पालघरमधला व्हिडिओ पाहून अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. माणूस म्हणून न घेण्याच्या लायकीच्या समाजात आपण राहतोय. गर्दीला, झुंडीला डोकं नसतं हे त्रिवार सत्य आहे. वृद्ध महंत आणि अन्य दोघांना अक्षरशः धोपटून दांडक्यांनी, दगडांनी मारलंय. तिघांचाही जीव गेला. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ते व्हिडीओ पाहून आणि जीव वाचवण्यासाठी त्या तीन निष्पाप लोकांची धडपड पाहून अंगावर काटा उभा राहिला. माणूस म्हणून आतून बाहेरून पुरता हादरून गेलोय. यानंतर सोयीनुसार ह्यात धर्म आणि जात फॅक्टर जो नेहमी घुसडला जातो, तो घुसवणं चालुय, घुसवला जातोय. मात्र या घटना घडण्यामागं मूळ कारण आहे भीती. मागे राईनपाड्यात देखील अशीच घटना घडलेली. अशा घटना समाज म्हणून आपल्याला लाज आणणाऱ्या आहेत. ही भीती कुठून येते? अशा अफवा कोण पसरवतं? याचा शोध घेणे देखील गरजेचं आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा होईलच मात्र अफवा पसरवणाऱ्या विकृती देखील शिक्षेपासून वाचायला नको.


#पालघर आधी घटनाक्रम पाहुयात...
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरातमधील सुरतला दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असे तिघेजण निघालेले. महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले या गावी ते आले. यात काहींचं म्हणणं आहे की त्यांना सीमेवरून वापस पाठवलं. तर कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या चौकीजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तेथील ग्रामस्थांनी गाडी रोखून गाडीमधील त्यांना मारहाण सुरू केली. ही बाब कासा पोलिसांना रात्री दहा वाजता समजल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ चौधरी व कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सुमारे वीस-पंचवीस पोलीस कर्मचारी घटनास्थळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तिघांना पोलीस वाहनांमध्ये ठेवल्यानंतर मोठ्या संख्येत असलेल्या जमावाने पोलीस वाहनावर देखील जबर दगडफेक करून पोलिसांनाही पळवून लावले. त्यानंतर दगड, काठ्या व इतर साहित्याने मारहाण करत चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची अमानुषपणे हत्या केली.
(हा घटनाक्रम पोलिसांनी सांगितलेला आणि आमचे पालघर प्रतिनिधी संतोष पाटील यांनी दिलेला)

#अफवांचं पीक बाधतंय....
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सगळीकडे लॉकडाऊन आहे. याच काळात चोर, दरोडेखोर व मुत्रपिंड काढण्यासाठी, मुलं चोरण्यासाठी नागरिक वेशांतर करून येत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पसरली आहे. परिणामी अंधार झाला की या परिसरात अनेक गावांमध्ये स्थानिक मंडळी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांना थांबून जाब विचारणे व वेळप्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. म्हणजे गडचिंचलेत साधूंसह तिघांची हत्या केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी झाई दुबलपाडा येथे एका रस्त्याने जाणाऱ्या भिकाऱ्याला चोर समजून बेदम मारहाण केली. त्याला पोलिसांनी कसेबसे वाचवले. त्याआधी गेल्या आठवड्यात अफवांमुळेच डहाणू तालुक्यातील सारणी येथे डॉक्टर व पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला झाला होता. यामध्ये दोन अधिकारी व दोन कर्मचारी जखमी झाले होते. पालघर जिल्ह्यात ह्या घटनांनी चिंतेचे आणि तणावाचे वातावरण आहे.

आधीच पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाचे काही रुग्ण सापडलेत. त्यात प्रशासनासमोर अफवांचे पीक रोखण्याचे मोठे आव्हान आहे. ह्या घटनेप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे नोंदविण्यात आले असून 101 जणांना अटक करण्यात आली असून इतर 200 ते 300 जण फरार आहेत अशी पोलिसांची माहिती आहे. पोलिसांवर देखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली. दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा याप्रकरणी निलंबितही केले आहे. बाकी तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांची भूमिका काय होती यावेळी? पोलीस वेळेवर पोहोचले होते का? पोहोचले होते तर त्यांनी काही केलं नाही का? वगैरे या प्रश्नांची उत्तरं समोर येतीलच. पण मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या निर्बुद्ध झुंडीसमोर काही पोलीस करणार तरी काय? त्यामुळं आपण पूर्ण दोष त्यांनाच द्यायचा का??? हा मोठा सवाल आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळॆ ही पोलीस कर्मचारी मंडळी आपल्या घरापासून दूर आपल्यासाठी जीव धोक्यात घालून ड्युटी करताहेत. त्यात हे असे प्रकार अचानक घडल्यावर आणि उन्मत्त मॉब समोर असल्यावर काठ्या हातात घेऊन ते तरी काय करणार?? असाही सवाल आहे. असो, आता या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीकडे दिली गेलीय. या चौकशीतून गोष्टी बाहेर येतीलच...

#मुख्यमंत्री काय म्हणाले...
पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील आरोपींना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेय. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयतन करीत आहे मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलंय. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात 100 पेक्षा जास्त लोकांना पकडले. त्यात 9 अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हा झाला घटनाक्रम... यानंतर अशी घटना घडल्यानंतर जे नेहमी होतं ते घडायला सुरुवात झाली. विशिष्ट विचारधारेला फॉलो करणारे लोक्स आपल्या इंटरेस्टप्रमाणे यात उतरले. जुन्या घटनांचे संदर्भ घेत सरकारवर टीका करू लागलेत. यातील काही 'थोर-मोठ्यांच्या' पोस्ट तर विचारांच्या पलीकडच्याच होत्या. काही जण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागू लागले तर काहींनी उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागीतलाय. राज्यातून तर आहेच मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी देशभरातील काही ठराविक नेतेमंडळी करतेय. काही जण त्यांना 'बाळासाहेब असते तर...' वगैरे म्हणत हिंदुत्वाची आठवण करून देताहेत. मात्र अशा घटना भाजपची सत्ता असतानाही घडल्या होत्या, हे मात्र सोयीने विसरले जातेय. आपल्याकडे ही प्रवृत्ती सर्वच विचारधारेत पाहायला मिळते, अर्थात हे नवीन नाहीच. घडलेल्या घटनेला आपल्या सोयीनुसार ओढून ताणून आपल्या 'इन्स्ट्रेस्ट' वर आणण्याचे प्रकार आपण नेहमीच पाहतो.

अर्थात ह्यात महत्वाचं आहे ते लोकांना नेमकी भीती कसली आहे?, कोण पसरवतंय ही भीती? या प्रश्नांची उत्तरं शोधणं.

समाज म्हणून संपलोय आपण... काही लोक याला धर्माचा रंग देत आहेत. खरंतर यातल्या 'अनेकांना' फक्त साधुबाबांच्या मृत्यूचंच जास्त दुःख झालंय. मात्र या निर्मम घटनेत या दोघांसह तिसऱ्या ड्रायव्हरच्या मृत्यूचं देखील तेवढंच दुःख आहे आणि तेवढाच राग आहे त्या यातील दोषींचा. या प्रकरणात 101 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची जात किंवा धर्म हा केवळ 'अमानवीय' एवढाच असू शकतो. या सर्वांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. जेणेकरून पालघर, राईनपाडासारख्या घटना पुन्हा सो कॉल्ड 'पुरोगामी' म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात कदापिही घडता कामा नये.