गोव्यात जाण्याचा पहिला योग आला तो २००२च्या निवडणूकीच्यावेळी. पहिल्यांदाच जात असल्याने गोव्याबद्दल अनेक कल्पना डोक्यात होत्या. गोव्यात माहितीची अशी दोनच माणसं होती. एक म्हणजे राजू नायक आणि दुसरा संजय ढवळीकर. मी त्यांना ओळखत होतो, तेही फक्त नावाने. गुरुवारी सायंकाळी गोव्यात डेरेदाखल झालो. पणजीतल्या “अल्तिनो”ला असलेल्या सर्किट हाउसमध्ये बुकिंग असल्याने निवांत होतो. दुसऱ्या दिवशीसकाळी पणजीत फिरलो पण जवळपास सर्व गाव बंद. गुड फ्रायडेमुळे त्यादिवशी संपूर्ण पणजीला सुटी असल्याचं कळलं. त्यामुळे संजय ढवळीकरशी ओळख करुन घेऊन छान गप्पा झाल्या. दुपारनंतर बीच दर्शनाचा कार्यक्रम करुन अल्तिनोला आलो. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो, तर पुन्हा कालचाच प्रकार. संपूर्ण पणजी बंद. चौकशी केल्यावर होळीनिमित्त पणजी बंद असल्याचं कळलं. मग राजू नायककडे मोर्चा वळवला. बऱ्याच गप्पा झाल्यानंतर त्याने मनोहर पर्रिकर नावाच्या माणसाला सल्ला दिला. त्याने दिलेला सल्ला शिरोधार्ह मानत मोर्चा बीजेपी कार्यालयाकडे वळवला. तिथे अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर या सद्गृहस्थांची भेट झाली. पहिल्याच भेटीत या माणसाने मला पूर्णतः खिशात टाकलं. (त्यामुळे राजू नायक अजूनही मला टोमणे मारतो.) साधा डिसेंट अर्ध्या बाह्यांचा शर्ट चष्म्याच्या वरुन थेट डोळ्याला डोळे भिडवत ठामपणे बोलणं आणि मिष्कील हास्य...हा माणूस गोव्याचा मुख्यमंत्री होईल, असं ठामपणे सांगणं कठीण होतं. त्यावेळचे संघाचे मोठे कार्यकर्ते असलेले शरदभाऊ कुलकर्णी त्यावर ठाम होते.


गोव्यातला माझा तिसरा दिवस रविवारचा. अस्सल गोयंकाराचा हा हक्काचा सुटीचा दिवस. त्यामुळे पुन्हा सगळं बंद. रविवारचा बंद म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेने पुकारलेल्या बंदसारखा कडकडीत. हॉटेलवर बसून काय करणार...त्यामुळे गोव्यातल्या परंपरेनुसार बाईक भाड्याने घेउन जरा फिरलो.

काळ पुढे सरकत होता....पर्रिकरांच्या भेटीगाठीही होत होत्या. जवळपास प्रत्येक भेटीत चहावाला उशिरा येत असल्याने चर्चांचा (खरंतर गप्पाच) कालावधी वाढत गेला. या सगळ्या भेटींमधून या माणसाच्या कामाचा उरक, त्यांच्यात ठासून भरलेली प्रगल्भता, त्यांच्यातल्या माणूसपणा जाणवत राहिला. निवडणुका आटोपल्या. भाजपाने घवघवीत यश मिळवलं आणि पर्रीकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे ठरलं. शपथविधी समारंभासाठी गोव्यातल्या देखण्या राजभवनावर आम्ही पोहोचलो. पर्रिकर प्रसन्न चेहेऱ्याने सर्वांशी गप्पागोष्टी करत होते. माझ्या कॅमेरामनला मी पर्रिकरांचे कटअवेज् ( शॉट्स) घ्यायला सांगितले. हा माणूस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, जरा चांगले शॉट्स घे अशी अगांतूक सूचनाही माझ्या कॅमेरामनला केली. पण फिकट पोपटी रंगाच्या चेक्सचा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट, पायात साध्या सॅण्डल्स. माझ्या कॅमेरामनने मुंबईतले अगदी पडलेले नगरसेवकही कसे राहतात हे पाहिले असल्याने मी त्याची चेष्टा करत असल्याची त्याची भावना झाली. पण पर्रिकरांनी जेव्हा शपथ घेतली, तेव्हा त्याचे फिरलेले डोळे मी पाहिले.

मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कालावधीत त्यांनी घेतलेले धडाडीचे निर्णय आणि त्याची कडकपणे केलेली अंमलबजावणी मी अगदी जवळून पाहिली. त्याच वेळचा एक किस्सा आहे. त्यांच्याकडे सरकारी निवासस्थानी एका बातमीसाठी बाईट घ्यायला गेलो होतो. त्यांना कुठे तरी जायचं असल्याने त्यांनी बाईटला नाही म्हटलं. मग मी आमची नेहेमीची टॅक्ट वापरत, सर फक्त ९० सेकंद हवीत, त्यापेक्षा जास्त तुम्ही सुद्धा तुम्हाला टीव्ही पाहायला कंटाळाल, वगैरे नेहमीची टेप लावून त्यांना पटवले आणि त्यांचा बाईट घेतला. पर्रिकरांची बाहेर जाण्याची घाई पाहून ते कुठे चालले असावेत याविषयी मनात कुतूहल निर्माण झालं. कदाचित बातमी मिळेल, या आशेने मी त्यांना कुठे एवढ्या घाईने निघालात, असं विचारुन त्यांच्याबरोबर निघण्याची तयारी दर्शवली. या माणसाने दिलेलं उत्तर ऐकून माझ्यातला पत्रकारितेचा माज, इगो, आपण कुणीतरी स्पेशल असल्याची भावना क्षणार्धात थंड पडली. त्यांनी सांगितलं, अरे नितीन, माझा स्वतःचा व्यवसायपण आहे. त्यासाठी मी बँकेत कर्जासाठी अर्ज केलाय आणि त्या बँकेच्या मॅनेजरने मला मुलाखतीसाठी मला बोलावलंय. तिथे वेळेत पोहोचायचे आहे. एखादा मुख्यमंत्री कर्जासाठी अर्ज करतो आणि त्यासाठी बँक मॅनेजरशी मुलाखतीसाठी वेळेत जाण्याची धडपड करतो....माझ्यासाठी ही इतकी आश्चर्याची बाब होती, की हा किस्सा कायमचा हृदयावर कोरला गेला.

एवढं मोठं पद भूषवताना हा माणूस एवढा साधा कसा राहू शकतो..याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालं नाही. त्यानंतर पर्रिकरांनी अनेक मोठमोठी पदं भूषवली. अगदी देशाच्या संरक्षणमंत्रीपदीही ते विराजमान झाले. मोठमोठी अगदी अशक्यप्राय कामंही केली. पण शेवटपर्यंत प्रत्येकवेळी ते तेवढेच साधे राहिले......मी माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही शोधतोय. राजकारण्यांबद्दल सामान्यांना फारसा आदर नसतो. पत्रकारांना तर तो आजिबात नसतो. पण आभाळाएवढं कर्तृत्व असणाऱ्या, आपल्या राहणीने आणि वाणीनं सर्वांनाच आपलंस करुन घेणाऱ्या पर्रिकरांना तो आदर सहज मिळत गेला.

राजकारणाच्या चिखलात राहूनही कमळाचं स्वच्छपण जपणाऱ्या या दुर्मिळ राजकारण्याला मनापासून सलाम...