छत्रपती संभाजी महाराजांवरील सीरियल चार वर्षापूर्वी चांगलीच गाजली. त्यापूर्वी देखील येसुबाई यांचं माहेर कोकणात हे वाचून आणि ऐकून होतो. पण, जाण्याचा योग आला नव्हता. पण, मुंबईतून एबीपी माझासाठी कोकणसाठी निवड झाली. त्यावेळी येताना यावर स्टोरी करता येईल हा बेत मनात पक्का होता. संभाजी महाराजांची सीरियल संपायला देखील आली होती. हेच निमित्त साधून स्टोरी केली. वरिष्ठांनी पाठिंबा दिला. सर्वांना स्टोरी आवडली. काही फोन देखील आले. तर त्यावरून समाजमाध्यमांवर झालेली चर्चा देखील वाचत आणि ऐकत होतो. काहींना आभार प्रदर्शन करणारे फोन केले. समाधान होतं. पण, यापुढे काय? हा प्रश्न डोक्यात होता. कारण, संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे मी गेलो. त्या ठिकाणी असलेला प्रचितगड चढलो आणि एका दिवसांत उतरलो. ज्यावेळी ही संकल्पना डोक्यात होती, त्यावेळी रत्नागिरीमधील गोगटे जोगळेकर या कॉलेजमधील इतिहासाचा विद्यार्थी असलेल्या प्रसन्न खानविलकर, ज्येष्ठ पत्रकार जे. डी . पराडकर आणि सत्यवान विचारे यांची चांगलीच मदत झाली. कारण, प्रसन्नची भेट तशी योगायोगानं झाली. इतिहास माझ्या आवडीचा विषय. त्यामुळे गप्पांच्या ओघात आमची गट्टी चांगली जमली. शिवाय, जे. डी. पराडकर सरांचे लेख वाचत होतो. वेगळ्यावेगळ्या विषयांवर बोलणं देखील सुरू होतं. तर, विचारेंशी एक-दोन वेळा सहज भेट झाली होती. प्रचितगड आणि शृंगारपूरवर स्टोरी करायची म्हटल्यानंतर या तिघांची मदत झाली. स्टोरी लाईन ठरली आणि शूट झाल्यानंतर त्याच ताकदीनं ती टीव्हीला लागली देखील. आनंद होता. कारण, नवखा होतो. पण, स्टोरीची चर्चा चांगलीच झाली. यानंतर चार वर्षानंतर देखील हा विषय जिवंत राहिल याची कल्पना केली नव्हती. साधारण आठ-दहा दिवसांपूर्वी सातारहून आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांचा फोन आला. अमोल तुम्ही शृंगारपूरवर चार वर्षांपूर्वी स्टोरी केली होती. त्याची लिंक द्या. त्यात महत्वाची घडामोड आहे. तुम्हाला फोन येईल. शिवाय, जे करता येईल ते करा. दोन दिवस गेल्यानंतर मला एक फोन आला. सुहास राजेशिर्के बोलतोय, सातारहून. राहुल तपासेंनी नंबर दिला. आम्ही येसुबाईांच्या घराण्यातून आहोत. पण, वंशज म्हणणार नाही. आम्ही शृंगारपूर इथं त्यांचं स्फूर्तीस्थळ व्हावं यासाठी उपोषण करणार आहोत. तुमची मदत लागेल. तुम्ही केलेल्या बातम्या आम्ही पाहिल्या. असं साधारण बोलणे झाल्यानंतर मी त्यांना यापुढे देखील मदत करत राहील, असं आश्वासन दिलं. त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याची बातमी झाली. रत्नागिरीतील पत्रकारांनी देखील चांगला पाठिंबा दिला. राजेशिर्के आणि शृंगारपूरचे सरपंच यांनी देखील सर्वांचे आभार मानले. प्रशासनानं त्यांना पत्र दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी देखील महिनाभराचा अल्टीमेटम देऊन विषयाला स्वल्पविराम दिला. हे सांगण्याचा प्रपंच यासाठी की हा सारा विषय इथं संपत नाही. तर, इथून तो खऱ्या अर्थानं सुरू होतो. 


शृंगारपूर! सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव. प्रचितगडाच्या पायथ्याशी असलेलं गाव तसं निसर्गसंपन्न. पण, दुर्लक्षित. इथं गेल्यानंतर गावात ऐरवी शांतता. प्रचितगडावर जाण्यासाठीचा रस्ता याच गावातून जातो. खळाळत वाहणारी नदी, हिरवी गार शेतं, टुमदार कौलारू घरं आणि उंचच उंच डोगररांगा यामुळे निसर्गानं केलेली उधळण दिसून येते. गावात शिरताच दिसणारी वर्दळ मात्र कमी जाणवते. पोटापाण्यासाठी इथून देखील लोकांनी शहराची वाट धरलीय. त्यामुळे मोजकीच लोकं इथं राहतात. एक उंच वाढलेलं झाड. आणि त्या ठिकाणी दिसणारा पायाच्या चौथऱ्याचे दगड पाहिल्यानंतर कधी काळी इथं वाडा अर्थात जुनं घर होतं याचा अंदाज येतो. दळण दळण्यासाठी असलेल्या जात्याचे भाग विखुरलेले दिसून येतात. हाच काय तो येसुबाई यांच्या घराचा अर्थात राजेशिर्के यांच्या वाड्याचा काही भाग इथं दिसून येतो. सध्या ही जागा देखील राजेशिर्के यांच्या नावे नाही. सदरची जागा गावातील जाधव यांच्या नावावर असल्याचं गावातील नागरिक सांगतात. पण, सध्या या गोष्टी दुर्लक्षित आहेत. गावासह प्रशासन, शासन यांपैकी कुणाचं देखील याकडे लक्ष नाही. त्यामुळे येसुबाईंचं माहेर हेच का? हा देखील प्रश्न पडावा अशी स्थिती. गावातून प्रचितगडावर जाण्याची वाट जाते. कस लागतो गड चढताना. स्थानिक वाटाड्यांच्या मदतीनं गडावर पोहोचता येते. पण, चढाई अवघड. काळजी घेणे देखील तितकंच गरजेचं. मी ज्यावेळी गडावर गेलो तेव्हा आमच्या साथीदारांची स्थिती पाहता काही विपरित तर घडणार नाही ना? याची भीती मनात होती. पण, सुदैवानं गडावरून सर्व सुखरूप खाली उतरलो. गडावरून दिसणारा नजारा देखील मनाला मोहून टाकणारा. पलिकडे सातारा जिल्ह्यातील पाटणचा भाग लागतो. 


सभोवतालच्या जंगलात देखील विपुल निसर्गसंपन्नता आहे. त्यामुळे या भागावा वेगळं महत्त्व नक्कीच आहे. काहींनी तर या आसपासच्या परिसरात पट्टेरी वाघाचं असलेलं अस्तित्व सांगितलं. त्यामुळे हा भाग किती निसर्ग संपन्न असेल याची किमान कल्पना येऊ शकेल. अर्थात ट्रेकिंगला येणारी मजा देखील वेगळीच असणार आहे. त्यासाठी शृंगारपूरचा विकास किंवा तिथं येसुबाई यांचं स्मृतीस्थळ उभं राहिल्यास त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. शिवाय इतिहासातील एका पराक्रमाला पुन्हा उजाळा मिळणार आहे. काळाच्या ओघात गायब झालेली पानं पुन्हा उजळली जाणार आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन स्थळात एका ऐतिहासिक ठिकाणाची वाढ होणार आहे. आसपासच्या गावांना देखील त्याचा फायदा होणार आहे. याच शृंगारपूरपासून जवळपास 17 ते 18 किलोमीटर अंतरावर कसबा आहे. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले गेले होते. त्या ठिकाणी येणारे लाखो पर्यटक, शिवभक्त यांना आणखीन एक ऐतिहासिक ठिकाण खुलं होणार आहे. अर्थात त्या ठिकाणी काही फार मोठं बांधकाम किंवा स्मृतीस्थळ उभं राहवं अशी अपेक्षा कुणाचीही मुळीच नाही. पण, येसुबाईंच्या व्यक्तिमत्वाला साजेशा गोष्टी झाल्या पाहिजेत ही मात्र माफक अपेक्षा आहे. अर्थात हे सारं उभं राहिल्यास त्याचा फायदा परिसराला होणार आहे. शिवाय, येसूबाईंच्या माहेरी त्याची आठवण देखील स्फूर्तीस्थळाच्या रूपानं दिसणार आहे. 


तसं म्हटलं तर कोकणवासियांचं हे भाग्य म्हणावं लागेल. पण, याकडे झालेलं दुर्लक्ष देखील अक्षम्य म्हणावं लागेल. पण, त्यांच्या स्फूर्तीस्थळासाठी झालेल्या उपोषणाच्या निमित्तानं हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता शासन किंवा प्रशासन, राज्यकर्ते, नेते यांच्यासह सर्वसामान्य माणसांनी देखील यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण, इतिहासाला पुन्हा एकदा झळाळी आल्यानंतर जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांत देखील वाढ होणार आहे.