राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. महत्त्वाची बाब म्हणजे अचानक शरद पवार यांनी टाकलेल्या राजीनामा बॉम्बमुळे गावखेड्यापासून देशाभरातील माध्यमांमध्ये शरद पवार यांच्याच राजीनाम्याची बातमी मागचे पाच दिवस सुरु असल्याचं दिसून आलं. नेमका शरद पवार यांनी राजीनाम्याचं टायमिंग आत्ताचंच का निवडलं असेल याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट


शरद पवारांनी आत्ताच राजीनामा का दिला?


अजित पवार एप्रिल महिन्यात नॉट रिचेबल झाले आणि त्यानंतर प्रामुख्याने राज्यात चर्चा रंगू लागली ती अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत 2019च्या पहाटेच्या शपथविधी वेळी नसणारी शरद पवारांच्या जवळची  जेष्ठ नेत्यांची टीम असल्याची जोरदार चर्चा होती. जर हे नेते भाजपमध्ये गेले तर पक्षाचं पुढील भविष्य काय?... हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळेच शरद पवारांनी लोक माझ्या सांगाती या पुस्तकाच्या विस्तारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक माझ्याच सांगाती असल्याचं स्वकीयांना, मित्र पक्षांना तसेच सत्ताधारी पक्षांना देखील दाखवून दिल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या पदावरुन पायउतार होण्याबाबत केलेली घोषणा आणि त्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यापर्यंत सर्वांच्याच डोळ्यात आलेलं पाणी कुणीही रोखू शकलं नाही.


प्रत्येक घटकाला बोलतं करुन शरद पवार काय सुचवू पाहत होते?


ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली त्यानंतर उपस्थित असलेल्या प्रत्येक घटकाने शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत अशी मागणी केली. यामध्ये राष्ट्रवादीमध्ये असलेल्या प्रत्येक सेलच्या पदाधिकाऱ्याला शरद  पवार  यांनी बोलण्याची संधी दिली गेली, बरं हे सर्व टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातल्या लोकांपर्यंत पोहोचतं होतं, विशेष म्हणजे राजीनाम्याच्या घोषणेनंतर जे घडलं ते सर्व शरद पवारांच्या फेसबुक पेजवरुन सुरु होतं. अल्पसंख्यांक सेलचे नसीम सिद्धकी म्हणाले की देशात एका समाजाला सातत्याने लक्ष केलं जातं आहे. तसेच विरोधकांची मूठ भाजपला सत्तेतून उलथवून टाकण्यासाठी आवश्यक आहे आणि हे काम केवळ तुम्हीच करु शकता. शरद पवार यांच्या समोर बोलणाऱ्यांमध्ये मराठा, दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक, युवावर्ग, महिला पदाधिकारी, गावखेड्यातील सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय स्तरावरील नेते यांचा समावेश होता. याचाच अर्थ असं की या सर्व समाजाचं सध्याच्या घडीला नेतृत्व करण्याची क्षमता केवळ शरद पवार यांच्यातच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 साली स्थापना झाल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने अध्यक्षपदावर बसलेले शरद पवार आता महाराष्ट्रातील किंबहूना देशातील जनतेच्या आग्रहाखातर अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतोय असं सुचवत असल्याचं पाहायला मिळालं.  यामुळे आपोआपच पक्षातील फुटून जाण्याच्या तयारीत असलेल्या गटाला संदेश देण्यात आला आहे की काही आमदार जरी तुमच्या सोबत असले तरी लोकं मात्र अजूनही माझ्याच बरोबर आहेत. त्यामुळे आमदार गेले तरी बेहत्तर पुन्हा नव्याने मैदानात उतरुन तरुण कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची क्षमता केवळ माझ्यातच आहे.


भाषणासाठी वाय. बी. चव्हाण सेंटर का निवडले असेल?


अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर जनतेला पुन्हा एकदा विश्वास निर्माण करुन देणं गरजेचं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगलकलश महाराष्ट्रात आणला. या तारखेपासून शरद पवारांच्या सुरु झालेल्या राजकीय कारकीर्दीचा शेवट देखील यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथेच करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन कोणी कुठंही गेलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण यांच्याच विचाराने पुढे जाणार असून उजव्या विचारसरणीला याठिकाणी जागा नसल्याचं दाखवून देण्यात आलंय.


शरद पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द अन् कमिटीपुढील पर्याय संपला


2 मे ला शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर युवक कार्यकर्ते ठिय्या मांडून वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेरच बसले होते.  अचानक आलेल्या परिस्थितीमुळे अशी कार्यकर्त्यांनी भूमिका घेणं स्वाभाविक होतं. पहिल्या दिवशीतर शरद पवारांचा फोन आल्यानंतर युवक कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलं. 3 मे आणि 4 मे रोजी वाय.बी. चव्हाण सेंटरला आंदोलन सुरु होतं.  वाय.बी .चव्हाण सेंटर बाहेर सुरुच ठेवण्यात आलं होतं. महत्वाची बाब या कालावधीत आंदोलन करणारे कार्यकर्त्यांपैकी काही जण शरद पवारांना भेट होते. शरद पवार कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी सांगू देखील शकत होते. परंतु, त्यांनी असं का केलं नाही, असा प्रश्न उरतोच. अखेर 4 मे रोजी पवारांनी स्वतः येऊन कार्यकर्त्यांच्या मनासारख होईल, तुमच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही असं सांगून कुठंतरी आपणच अध्यक्ष होणार असल्याची पूर्वकल्पना दिली.


 कमिटीमध्ये शरद पवारांचा राजीनामा मंजूर होऊन सुरुवातीला अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्यानंतर सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर होतं, दरम्यान प्रफुल पटेल यांनी अध्यक्ष व्हायचं नसल्याचं सांगून टाकलं. पुन्हा पवारांकडे अध्यक्षपद ठेवून कार्याध्यक्ष नेमला जाणार अशाही जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे सुप्रिया सुळेचं नाव आघाडीवर दिसत होतं. सुप्रिया सुळे तीन दिवस माध्यमांसमोर आल्या पण माध्यमांशी बोलल्या नाहीत. त्यांचं मौन देखील राजकीय अस्वस्थता वाढवत होतं.  दुसरीकडे वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा रेटा शरद पवार यांनीच अध्यक्ष व्हावा यासाठी वाढत चालला होता. हीच संधी साधत ४ मे रोजी दुपारनंतर शरद पवारांनी वाय. बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कमिटी सांगेल तो निर्णय मला मान्य असेल पण तुमच्या मनासारखा निर्णय होईल आंदोलन करावं लागणार नाही, असं म्हणत बॉल थेट कमिटीच्या कोर्टात टाकला. त्यामुळे आपोआपच शरद पवारांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.


देशातील बड्या नेत्यांचे पवारांना फोन... विरोधी पक्षाचा आवाज म्हणजेच शरद पवार?


शरद पवार यांनी गेल्या महिन्यात देशातील विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची एक बैठक घेतली होती. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना पवारांचा पक्षातून राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांसाठी धक्कादायक होता तसाच तो राष्ट्रीय राजकारणातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी देखील धक्कादयक होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते स्टॅलिन, काँग्रेस नेते राहुल गांधी, बिहाचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, डाव्या पक्षांचे नेते सिताराम येचुरी, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याचं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या राजकीय परिस्थिती त्यांनी राजीनामा मागं घ्यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासर्वातून शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व तपासून पाहता आलं.


लोकसभा निवडणुकांना अजूनही सव्वा वर्ष बाकी असलं तरी विरोधी पक्षांची एकजूट अजूनही पाहायला मिळत नाही. सध्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी करणे आणि काँग्रेस शिवाय आघाडी करणे अशा विचाराचे दोन गट कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजूनही पंतप्रधान पदासाठीचा चेहरा विरोधी पक्षांकडून ठरवण्यात आलेला नाही. मात्र, दुसरीकडे भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुका लढण्याची जोरदार तयारी सुरु आहे. देशभरातून पुन्हा एकदा ना भूतो ना भविष्यती अशा विक्रमी मतांनी मोदींना निवडून आणण्यासाठी सत्ताधारी गट कंबर कसून कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी काँग्रेस विरोधी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सर्वांना एकत्र आणणत विरोधी पक्षाची एकजूट केवळ शरद पवार हेच करु शकतात. इतकचं नाही तर त्यांनी लोक माझ्या सांगाती या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनावेळी केलेल्या भाषणातून आपणास पंतप्रधान कार्यालयाची देखील माहिती असल्याची एक चुणूक दाखवून दिल्याचं पाहायला मिळालं आहे. आपल्या विद्यार्थी दशेपासूनच आपण पंतप्रधान कार्यालयाचं कामकाज कसं चालतं हे पाहत आलो आहे. किंबहूना 2 मेच्या भाषणात त्यांनी अमेरिका, डेन्मार्क, जपान, कॅनडा या देशांच्या पंतप्रधान कार्यालयातील काम युवक काँग्रेसमध्ये असताना पाहिल्याचं सांगितलं. शिवाय 63 वर्षांचा राजकीय कामकाजाचा अनुभव आहे त्यामुळे आगामी काळात परिस्थितीनुसार पंतप्रधान पदाबाबत विरोधीपक्षाचा चेहरा म्हणून अनेकांच्या नावाचे विचार सुरु होतील त्याचवेळी आपण देखील एक पर्याय असू शकू असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे.


कार्यकर्त्यांचा विजय की पवारांची वेगळी खेळी


1999 साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून अध्यक्षाची निवड पक्षांतर्गत निवडणुकीत होत होती. किंबहुना शरद पवार अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आज अखेर त्यांनीच पक्षाची धुरा सांभाळली. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतील हाच सर्वांना विश्वास होता मात्र कार्यकर्त्यांच्या सततच्या आंदोलनामुळे अखेर पवारांना आपली भूमिका मवाळ करावी लागली. यातून कार्यकर्त्यांसोबतचा आपला कनेक्ट दाखवून दिला तसेच मी सुभेदारांचा अध्यक्ष नसून मी पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा अध्यक्ष असल्याचं अधोरेखीत केलं


महाविकास आघाडी आणि सहानुभूती फॅक्टर रिअॅलिटी चेक


महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. आमदार खासदार सोडून गेले आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह नाव त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात राज्यभरात भावनिक लाट निर्माण झाली होती. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे सर्वात शेवटी भाषण करत होते. काही नेत्यांचा आणि राजकीय जाणकारांचा अंदाज ठाकरेंप्रती असलेल्या भावनिक लाटेचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल, असा होता. पण, शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर जे घडलं त्यातून पवारांनी आपण देखील महाराष्ट्राच्या राजकारणात भावनिक लाट निर्माण करु शकतो, असं दाखवून दिलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना देखील पवारांनी या प्रसंगातून चेक दिल्याचं दिसून येतं.


दादा"गिरी" कायम पण त्यादिवशीच्या भूमिकेनं कार्यकर्त्यांची नाराजी


अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन घेतलेली भूमिका लक्षात घेता राष्ट्रवादीच्या 52 आमदारांपैकी केवळ 15 आमदार सोडले तर बाकी आमदारांनी स्वतःला राजीनामानाट्यापासून दूर ठेवल्याचं पाहायला मिळालं. याबाबत बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर एका आमदाराने माहिती दिली की, मला इतर आमदारांचं माहिती नाही परंतु अजित दादांनी राजीनामा योग्यच आहे ही भूमिका घेतल्यामुळे आमच्या समोरचं चित्र स्पष्ट झालं होतं. शिवाय पक्ष नेतृत्वाच्या अंतर्गत राजकारणात आपला बळी जायला नको यासाठी या पक्षनेतृत्वाच्या राजकारणातून लांब राहणं आम्ही पसंद केलं, असं त्यांनी सांगितलं.


एरवी लातूर भूकंप असेल किंवा 1993 च्या बॉम्बस्फोटामध्ये शरद पवारांनी दाखवलेली समयसुचकता याचं उदारण देताना कायमचं पक्षातील वरिष्ठ नेते आमदार पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळी पक्षावर वेळ आली होती त्यावेळी मात्र सर्वच जण गळून गेल्याचं पाहिला मिळालं. राहिला प्रश्न अजित पवार यांचा तर त्यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशीची कृती ही सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांना देखील खटकणारी होती ही चर्चा आहे. एरवी अजित पवार यांचं सभा-पत्रकार परिषदांमध्ये दादा स्टाईल वागणं तितकंस कुणीच मनावर घेत नाही.शऱद पवारांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांसह सर्वच पदाधिकाऱ्यांना आपण आधारवड असल्याची जाणीव करुन देणं हे अजित दादांकडून अपेक्षित होतं. मात्र, तसं होताना पाहिला मिळालं नाही. कार्यकर्त्यांना ओरडणे तसेच बोलू न देणे हे उपस्थितांना आवडलं नाही. शरद पवार यांना देखील अजित पवारांचं कार्यकर्त्यांना त्याक्षणी ओरडणं आवडलं नसल्याचं स्पष्ट जाणवत होतं. किंबहुना शरद पवार यांनी खासगीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलताना अजित पवार यांचं असं वागणं योग्य नव्हतं, असं बोलल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.


एकंदरीतच काय तर शरद पवार यांनी स्वताच्या पदावर फिरवलेली भाकरी जरी थांबवली असली तरी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की आहे की आगामी काळात पक्षात फेरबदल झालेले पाहिला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आजच्या घडीला जर पक्षाध्यक्ष बदलला गेला असता तर त्याच तोडीची व्यक्ती सध्या तरी पक्षात पाहायला मिळत नाही. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर पी.सी. चाको यांनी आपण शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसला रामराम करत पक्षात आल्याचं स्पष्ट केलं ते जर अध्यक्ष राहणार नसतील तर आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू असा थेट इशारा त्यांच्यावतीने देण्यात आला होता.  


भाकरी फिरवण्याला ब्रेक की भाकरी फिरवण्याचं मायक्रो प्लॅनिंग


राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील चेंबूर येथील कार्यक्रमात शरद पवारांनी युवकांना संधी देण्यासाठी भाकरी फिरवण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी स्वत: पदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर करत भाकरी स्वत:पासून फिरवण्यास सुरुवात केल्याचं दाखवून दिलं. 5 मे रोजी वाय.बी. सेंटरला पुन्हा पत्रकार परिषद घेत पवारांनी राजीनामा मागं घेतल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी भाकरी फिरवायची होती पण भाकरी थांबली असं म्हटलं पण त्याचवेळी दुसरीकडे पक्षात गेल्या 15-20 वर्षांपासून तालुका जिल्हा पातळीवर काम केलेल्या युवा नेतृत्त्वाला राज्यपातळीवर संधी देणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळं तालुका जिल्हा पातळीवरील टीम राज्य पातळीवर चांगलं काम करु शकते असं म्हटलं. यापुढे जाऊन आमची राज्य पातळीवरील टीम देशपातळीवर चांगलं काम करु शकेल, असं त्यांनी म्हटलं. पवारांच्या या वक्तव्यानंतर खरचं भाकरी फिरवण्याला ब्रेक लागलाय की भाकरी फिरवण्याचं मायक्रो प्लॅनिंग आहे असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. काय खरं काय खोटं हे येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल.


(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)