Nuremberg Movie Review : दुसरं महायुध्दानं जगाला असंख्या गोष्टी दिल्या. दरवर्षी दुसऱ्या महायुध्दावर दोन-चार सिनेमे तरी बनतात. अशोक राणे सरांनी मध्यंतरी एक आठवण सांगितली होती. बर्लिनमध्ये एका जर्मन दिग्दर्शकाची प्रेस कॉन्फरेन्स सुरू होती. एका पत्रकाराने त्या दिग्दर्शकाला प्रश्न विचारला. “ इतकी वर्षे झाली दुसऱ्या महायुध्दाला तरी तुम्ही युध्दावरचे सिनेमे का बनवता? युध्दात मानवी हानी झाली, ज्यूंना मारलं, हिटलर मेला असं बरंच काही तेच तेच सिनेमात येतंय. असं नाही का वाटत तुम्हाला” यावर तो दिग्दर्शक म्हणाला, “ काय घडलं आणि कसं घडलं हे माझ्या नातीला आणि त्यानंतर येणाऱ्या सर्व पिढ्यांना हे समजायला हवं म्हणून आम्ही हे सिनेमे बनवतोय, बनवत राहू.” 

Continues below advertisement


दिग्दर्शक जेम्स व्हँडरबिल्टचा न्युरेम्बर्ग हा सिनेमा पाहताना या प्रसंगाची आठवण होते. जर्मनी दुसरं महायुघ्द हरलं. हिटलरने आत्महत्या केली. हिटलरचे साथीदार परागंदा झाले. अटक आणि मॉल लिंचिंगच्या भितीने अनेकांनी सायनाइड खाऊन जीव दिला. नाझी साम्राज्य असताना ते अगदी खुख्खार होते, ज्यूंचा कर्दनकाळ होते. युध्द हरल्यावर ते मानसिकदृष्ट्या खचले. त्यातून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. मित्र राष्ट्राना उरलेल्या नाझी अधिकाऱ्यांबद्दल हिच शंका होती. म्हणून तणावात असलेल्या माजी नाझी अधिकाऱ्यांच्या आत्महत्या रोकण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर पध्दतीनं शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी एका मानसोपचारतज्ज्ञाची नेमणूक केली गेली. डगलस केली असं त्या मानसोपचारतज्ज्ञाचं नाव. केलीनं या नाझी अधिकाऱ्यांचा पॅटर्न शोधून काढला. ते काय विचार करतात, नक्की काय झालं ही ते आत्महत्येकडे वळू शकतात, याचा अभ्यास केला. खासकरुन नाझी अधिकारी हरमन गोअरिंगसोबतचा त्याचा अभ्यास पुढे जाऊन ऐतिहासिक न्युरेम्बर्ग खटल्याचा महत्त्वाचा दुवा ठरला आणि मित्रराष्ट्रांनी या सर्व नाझी अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा दिली. 


जगाच्या इतिहासात न्युरेम्बर्ग खटल्यांला फार महत्त्व आहे. हा खटला म्हणजे नाझींनी ज्यूंवर जे अतोनात हाल केले, माणुसकीला काळीमा फासेल असं काम केलं त्याचं डॉक्युमेन्टेशन आहे. छळछावण्या उभारुन नाझींनी जो नरसंहार केला त्याची कागदोपत्री नोंद या खटल्यादरम्यान झाली. हिटलर गेला, पण हरमन गोअरिंग सापडला. हरमन ज्यूंच्या नरसंहाराची कल्पना ज्यांना सुचली त्यापैकी एक. छळछावण्याचा कर्ताधर्ता. हिटलरचा वफादार साथीदार. हिटलरनंतर त्याचा वारसदार तोच होता. ६ फूट आणि १५० किलोचा हा महाकाय माणूस जणू काही राक्षसच. तो चलाख होता. खटल्याच्या वेळी त्यानं व्यक्त केलेली मतं ही आपण काहीही अयोग्य केलेलं नाही, असं सांगणारी होती. नाझी का तयार झाले, छळछावण्या का तयार केल्या, ज्यूंना का मारलं यासंदर्भातलं त्याचं, त्याचं एक आर्ग्युमेन्ट होतं. 


न्युरेम्बर्ग (२०२५) हा सिनेमा मानसोपचारतज्ज्ञ केली आणि गोअरिंगमधल्या संवादासाठी जास्त महत्त्वाचा आहे. एका प्रसंगात केली त्याला म्हणतो, “ तुम्ही लाखो ज्यूंना मारलंत. याचं तुम्हाला काय वाटलं नाही का? ” गोअरिंग लगेच उत्तर देतो, “ अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले, शहरं उध्वस्त केली, लाखो लोक मेले, ते करताना तुम्हा अमेरिकन लोकांना काय वाटलं नाही का? काय फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आम्ही ही माणसं मारली, तुम्हीही तेच केलं. ” 


जेम्स व्हँडरबिल्टच्या न्युरेम्बर्ग (२०२५) सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत जे अमेरिकेची दुसरी बाजू दाखवतात. त्याच्या बिग ब्रदर इमेजला थेट आव्हान देतात. न्युरेम्बर्ग सिनेमाचा खरा हिरो हा हरमन गोअरिंगची भूमिका करणारा अभिनेता रशेल क्रो आहे. यापूर्वी ग्लॅडिएटमध्ये (2000)  रशेल क्रोनं जे तगडं काम केलं होतं. त्यापेक्षा ही वरचढ असं काम या सिनेमात केलंय. हरमनच्या स्वभावातले वेगवेगळे पैलु त्यानं खुप चांगले पकडले आहे. हरमन हा बदमाश अधिकारी होता. त्याला माहित होत की आपल्याला फाशी होणार, पण ती होण्याची प्रक्रिया जितकी लांबवता येईल तेव्हढी लांबवायची, आपल्या कुटुंबाची सोय लावायची, पण आपलं नाझीपण सोडायचं नाही असा हा हरमन क्रोनं अगदी जबरदस्त साकारला आहे. त्याला साथ मिळाली ती रमेन मलेकची. मलेकनं मानसोपचारतज्ज्ञ केलीची भूमिका केली आहे. 


न्युरेम्बर्ग हा सिनेमा कोर्टरुम ड्रामा आहे. त्याआधी एका तरुंगात केली आणि हरमनमध्ये होणारे, संवाद, फ्लॅशबॅक आणि वर्तमानातून सिनेमाचं कथानक घडत जातं. झोडियाक आणि द अमेझिंग स्पायडर-मॅन च्या पटकथेसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक व्हँडरबिल्ट यांनी आपल्या सिनेमावरची पकड कायम ठेवलेय. यापूर्वी स्टॅनली क्रॅमर यांचा जजमेन्ट अॅट न्युरेम्बर्ग (१९६१) हा सिनेमा चांगलाच गाजला होता. त्याचं कथानक ही असंच होतं.  टू किल अ मॉकिंगबर्ड आणि  अ फ्यू गुड मेन सारख्या सिनेमांनी या खटल्याचे संदर्भ दिले होते. पण व्हँडरबिल्ट यांचा न्युरेम्बर्ग प्रचंड वातावरण निर्मिती करतो. तो फक्त कोर्टरुम ड्रामा राहत नाही तर माणूस, त्याची मानसिकता, त्याचं सुख, दु:ख या पलिकडे जाऊन त्याच्या नैतिकतेवर भाष्य करतो. 


हिटलर असो वा गोअरिंग. ते वेडा होते की महत्त्वकांक्षी? याची उत्तर मानसोपचाराच्यादृष्टीनं मिळण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आले आहेत.