पार्थाने रणांगणातून माघार घेऊ नये,आपला गांडीव धनुष्यसमोर असलेल्या आप्तेष्टांकडे पाहून खाली ठेवू नये, असं श्रीकृष्णाने महाभारतात पार्थाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे महाभारतातील पार्थाने आपल्या गणगोतासमोर गांडीव धनुष्य उचललाही. खरंतर हा महाभारतातील पार्थ आणि त्याची कामगिरी सर्वश्रुत आहे. पण त्या पार्थाचा संदर्भ आठवण्याचं कारण महाराष्ट्रातल्या राजकीय रणांगणातल्या पार्थाने केलेली कामगिरी होय. हे इथं आधी नमूद केलं पाहिजे. या पार्थानेही सध्या रणांगणात उडी घेतलीये आणि आपला धनुष्य उचलून काही बाणही त्याने चालवलेत. पण ते बाण विरोधकांच्या पथ्थ्यावर पडू लागल्याने राजकीय रणांगणातले भीष्माचार्य असलेल्या पार्थाच्या आजोबांनी त्या बाणांना आणि बाण सोडणाऱ्या पार्थालाही आमच्या लेखी कवडीची किंमत नाही असं म्हटलं. आणि पार्थाचे बाण थोपवण्याचा प्रयत्न केला. भीष्माचार्य कवडीची किंमत नाही असं जरी म्हणत असले तरी पार्थाने मात्र आपली किंमत राजकीयदृष्ट्या वाढवून घेतली आहे हे खरेच. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय महाभारत सुरू झालंय की काय अशीही चर्चा आता होऊ लागली आहे.

हा प्रपंच मांडण्याचं कारण अर्थातच पार्थ पवारांनी सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यावर शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया हे आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काहीवेळ राजकीय वर्तुळाबाहेर गेलेले पार्थ पवार आता एकदमच केंद्रस्थानी आलेत. अलीकडच्या घडामोडींबाबत भूमिका घेण्याची त्यांनी दाखवलेली तत्परता ते मोठी राजकीय इनिंग खेळण्यास इच्छुक असल्याचं सुचित करते आहे..एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नाही असा आरोप भाजपा नेते रोज करतायत.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण मोठ्या प्रमाणात उकळू लागलंय ,माध्यमांमध्ये त्याचे चर्वितचर्वण सुरू आहे. त्यात सरकार म्हणून शिवसेनेला एकटं पाडलं जातंय की काय अशीही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आपल्या सीबीआय चौकशीच्या मागणीने यात फोडणी देण्याचं काम केलं. हे कमी की काय म्हणून मैदान गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या पार्थ पवारांनी राम मंदिर उभारणीसाठी शुभेच्छा पत्र पाठवून राम नामाचा गजर केल्याने भाजपलाही ते आपलेसे वाटू लागले.

सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांच्या भूमिकेला वैयक्तिक ठरवून व्यक्तीस्वातंत्र्याचा दाखला देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी शरद पवारांनी मात्र मौन सोडत नातवाच्या भूमिकेला छेद दिलाय. एरवी व्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक असलेल्या पवारांना सुप्रिया सुळेंप्रमाणे पार्थ यांचे व्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही. कारण महाविकास आघाडीचा तारेवरचा प्रपंच चालवताना पवारांच्या घराण्यातील कुठल्याही व्यक्तीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मीठाचा खडा पडणार असेल तर वैयक्तिक भूमिकेचाही समाचार घ्यावा लागतो याची जाणत्या नेत्यांना जाणीव आहे.

म्हणूनच प्रत्येक शब्द तोलून मापून बोलणाऱ्या पवारांनी म्हटला तर साधा पण राजकारणात पचायला अवघड असा अपरिपक्व शब्द आपल्या नातवासाठी वापरला. पवारांनी पार्थ यांना अपरिपक्व म्हटले खरे ,पण लोकसभा निवडणुकीचे तिकीट देताना न जाणवलेली तसंच भाषणात अडखळतानाही न दिसलेली अपरिपक्वता आताच्या दोन राजकीय भूमिकांनी दिसू लागल्याने प्रश्न उपस्थित होतो तो हा की, पार्थ यांच्या या भूमिका ही "परिपक्व खेळी "असल्याचे ध्यानात आल्यानेच त्यांना अपरिपक्व ठरवण्याची ही घाई पवारांनी केली नाही ना? कारण अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर अस्थिरतेचे सावट म्हणावे तसे दूर झालेले नाही. त्यांची तेच पद देऊन सन्मानाने घरवापसी झाली असली तरी शंकेची पाल चुकचुकतेच आहे..शिवाय पार्थ यांचा लोकसभा निवडणुकीतला पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागलाय..त्यामुळे अजित पवारांचे पुत्र असलेल्या पार्थ यांची भाजपला सुखावह वाटावी अशी भूमिका अपरिपक्व नसून ही खेळी तर नसावी? असाही एक सूर आहे..

शिवाय दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यातील नवी पिढी राजकारणात सेट होऊ लागलीये. पवार घराण्यातलेच रोहित पवार आमदार म्हणून चर्चेत आहेत, त्यांच्या नावाने युवा ब्रिगेडही सुरू झालीये. शिवसेनेतही "आदित्य" पर्वाला सुरूवात झालीये. पहिल्यांदाच आमदार होत आदित्य ठाकरे महत्त्वाच्या खात्याते मंत्रीही झाले, शिवाय आदिती तटकरे, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील अशा शिलेदारांची नावे समोर येतात पण अपवाद आहे तो फक्त पार्थ पवारांचा.

इतका भक्कम वारसा असूनही त्यांच्या राजकीय स्वारीला गती मिळत  नाहीये. सध्यातरी अजित पवारांचे सुपुत्र अशीच त्यांची ओळख आहे. म्हणूनच आपल्या भात्यात "बाण"घेत, रथावर आरुढ होत पार्थ हे मैदान मारायला निघालेत का? हाही प्रश्न आहेच. तर तिकडे पार्थ यांना "लंबी रेसका घोडा" म्हणत आपला धावता रथ न थांबवण्याचा सल्ला भाजपा नेते देत आहेत. त्यामुळेच सरकारचे स्टिअरिंग कोणाकडे असे प्रश्न उपस्थित होत असताना राष्ट्रवादीचे स्टिअरिंग मात्र माझ्याच हाती आहे हे पवारांना हा पार्थ रथ अधिक पुढे जाण्याआधी सांगावे लागले.

असे असले तरी गांडीव उचलत दुसऱ्या दिशेने रथ घेऊन निघालेला पार्थ आपल्या रथाचे सारथ्य स्वतःच करतोय की त्याचा कोणी सारथी आहे ? हा प्रश्न उपस्थित होणार आहेच. कारण त्या रथाला रोक लावण्याचं काम खुद्द भीष्माचार्यांना करावं लागलंय. आता पार्थ आपला उचललेला गांडीव खाली ठेवणार की "बाण" सोडत राहणार हे पहावे लागेलच. पण पार्थाचा सारथी श्रीकृष्ण कोण ? याचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण युद्ध आतातर कुठे सुरू झाले आहे.

टीप- लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत, एबीपी माझा त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.