ठिगळाची खाकी चड्डी, विविध रंगांच्या बटणांचा पांढरा शर्ट आणि टोकं चुरगळलेली जवळपास गोल झालेली टोपी सांभाळत शाळेतून घरी येताना पोरं म्हणाली “आज पाटलाच्या वाड्यासमोर व्हिडीववर चांदणी पिच्चर हाय”


‘आविष्यातला पयला पिच्चर’ बघणार होतो. घराच्या दारातनंच महाबीज बियाण्याच्या पिशवीचं बनवलेलं दफ्तर फेकून पाटलाच्या वाड्यासमोर गेलो. तिथं कुणीच नव्हतं. गोळीपेंडीचं घमेलं घेऊन परड्यात गेलो. गायी-बैलांना पेंड घातली. परत घरी येताना मुद्दाम पाटल्याच्या वाड्याम्होरनं चक्कर मारली. एक लोखंडी बॅरल ठेवला होता. त्यावर पोतं श्रीदेवीच्या स्वागताला..!

कोण श्रीदेवी माहित नव्हतं, पोरं म्हणत होती म्हणून कळलं होतं श्रीदेवी नावाच्या हिरॉईनचा पिच्चर.

ज्वारीची भाकरी-काळ्या घेवड्याचं कालवण खाऊन चड्डीला हात पुसत पाटलाच्या वाड्यासमोर पयल्या रांगेत फतकाल मांडलं.

व्हिडीववाल्याचं कायतरी चाललं होतं. लाल-पांढऱ्या-पिवळ्या-काळ्या आणि कसल्याकसल्या रंगाच्या पट्ट्या होत्या टीव्हीवर. बाप्ये जमू लागले, पोरं तर आधीच येऊन बसली होती. घरातली भांड्याकुंड्यांची काम उरकून बाया जमू लागल्या.

पिच्चर सुरु झाला... मध्यरात्री कधीतरी झोप लागली तिथंच. चांदणीSSS ओ मेरी चांदणीSSS अर्धमेल्या झोपेत गाणं डोक्यात घोळत होतं. झोप लागण्याआधी पाहिलेली श्रीदेवी मनात होतीच...

तेव्हाच ठरलेलं, लग्न करायचं तर हिच्याशीच. मी रानात जाईन, ती डोक्यावर भाकर घेऊन येईल. अजून बरंच काय काय ठरवलं होतं. एक-दोन-चार-सहा-दहा वर्ष सरत होती. मी वयाने मोठा होत गेलो. श्रीदेवी तेवढीच राहात होती. तिनं तसंच राहावं वाटायचं मी मोठा होईपर्यंत. मग कळलं तिचं बोनी कपूर नामक इसमाशी लग्न झालं.

हर किसी को नही मिलता, यहा प्यार जिंदगी मे... तेव्हा फार दु:ख झालं होतं,

पण म्हटलं जाऊद्या, लग्न करूद्यात बोनी का फिनी कपूरशी. पिच्चरात अन् स्वप्नात दिसणारी श्रीदेवी काय त्यो बोनी-फिनी कपूर न्हेत न्हाय. श्रीदेवी अशी वर्षा-दोन वर्षातनं भेटायची पिच्चरातनं मला आणि मी तिला. बोनी कपूरशी लग्न केलं हे सोडलं तर बाईनं कधीच दु:ख नाही दिलं.

मनात, कानांत आणि डोळ्यांत नेहमी साठत गेली आणि अचानक आज धक्का. हृदयविकाराने गेली बिचारी. रानात भाकर घेऊन बोलवणार म्हणून एवढं रागावतात का गं कुणी? ऑ? तू भाकर घेऊन रानात नको येऊ गं, तसा मीही राहात नाही गावाकडं. तू नुसतं राहायला हवं होतं मी असेपर्यंत तरी.

नीट जा, पोहोचल्यावर फोन कर, बॅलन्स कमी असला तर मिस कॉल दे. मी करेन. हुश्श्श... हृदयविकाराचा धक्का बसतो तेव्हा फार दुखतं का हो?