काय पाप केले|
संकट ओढावले
रस्ते बंद झाले|
माहेराचे||


काय अपराध झाला|
का कोणी शाप दिला
तेणे कोप ओढावला |
करुणा रूपे ||



उद्धव ठाकरे... नुसतं नाव जरी घेतलं तर नजरेसमोर येतात ते एक हसमुख, मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व. अतिशय नम्र तुमच्या-आमच्यातलाच एक व्यक्ती अशी या माणसाची ओळख. तशी दुसरी ओळखही आहे. ते उत्तम फोटोग्राफर आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी एरियल फोटोग्राफी केली होती. यासाठी त्यांनी विशेष परवानगी काढली होती. राज्यातील गड-किल्ले, देवस्थानांची त्यांनी छायाचित्रे काढली होती. त्याअनुषंगाने पंढरपूर येथील वारीची अनेक छायाचित्रे त्यांनी टिपली होती. त्या छायाचित्रांचा आधारावर त्यांच्या संकल्पनेतून एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. त्याला प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा स्वरसाज होता..



एरियल फोटोग्राफी करताना हेलिकॉप्टरमधून वारीमार्गावरील सर्व प्रदेश पालथा घातला होता. तोही एक सर्वसामान्य फोटोग्राफर म्हणून. आज मात्र उद्धवजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या रूपात पंढरपूरला गेले आहेत. सपत्नीक विठ्ठलाची शासकीय पूजा केली. सामान्य माणूस म्हणून जाताना ते हेलिकॉप्टरने गेले होते व आज मुख्यमंत्री पद असताना त्यांनी बायरोड जाणं पसंत केलं आहे, तेसुद्धा स्वतः गाडी चालवत. कधीकाळी हा माणूस कोणत्याही राजकीय पक्षात नव्हता, आमदार किंवा खासदार, मंत्रीही नव्हता. एरियल फोटोग्राफी करत वारी करणारा हा आज बाहेर जातोय तोही मुख्यमंत्री म्हणून. पांडुरंगाची लीला न्यारीच.


कोणत्या मार्गाने कशी आणि कशाप्रकारे वारी पूर्ण होईल हे पांडुरंग ठरवत असतो ते या सगळ्या घटनेकडे पाहताना दिसून येते आहे. आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात प्रवेशास भक्तांना मनाई आहे. वारीच्या शेकडो वर्षातला 'भक्तांविना विठ्ठल' अनुभवण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. आणि तेसुद्धा उद्धवजी मुख्यमंत्री असतानाच. त्यामुळे उद्धवजींच्या मनात


'क्षमा करी हरी|
चुकली पायी वारी|
संकट आले भारी ||
करोना रूपे ||'
अशी भावना असावी काय...?


उद्धवजींच्या मनात असले-नसले तरी सर्वसामान्य वारकऱ्यांच्या मनात मात्र
'काय पाप केले|
संकट ओढावले||
रस्ते बंद झाले|
माहेराचे||
हे शल्य आहेच आहे...
त्यामुळे या घोर संकटसमयी वारकऱ्यांच्या मनात
'आगा विठुराया |
येऊ दे गा दया||
सोडवी महा भया |
पासूनीया ||'
ही भावना असावीच. नव्हे आहेच....
अस्वस्थ वारकरी घरात बसून नामसमरण करीत आहे...
'देह असे घरी |
मन करी वारी||
सुनी ही पंढरी |
दिसत असे ||


पंढरीची वाट |
वैष्णवांचा थाट||
दिसे दिवेघाट |
सुनासुना ||


भजन कीर्तन|
टाळ मृदुंगाची धून||
दिसेना रिंगण |
कोठे काही ||


पंढरी वैकुंठ |
रिते वाळवंट ||
दाटला से कंठ|
पांडुरंगा ||


आता घरीच बसुनी|
करू तुझे ध्यान||
लावूनिया मन|
तुझे पायी ||