आजकाल गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या सेलिब्रेटीलाच पाचारण करतात मग तो कार्यक्रम छोटा असो वा मोठा. छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील सेलिब्रेटींच्या वाढत्या संख्येमुळे हा नाहीतर तो, तो नाही तर ही करत करत कोणता ना कोणता सेलिब्रेटी कार्यक्रमासाठी मिळतोच मिळतो. राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि कौटुंबिक कार्यक्रमापासून शालेय बक्षीस वितरण कार्यक्रमापर्यंत सगळीकडे प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या फेमस चेहऱ्याचाच बोलबाला असतो. हे एखादे वर्तमानपत्र व त्यातील कार्यक्रमविषयीचा वृत्तांत नजरेखालू्न घातला किंवा त्या कार्यक्रमविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर बघितले तरी लक्षात येईल. कार्यक्रमाच्या विषयाचा आणि त्या सेलिब्रेटीच्या कार्यक्षेत्राचा दूरदूर पर्यंत संबंध नसला तरी चालणारा असतो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे किंवा वक्ते म्हणून सेलिब्रेटी बोलावण्यामागे बहुतांशी आयोजकांचा सरळसरळ हेतू हा कार्यक्रमासाठी गर्दी खेचणे हा असतो हे उघड सत्य आहे. काही कार्यक्रम याला अपवाद आहेतच पण ते बोटावर मोजण्याइतके.
पूर्वी एखाद्या सेलिब्रेटीला केवळ भेटण्यासाठी, बघण्यासाठी म्हणून लोक कार्यक्रमाला गर्दी करायचे. कार्यक्रम संपल्यानंतर त्या सेलिब्रेटच्या कामाविषयी बोलायचे, कौतुक करायचे आणि फार फार तर त्याचा/तिचा ऑटोग्राफ घेऊन तो संग्रही ठेवायचे. पण हल्ली लोक कार्यक्रमात जातात ते त्या सेलिब्रेटला भेटण्यासाठी नाही की त्याच्याशी संवाद साधण्यासाठी नाही. लोक जातात ते केवळ त्या सेलिब्रेटी सोबत सेल्फी काढून घेण्यासाठी. कार्यक्रम संपला रे संपला की केवळ सेल्फीसाठी कार्यक्रम संपेपर्यंत व्यासपीठाजवळ ताटकळत थांबलेले सेल्फीप्रेमी त्या सेलिब्रेटीला ' सेल्फी प्लीज' म्हणतात पण त्या सेलिब्रेटीच्या होकार-नकाराची वाटही न पाहता दोघांच्या समोर मोबाईल धरून फोटो क्लिक करतात. काही असेही सेल्फीप्रेमी नग आहेत जे 'सेल्फी प्लीज' चं सौजन्य तर दाखवत नाहीतच पण सेल्फी काढून झाल्यावर थँक्सही न म्हणता राजाच्या थाटात निघून जातात. त्यांना घाई असते ती विथ इन अ सेकंदात तो सेल्फी आपल्या फेसबुक वॉलवर अपलोड करण्याची, वॉट्स अॅपला डीपी, स्टेटस ठेवण्याची. एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत आपण सेल्फी काढला या भोंगळ स्वकर्तृत्वात ते कमालीचे मग्न होऊन जातात. फेसबुक, इन्स्टाग्रामवर मिळालेल्या लाईक्स, कंमेंट्सच्या वर्षावाने सातवे आसमान पर जाऊन पोहोचतात. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपली कॉलर ताट करू पाहतात.
मागच्या आठवड्यात चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या व्यक्ती एका कार्यक्रमासाठी मुंबईत आल्या होत्या. एक होता हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि दुसरा होता तमिळ चित्रपट दिग्दर्शक मरी सेल्वराज. ते दोघे उपस्थित असलेला कार्यक्रम संपल्यानंतर पुढचे दोन दिवस कित्येक लोकांच्या फेसबुक वॉलवर, इन्स्टाग्राम अकाऊंट वर त्या दोघांसोबतचे सेल्फी दिसले. ' अनुराग सोबत काही निवांत क्षण' , ' मरी सेल्वराजसोबत ग्रेट भेट' या कॅप्शन खाली अनेकांनी हजार पाचशे लाईक्स आणि दोन तीनशे कमेंट्स ची कमाई केली होती. 'आवडते दिग्दर्शक' या कॅप्शनखाली एकापाठोपाठ एक अनुराग आणि सेल्वराजसोबतचे सेल्फी पोस्ट केलेल्या एका सेल्फीप्रेमी भिडूला मी प्रश्न विचारला की " अनुरागचा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा कोणता?', " सेल्वराजने कोणत्या भाषेत सिनेमा बनवला.?" तर त्या सेल्फीप्रेमी भिडूला एकाही प्रश्नाचे नीट उत्तर देता आले नाही. त्याच्या त्या सेल्फीखालची माझी कंमेंट त्याने काढून टाकली तेंव्हा मी काय समजायचं ते समजले.
दोनेक वर्षांपूर्वी तर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मिडियावर डकवून आपण नागराजच्या किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा ट्रेंड उसळला होता. नागराज सहज ऍक्सेसेसेबल असल्याने, छोट्या मोठ्या कार्यक्रमांना सतत हजेरी लावत असल्याने लोकांनाही त्याच्यासोबत सेल्फी घेणं सहज शक्य झालं, आजही होतंय. हे प्रमाण इतकं वाढलं होत की ज्याचा नागराज सोबत सेल्फी नाही त्याला न्यूनगंड येण्याची वेळ आली होती. नागराज किंवा अशा काही सेलिब्रेटींना चेहरा सतत हसरा ठेवणं जमत असलं तरी ते प्रत्येक सेलिब्रेटीला जमेलच असं नाही. अनेकदा सेलिब्रेटी लोक दूरचा प्रवास करून आलेले असतात. भेटणाऱ्या प्रत्येकाला हाय, हॅलो करून वैतागलेले असतात. समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात बघून उसनं हसू आणायचं कसब दाखवणं ही काही सोपी गोष्ट नाही पण चाहत्यांच्या प्रेमाखातर हे सेलिब्रिटी काही बोलत नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी कॅमेरा टिपतोच. शेवटी या सेल्फीपुरणाचा अतिरेक होऊन 'कार्यक्रम नको पण सेल्फी आवर' म्हणण्याची वेळ त्यांच्यावर न येईल तर नवलच.
सेलिब्रेटींसोबत सेल्फी घेणं ही अजिबातच कर्तृत्वाची गोष्ट नाही. उलट त्या सेलिब्रेटींच्या संयमाची परीक्षा पाहणं आहे. एकतर हे सेल्फीप्रेमी सेलिब्रेटींच्या कामाबद्दल तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. त्यांना काही प्रश्न विचारत नाहीत. फक्त सेल्फी एके सेल्फी चा पाढा गिरवतात. या सेल्फींना घाबरून अनेक सेलिब्रेटी कार्यक्रमांना जाणं टाळू लागले आहेत असंही ऐकण्यात आलं आहे. ' सेल्फी विथ सेलिब्रेटी' चा भयानक रोग सेल्फीप्रेमींना जडला आहे आणि या रोगाची लागण स्मार्टफोन वापरणाऱ्या शंभरातल्या नव्यानव लोकांना झाली आहे. सेलिब्रेटींना घराबाहेर पडणं या लोकांनी मुश्कील करून टाकलं आहे. सेल्फी विथ सेलिब्रेटी चा ज्वर चढलेल्या लोकांसाठी फेक सेल्फी बनवणारे ऍप ही उपलब्ध आहेत. ' To Make a Fake Picture With Famous People to Impress Your Friends and Family.' अशी गळ घालणारे कित्येक ऍप ऑनलाईन मिळतात. दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे सेलिब्रेटी सोबत सेल्फी घ्यायला मिळाला नाही तर असे फेक सेल्फी बनवून मित्रांना-मैत्रिणींना इंप्रेस करू पाहणारे लोक आहेत.
कोणता सेलिब्रेटी येणार आहे हे बघून कार्यक्रमाला उपस्थित राहणारी जमात झपाट्याने वाढते आहे. आपण ज्या कार्यक्रमात जातोय तिथे कार्यक्रमात निमंत्रित केलेला सेलिब्रेटी आपल्या भाषणात नेमकं काय बोलतोय? त्याच्या यशस्वी होण्यामागचा स्ट्रगल किती मोठा आहे? त्याच्याकडून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे का? याचा विचार करायला सेल्फीप्रेमींना अजिबात वेळ नसतो. किंबहुना तो सेलिब्रेटी जो काही चार शब्द बोलतो त्याकडे लक्ष देण्यापेक्षा हे मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यातच धन्यता मानतात. सेल्फी विथ सेलिब्रेटीच्या रोग्यांमध्ये अधिकतर तरूणपिढीचा समावेश आहे. ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाने नाही तर सेलिब्रेटी सोबत सेल्फी घेऊन स्वकौतुक करून घेत मोठं व्हायचं आहे, प्रसिद्ध व्हायचं आहे. ' ही प्रसिद्धी केवळ काही तासांपुरती फार फार तर एखाद्या दिवसापुरती मर्यादित असते, आजचं वर्तमानपत्र जसं उद्या रद्दीत जातं तसा आजचा सोशल मीडियावर डकवलेला सेलिब्रेटी सोबतचा सेल्फी उद्या लोकांच्या विस्मरणात जाणार असतो ' याची जाणीव त्यांना अजूनतरी झालेली नाहीय असंच चित्र आहे.
सेलिब्रेटी सोबत सेल्फी घेणं सोपी गोष्ट आहे पण सेलिब्रेटी होणं अजिबात सोपं नाही. फक्त हातात स्मार्टफोन घेऊन फिरल्याने कुणी सेलिब्रेटी होत नसतो त्यासाठी हातातला मोबाईल बाजूला ठेवून परिश्रम करावे लागतात हे 'सेल्फी विथ सेलिब्रेटी' चा रोग जडलेल्यांच्या गावीही नाही. काही पर्यटनस्थळी, प्रदर्शनात ' येथे फोटो घेण्यास सक्त मनाई आहे.' असे बोर्ड लावलेले असतात. हा नियम फाट्यावर मारत कुणी फोटो घेत असल्याचं निदर्शनास आलं तरी त्यांना तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून फटकारलं जातं. त्याच धर्तीवर ज्या कार्यक्रमात सेलिब्रेटी येणार आहेत त्या कार्यक्रम स्थळाच्या गेटवरच ' नो सेल्फी विथ सेलिब्रेटी ' चे बोर्ड लावायला हवेत जेणेकरून लोक फक्त कार्यक्रमासाठी म्हणून येतील ना की सेलिब्रेटी सोबत सेल्फी घेण्यासाठी. आणि कार्यक्रमालाही उथळ गर्दीपेक्षा दर्दींची संख्या अधिक वाढेल.