ती माझ्या जन्माच्या काही वर्ष अगोदरच हे जग सोडून गेली, त्यामुळे तिला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रश्नच नव्हता आणि तिचे सगळेच चित्रपट मी पाहिले असंही नाही. फार मोजकेच पाहिलेत. पण तरी ती माझी आवडती अभिनेत्री आहे. तीची पिढी वेगळी आणि माझी वेगळी. माझे आईवडिल ,शिक्षक आमच्या काळातली हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून तिचा उल्लेख करतात आणि आज ती असायला हवी होती असं आवर्जुन म्हणतात. माझ्या आईवडिलांच्या काळातल्या अभिनेत्रीला मी चक्क "त्या" ऐवजी "ती" म्हणतोय. याचा मलाही प्रश्न पडलाय. माझी लायकी आहे का?अ सं मी मलाच विचारतो. पण का कुणास ठाऊक? तिच्याबद्दल इतका आपलेपणा वाटतो. तिला प्रत्यक्षात पाहता आलं नाही म्हणून काय झालं. तिच्या अभिनयातून ती आपल्याशी बोलतेय असंच वाटतं. इतके कसे कुणाचे डोळे बोलके असू शकतात? हा प्रश्न पडतो. पडद्यावरचा तिचा जिवंत अभिनय भारावून टाकतो आणि मग तो काळ, पिढी यांना काही अर्थ उरत नाही. ती माझी बनते ,माझ्या पिढीची आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांचीसुद्धा. ती म्हणजे फक्त तीच. एकमेव. स्मिता पाटील.



व्यक्तिरेखा जिवंत करणारी स्मिता पाटील. गोऱ्या रंगावर भाळणाऱ्या लोकांना सावळ्या रंगाच्या प्रेमात पाडणारी स्मिता पाटील. डोळ्यांनीच खूप काही सांगणारी, बिनधास्त ,स्वच्छंदी, स्मिता पाटील. संवेदनशील अभिनेत्री, सामाजिक भान असणारी आणि सध्याचं बॉलिवूड कुठच्या कुठे गेलं असताना तिचं स्थान अढळ ठेवणारी स्मिता पाटील. कलाकार कुठल्याही पिढीचा नसतो, तो काळाच्या पुढे असतो हे सिद्ध करणारी अन अवघ्या 31 व्या वर्षी मृत्युलाही तिच्या प्रेमात पाडणारी स्मिता पाटील.

स्मिता आज 65 वर्षांची असली असती. आज ती असती तर खूप मोठी अभिनेत्री असली असती असं म्हणणाऱ्यांच्या मी विरोधात आहे. कारण स्मिता सदैव मोठीच आहे. पण ती असती तर तिला नवनवीन व्यक्तिरेखात पाहता आलं असतं. ती असती तर आता अमुक अमुक अभिनेत्रीने केलेली अमुक अमुक भुमिका स्मिताने केली असती. ती आज असती तर तिने अनेक मराठी चित्रपटही केले असते. ती असती तर प्रतिकला आईचं प्रेम मिळालं असतं. ती असती तर तिनं प्रतिकला अभिनयाचे धडेही दिले असते. ती असती तर सामाजिक कार्यातही उतरली असती आणि मोठं कामही तिनं उभं केलं असतं. ती असती तर हे झालं असतं. ती असती तर ते झालं असतं. ती असती तर असं, ती असती तर तसं. आता या सर्व शक्यता वर्तवण्याशिवाय आपण काय करू शकतो..पण स्मिता आज असायला हवी होती,हे राहून राहून वाटतं..

प्रतिष्ठित राजकारणी घरात जन्मलेली स्मिता. दूरदर्शनची वृत्तनिवेदिका असलेली स्मिता. आणि अवघ्या दशकभराच्या कारकिर्दीत जवळपास 80चित्रपटातून काम करणारी स्मिता. हे तिचं आयुष्य आहे. आयुष्याचा अल्प पण प्रचंड अनुभव गाठीशी असलेला प्रवास आहे..खरंतर तिने किती चित्रपट केले,तिची सर्वश्रेष्ठ भूमिका कोणती. यापेक्षा तिनं जे केलं ते अत्यंत प्रामाणिकपणानं केलं. जीव ओतून केलं, हे सांगणं महत्वाचं आहे. जगण्यात सच्चेपणा असला की अभिनयातही सच्चेपणा येतो याचं उदाहरण स्मिता आहे.


आपली प्रतिस्पर्धी शबाना आझमीलाही प्रेमात पाडणारी स्मिता या देशानं पाहिली. स्पर्धा वगैरे यात न पडता त्यापलिकडे नातं जपणारी स्मिता होती.. समांतर चित्रपटांवर कमी वेळातच तिनं अधिराज्य गाजवलं असंच म्हणावं लागेल. समांतर चित्रपटांसोबतच व्यावसायिक चित्रपटांमध्येही तिनं आपली छाप सोडली. तिच्यातली तळमळ नेहमी तिच्या व्यक्तिरेखेत जाणवायची. ती प्रशिक्षित अभिनेत्री नव्हती. पण तिचा वावर सहज होता,प्रामाणिक होता. श्याम बेनेगल म्हणतात तसं, की एकदा का ती कॅमेऱ्यासमोर उभी राहिली की तिचं संपूर्ण लक्ष भूमिकेवर केंद्रीत व्हायचं आणि चित्रीकरण संपलं की त्या भूमिकेतून बाहेर पडून ती नेहमीची स्मिता बनायची. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये गुंतूनही भूमिकेपासून ती विचलीत झाली नाही. तिने केलेल्या भूमिकांमध्ये वैविध्य होतं. आपल्या वयापेक्षा मोठ्या भूमिकाही तिनं साकारल्या आणि आपल्या सहजप्रवृत्तीने यशस्वीरित्या पेलल्या.


"निशांत"मध्ये तर तिचा फार मोठा रोल नव्हता पण त्या छोट्याशा रोलमधूनही तिनं आपला प्रभाव पाडला आणि मग तिनं मागे वळून पाहिलंच नाही. ज्या भूमिका तिनं केल्या त्या  जणू तिच्याच होत्या असं वाटतं."चक्र"मध्ये विधवा स्त्रीची भूमिका कुशलतेने केली तर "जैत रे जैत"मध्ये आदिवासी मुलगी "चिंधी"जणू ती जगलीच. शिवाय कणखर, बुद्धिवादी स्त्री तिनं "उंबरठा"मधून साकारली..अजून सांगायचं तर "मंथन" आहे,"देबशिशु","भूमिका","तरंग","आखिर क्यूँ","बझार" अशी किती नावं घ्यायची. तिच्या भूमिकांमधलं हे वैविध्य तिच्या ताकदीची साक्ष देतं.


विशेष म्हणजे भारतासारख्या विविधता असलेल्या देशात ती कुठल्याही भागातली भूमिका करताना तिथलीच वाटली. याबद्दल मृणाल सेन यांनीही म्हटलंय,की भारतासारख्या देशात लोक विविध भाषा बोलतात ,वेगवेगळे पोषाख परिधान करतात शिवाय वेगवेगळ्या शारिरिक वैशिष्ट्यांमुळे ते ओळखूही येतात पण स्मिता कुठेही गेली तरी ती मूळची तिथलीच असल्यासारखी वाटते.या तिच्यातल्या वैशिष्ट्यामुळे तिच्या भूमिका श्रेष्ठ ठरल्या. अनेक चित्रपटातून ती बोल्ड दिसली पण यावर कोण काय विचार करतं याची पर्वा तिनं केली नाही.तसंच लग्न झालेल्या ,दोन मुलांचा बाप असलेल्या राज बब्बरच्या प्रेमात पडणारी स्मिताही अनेकांना वेगळी भासली पण तिनं तिला जे वाटतं ते प्रामाणिकपणे केलं.तिचा प्रत्येक निर्णय हा सर्वस्वी तिचा होता.हे सर्व जाणल्यानंतर तिच्यातल्या खरेपणाची ओळख होते.


दुर्दैवं असं की सईबाईंची भूमिका साकारत असताना इतक्या लहान वयात सईबाई शंभुराजांना सोडून गेल्या म्हणून रडणारी स्मिता प्रतिकला मात्र दहा दिवसांचाही झाला नसताना सोडून गेली..परमेश्वराने पाठवलेली ही फुलांची परडी .आमच्या जीवनात सुगंध पसरवून त्याने फार लवकर परत नेली असंच म्हणावं लागेल .पण त्या फुलांचा सुगंध दरवळतोय अजुन इथे..फक्त फुलांची परडी तेवढी नाही.


राज बब्बरशी लग्न करण्याचा तिचा निर्णय चुकीचा होता असं अनेकजण म्हणतात.तिला विरोधही झाला..अनेकांनी नादिरा बब्बरच्या बाजुनी उभे राहत स्मिताला दोषी ठरवलं..पण तिनं प्रेम केलं होतं..तेही अगदी मनापासुन .त्यामुळे तिनं जगाचा विचार न करता "उंबरठा" ओलांडला.


ती तिच्या मनाप्रमाणे जगली..एकदा मैत्री केली की ती मनापासून निभावायची हे स्मिताचं वैशिष्ट्य होतं. सामाजिक प्रश्नांशी भिडण्याचीही तिची तयारी होती. स्मितासारखी माणसं बघितल्यावर आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे अधिक महत्वाचं आहे हे कळून येतं. म्हणून माझीच नाही तर पुढच्या अनेक पिढ्या "भूमिका"जगणाऱ्या,बोलक्या डोळ्यांच्या या सावळ्या अभिनेत्रीचं स्मरण करत राहणार आहेत आणि तिला "स्मिता 'अशी प्रेमळ हाक ही देणार आहेत. ती परत येणार नाही. आणि पुन्हा "स्मिता' होणार नाही हे मनाने स्वीकारलं असलं तरी आज स्मिता हवी होती आणि कित्येक वर्षानंतरही "आज स्मिता हवी होती"अशीच भावना असेल कारण काही कलाकार असे असतात जे आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात एक मैफील भरवतात आणि आपलंसं करतात. पण ते जर निघून गेले तर ती मैफील सुनी होते आणि मग त्या सुन्या मैफिलीत त्यांची गीतं गाण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. ती गीतंच ते असण्याचा आणि चांदरातीचा भास निर्माण करतात.

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे,
अजुनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे...