आज मराठी भाषा गौरव दिन. त्यामुळं अर्थातच सर्वांना शुभेच्छा देतो. कारण मराठी भाषा माझी मातृभाषा आहे. मला सर्व विचार या भाषेत सुचतात. ही भाषा मला माझ्या समाजाशी जोडते. ही भाषा माझं व्यक्त होण्याचं सर्वात ताकतीचं शस्त्र आहे. अर्थात मराठी माझ्या जगण्याची गोष्ट आहे. पण मग यात माज किंवा अत्युच्च लेव्हलचा फुकाचा अभिमान असला पाहिजे का? जगण्याची भाषा असणं ही एका भाषेचं तुमच्या आयुष्यातलं स्थान अधोरेखित करायला पुरेसं नाही का? इतर भाषांचा द्वेष करून किंवा त्या भाषा मोडीत काढून आपली भाषा मोठी करता येते का? आणि भाषा मोठी करणं किंवा तिला दर्जा प्राप्त करून दिल्यानं आपलं काम संपणार आहे का? असे एक ना अनेक सवाल आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनात उठलेत. आज महाराष्ट्रभर मराठीच्या कौतुकाचे सोहळे सुरू आहेत. अगदी विधानभवनापासून ते एखाद्या खुर्द बुद्रुक गावातल्या झेडपीच्या शाळेपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमाने आपल्या मायबोलीचं स्मरण करून तिच्याप्रति आदरभाव व्यक्त केला जातोय. कुठलंही सरकार आलं की अस्मितेच्या नावावर मराठी भाषेसाठी अमकं करून तमकं करू अशा भारदस्त घोषणा दर 27 फेब्रुवारीच्या निमित्ताने करतं. काही गोष्टी अमलात आणल्या जातात मात्र अनेक गोष्टी हवेतच विरतात. असो, मराठी भाषेसाठी आपण जे काही करतोय ते पुरेसं आहे का? भाषा समृद्ध करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? यावर मराठीवर खरंखुरं प्रेम करणारी साहित्यिक मंडळी आपल्या कृतीतून करत असतात, करतात. जगात हजारो भाषा आहेत. प्रत्येक भाषेची आपली स्वतंत्र लिपी आहे. स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र भारतात हिंदी आणि मराठी सोडून कुठल्या भाषेचा दिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केल्याचे कधी ऐकले नाही. त्यातल्या त्यात मराठी भाषेचा दिवस साजरा करताना अभिमान आणि स्वाभिमानाच्याच गोष्टी जास्त केल्या जातात. दोनेक वर्षांपूर्वी 14 सप्टेंबरला गेल्या वर्षी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मी हिंदी भाषेचं महत्व मराठीतून सांगितलं होतं. कारण त्या पोरांसाठी सहज संवादाची भाषा ही मराठी होती. हिंदी भाषा एवढी महत्वाची आहे, रोजगार देणारी आहे हे मराठीतून ऐकल्यावर पोरांच्या मनात हिंदी भाषेविषयी प्रचंड आस्था आणि आवड निर्माण झाली होती. त्यांनी हिंदीतून चांगलं शिक्षण घेण्याची इच्छाही बोलून दाखविली. अर्थात हे सांगण्याचा उद्देश हाच कि कुठलीही भाषा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसते. व्यक्तींमधील संवाद सुरळीत आणि सहजपणे होण्यासाठी वापरले जाणारे जे सशक्त माध्यम असते ते माध्यम भाषा असते. अ अ आईचा, म म मराठीचा किंवा गुटीकाटी एक, आडवा घोडा दोन असं म्हणत ज्ञानार्जनाला सुरुवात करणारे आम्ही आपल्या पोरांकडून मात्र ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल आणि वन, टू, थ्री, फोरची तयारी करून घेण्यात वेळ घालवतो. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, जॉनी-जॉनी येस पप्पाच्या प्रवाहामध्ये ये ग गाई गोठ्यात, काव काव कावळाच्या कविता कुठल्या कुठे लुप्त झाल्यात ही गोष्ट मराठीचा फुकाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांच्या घरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. अर्थातच पर्सनली माझा कुठल्याही माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाला आजिबात विरोध नाही. ज्ञान हे ज्ञान असतं ते कुठल्याही माध्यमातून मिळो अथवा भाषेतून मिळो. मात्र वर-वर भाषेचा अभिमान बाळगत दुसऱ्या भाषेला शिव्या देणारे महानुभवांचे पीक सध्या जोरात आहे. कुठल्याही भाषेतला तज्ञ असला तरी तो सर्वाधिक कम्फर्ट हा त्याच्या मातृभाषेतच असतो. कारण मातृभाषेत संवाद साधताना आपल्याला विशेष काही करावं लागत नाही. आपण महाराष्ट्रात राहतो. आपली मातृभाषा मराठी आहे. म्हणून मराठी आपल्यासाठी कम्फर्टेबल आहे. आपले विचार सुरु होतात मराठीत आणि संपतात मराठीत. त्यामुळे अर्थातच मराठी भाषेबद्दल विशेष सन्मान आहे. तिचा कुठेही अपमान व्यक्तिगत पातळीवर होणार नाही याची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. मराठी भाषेसह जेवढ्या भाषा जाणतो त्या सर्व भाषांचा आदर आपल्याला असला पाहिजे किंवा जी भाषा आपण जाणत नाहीत त्या भाषेला शिकण्याची किंवा समजून घेण्याची आस्था आपल्या मनात पाहिजे. यामुळे सरळ संवाद आणि विश्वबंधुत्वाची कल्पना आपण करू शकतो. एक सर्वात महत्वाची गोष्ट कुठल्याही अन्य भाषेमुळे एखादी भाषा कधीच संपत नसते. भाषेएवढं मजबूत कुणीही नाही. कुठलीच भाषा कुठल्या अन्य भाषेला मारत नाही, ती आपली सायकोलॉजी आहे. इंग्रजीमुळे मराठीचे नुकसान झालेय अशी शिक्षणक्षेत्रात मोठी चर्चा सुरु आहे. यावर अनेक चर्चासत्रे घडविली जातात. मात्र मूलभूत शिक्षणाच्या चांगल्या दर्जाची सोयी आपण मराठी माध्यमात आणल्या तर नक्कीच यात बदल होणार आहे. महाराष्ट्राच्या एकदम कोपऱ्यात असलेल्या भंडारा जिल्ह्यातील खराशी या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. मराठीसोबत इंग्रजी माध्यमात इथं शिक्षण दिलं जातं. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी इंग्रजीत संवाद साधतो आणि तेवढंच छान मराठीही बोलतात. इथं प्रवेश घेण्यासाठी आसपासच्या शेकडो गावांतून पालक येतात. शाळेला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी इथं जाऊन सहल करून येतात, मात्र अंमलबजावणी का होत नाही? हा सवाल आहे. खरंतर विदर्भासारख्या राजकीयदृष्ट्या उपेक्षित प्रदेशात असं सक्षम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आज जिल्हा परिषदेच्या एक नाही अनेक शाळा अशाच पद्धतीनं रोल मॉडेल बनताहेत. इंग्रजीचं अतिक्रमण झालं अशी ओरड आपण नेहमीच करतो आणि पोरांच्या शिक्षणासाठी कॉन्व्हेंटच्या पायऱ्या झिजवत राहतो. हा विरोधाभास नष्ट व्हायला हवा. भाषेला आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरणाऱ्या झेंडाबहाद्दरांची कमी आपल्या महाराष्ट्रात नाही. सोबतच एखाद्या जातीचा भाषेशी संबंध लावणे देखील हास्यास्पद आहे. कित्येक अमराठी लोकांचे देखील मराठी भाषेसाठीचे योगदान अफाट आहे. भाषेच्या नावाने अस्मिता तयार करणाऱ्या झेंडाबहादारांपासून सावधान राहणे खरोखर आवश्यक आहे अशा लोकांना कशाशीही देणेघेणे नसते. उगाच पुळका दाखवतात. आपल्या मातृभाषेचा सन्मान करा, बरोबरच दुसऱ्या भाषेलाही मान द्या आणि अवगत करा, याने आपली भाषा जास्त मजबूत होते. सर्वात महत्वाचं म्हणजे एक दिवस साजरा केल्याने भाषेचा विशेष गौरव होत नसतो. मुक्या-बहिऱ्यांचीही भाषा असते. त्यांनी गर्व कसा बाळगायचा? भाषा ही आपल्या जगण्याची गोष्ट आहे, तिला कुठल्याही पारड्यात तोलने मूर्खपणा आहे. 'आपण केवळ मराठी भाषेचा अभिमान बाळगतो, कारण अभिमान बाळगण्यासाठी काही करावं लागत नाही’ असं बालसाहित्यिका माधुरी पुरंदरे सांगतात हे काही खोटं नाही. केवळ मराठी भाषा दिनी पारंपारिक लूकमध्ये येत सेलिब्रेशन करणं म्हणजे मराठीचा अभिमान नव्हे. सरकारी फायलींमध्ये दरवर्षी 'अभिजात भाषा', 'भाषेला दर्जा' 'मराठी सक्ती' अशा गोंडस नावाखाली ही भाषा घोळत राहतेय. असं सक्तीनं कुठलीही गोष्ट समृद्ध होत नसते. मराठीला लहान बाळासारखं अंगाखांद्यावर खेळवूया. ती कुपोषित नाहीये, तिच्यात ताकत आहे स्वतः मोठं होण्याची.
BLOG | मराठी : भाषा जगण्याची गोष्ट, अभिमानाची नाही!
निलेश झालटे, एबीपी माझा
Updated at:
08 Aug 2021 03:00 PM (IST)
Published at:
27 Feb 2020 05:27 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -