Trijya 2019 Marathi Movie : शहरीकरणाचा फेरा वाढतोय. लोंढ्याबरोबर ग्रामीण भागातून असंख्य लोक शहरात येतायत. इथं संधी दिसतेय. नोकरीची, चांगलं जगण्याची. ते इथं रमतात. मग नव्याचे नऊ दिवस संपतात. गावाकडची जोडलेली नाळ तोडवत नाही. शहरात उपरा असल्याचं वाटतायला लागतं. मग आपण ना इथले राहत ना तिथले. ही प्रक्रिया अत्यंत अस्वस्थ करणारी त्याचवेळा एकटं करणारी असते.शहर जेव्हढं देतं त्यापेक्षा जास्त हिरावून घेतं. शोषतं. विचारांचा फेरा सुरु होतो. त्यातून माणूस एकलकोंडा बनतो. मजूर किंवा नोकरपेशा लोकांची या स्थितीत फारच ओढाताण होते. मग यातून बाहेर पडावसं वाटतं. स्वत:ला पुन्हा शोधावचं वाटतं. अनेकदा तसा प्रयत्न पण केला जातो. पण शहराची गुरुत्वाकर्षण शक्ती मोठी आहे. ते पुन्हा इकडं ओढून आणतं. ही आत आणि बाहेर जाण्या-येण्याची प्रक्रिया सतत सुरु असते. तसं पाहिलं तर आपण जगायच्या त्रिज्येतून कधी  बाहेर पडतच नाही. नुसते गोल गोल फिरत राहतो. दिग्दर्शक अक्षय इंडीकरचा त्रिज्या (२०१९) हा सिनेमा हीच प्रक्रिया अतिशय सहज सोपी करुन दाखवतो. 


या भवतालात आपलं अस्तित्व किती आहे. याचा विचार आपल्या अंतर्मनात अर्थात सबकॉन्शियस माइंडमध्ये नेहमी सुरु असतो. रोजच्या राहाटगाड्यात फिरत असताना आपण कधी तरी यातून बाहेर पडू का हा प्रश्न तयार होतो. यातूनच मग स्वत:ला भवतालात मिसफिट मानण्याची प्रक्रिया सुरु होते. खरंतर आपण रोज नव्यानं घडत बिघडत असतो. या फेऱ्यात सभवतालशी अनेकदा कनेक्ट होणं खुपच कठिण होऊन जातं. ही डिटॅचमेन्ट मग पलायनाकडे जाते. मग असलेल्या चौकटीतून स्वत:ला बाहेर  काढण्याचा प्रयत्न सुरु होतो. हे बाहेर पडणं तेव्हढं सोपं नसतं. हे सोपं करण्याच्या प्रयत्नात माणसं आणखी अडकत जातात. मग पुन्हा जिथून आलो तिथं काही मिळतंय का तो पाहायला बाहेर पडतो. जन्म मृत्यूच्या फेऱ्याचा उलडगा झाला की डिटॅटमेन्ट किंवा अलिप्त होण्याची प्रक्रिया जरा बरी होते. हे त्रिज्याच्या न नायकाकडे पाहिल्यावर दिसतं आणि पटतं ही. 




मनाचा कोंडवाडा मोकळा करण्यासाठी निसर्गासारखी जागा नाही. एकिकडे शहरातला किचाट, हाँकिंग, सततची वर्दळ, धावणाऱ्या गाड्या आणि पावंल. तर दुसरीकडेलय गावाकडे समाज, कुटुंब, नातेसंबंध असं बरंच काही गुरफटवून ठेवणारं. निसर्गाकडे पुन्हा एकदा यातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो. त्रिज्यातला नायक हा मार्ग जंगलात शोधतो. जंगल ही वर वर अगदी घनदाट झाली मुळं अगदी कॉम्प्लेक्स संकल्पना वाटत असली तरी आत खोल जंगलात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. दाट झाडीतली दरीखोऱ्यातली पाऊलवाट, आडवी तिडवी असली तरी त्यावर कुणीतरी गेलेलं असतं. नसेल गेलं तर नवी वाट बनण्याची प्रक्रिया ही आपल्या चालण्यातून सुरु होते. आत जंगलात नदी भेटते, तिच्या प्रवाहामुळं खळखळणारा झरा भेटतो. हे सर्व काही प्रचंड असतं. जंगलात आवाजाची एक वेगळीच दुनिया असते. त्यात आपला आवाज आपसूक हरवतो. फक्त आपला श्वास आणि हृदयाचे ठोके यातून आपण या प्रचंड भवतालात जगतोय. याची जाणिव होते. 




कर दे मुझको खुद से ही रिहा... असा सुरु झालेला अजाणता प्रवास पुन्हा नव्यानं स्वत:ला सापडण्याच्या अनुभूतीकडे जातो. हे सर्व जेव्हढं अगम्य तेव्हढंच सोपं आणि नदी सारखं प्रवाही असतं. दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही. 


या आरती प्रभूंच्या कवितेप्रमाणे आपल्यातला प्रत्येकजण त्रिज्येतल्या फिरण्याला शास्वत करत असतो. त्रिज्या (२०१९) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतोय. अनुराग कश्यप सिनेमाला प्रेजेन्ट करतोय. शिवाय अक्षय इंडीकरच्या नवीन सिनेमा कंस्ट्रक्शनचा तो को-प्रोड्युसर अनुराग कश्यप आहे. त्रिज्याला बेस्ट ऑडियोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार ही मिळालाय. याचा फायदा सिनेमाला ओटीटीवर मिळू शकेल.  त्रिज्या हा सिनेमा शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एशियन न्यू टॅलेंट अवॉर्डसाठी निमंत्रित झाला होता.