ये कशापद्धतीने हे औषध प्रतिसाद देतं हे पाहण्याकरिता काही काळ वाट पाहावी लागणार आहे."


लॉकडाऊन नंतर संपूर्ण देशात बऱ्यापैकी रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी तर अनलॉकनंतर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे, नियम कडक पद्धतीने पाळले जात आहे. प्रशासन अजूनही विविध ठिकाणी फिल्ड हॉस्पिटल उभारत आहे, त्याचप्रमाणे नवनवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. टेस्टिंग लॅबची संख्या वाढवण्यात येत आहे, राज्यात सध्या 60 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 103 प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने 50 टक्क्यांवर आहे. वैद्यकीय तज्ज्ञांना ह्या विषाणूचं वर्तन भविष्यात कसे असेल हे सांगता येत नाही.


आपल्याकडे सध्या जी औषधं कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांकरिता वापरण्यात येत आहे, ती सगळी औषधं यापूर्वी विविध आजारांकरिता वापरण्यात येत होती. त्यामुळे सध्याच्या जुन्या औषध वापराच्या अनुभवावरून 'जुनं ते सोनं' असं म्हणण्याची वेळ आली आहे. अजून खूप औषधं बाजारात येणार आहेत. प्रत्येक जण विविध दावे करतील, मात्र तूर्तास, सर्व सुरक्षितेचे नियम आपण पाळले तर आपल्यावर औषध घेण्याची वेळच येणार नाही.