जय भीम (2021) पाहिला. अलीकडच्या काळात आलेला तो जबरदस्त कोर्टरूम ड्रामा आहे. यापूर्वी पिंक (2016) आणि मुल्क (2018) मध्ये भन्नाट कोर्टरूम  ड्रामा रंगला. पिंकमध्ये स्त्री आणि मुल्कमध्ये मुस्लिम हे मार्जिनलाईज घटक केंद्रस्थानी होते. जय भीममध्ये आदिवासी आणि पोलिसी अत्याचारांवर कोर्टात वादविवाद घडतात. तिथले लीगल आर्ग्युमेन्ट फार टोकाचे आहेत. हे समजून घेण्यासाठी 31 ऑगस्ट 1952 हे पत्रकार प्रशांत पवार यांचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे. Dishonoured by History: "criminal Tribes" and British Colonial Policy या मीना राजाध्यक्ष यांच्या पुस्तकात त्याचा इतिहास आला आहे. ही दोन्ही पुस्तक वाचल्यास जय भीम सिनेमातले लीगल सबटेक्स्ट अर्थात कायदेशीर अन्वयार्थ लक्षात यायला मदत होते. त्यामुळंच हा सिनेमा वेगळ्या उंचीवर गेलाय. लोक त्याची चर्चाही करतायत. 


एप्रिल 2021 मध्ये आलेल्या कर्णन सिनेमानं महाराष्ट्रात मोठी चर्चा घडवली. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा लोक उठाव करतील असा सोईस्कर विचार घेत, कर्णनचा उदोउदो झाला. कर्णनमध्ये हिंसाचारानंतरची न्यायालयीन प्रक्रिया दाखवण्यात आलेली नाही. त्यात पोलिसी अत्याचार आणि त्याचा प्रतिकार यावर फोकस होता. जय भीममध्ये न्यायालयीन संघर्षच प्रकर्षानं आला आहे. तो घटनात्मक तरतुदीपासून माणूस म्हणून जगण्याचा सर्वांना समान अधिकार यावर भाष्य करतो. घटनेनं भारताच्या नागरिकांना दिलेल्या समान हक्क आणि अधिकारांची जाणिव करुन देतो. त्यातला न्यायालयीन संघर्ष आणि सत्य जिंकण्याची प्रक्रिया दाखवतो. यामुळं जय भीमच्या यशात चार चांद लागलेत. जय भीम उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या हजारो अॅडव्होकेट चंद्रूंसाठी आशेचा किरण ठरतो. 1995 ला घडलेल्या सत्यघटनेवर आधारित जय भीम या देशातल्या लाखो राजकन्नूंची गोष्ट सांगतो. 


कर्णन आणि जय भीमची चर्चा करताना आणखी एका सिनेमाचा उल्लेख इथं करायला हवा. कोसा (2020). मोहित प्रियदर्शी या दिग्दर्शकाचा हा हिंदी सिनेमा.  छत्तीसगढमधल्या बस्तर भागात राहणाऱ्या आदिवासी मुलाच्या न्यायिक संघर्षाची ही गोष्ट. ती जय भीमच्या कथानकाला समांतर आहे. बस्तरमधल्या शेकडो आदिवासींना पोलिसी अत्याचाराला सामोरं जावं लागतं. राजकिय आणि सामाजिक संघर्षातून होणारे पोलिसी अत्याचार कोसा मुचाकीसारख्या शेकडो मुलांना नक्षली ठरवतात. त्यांचा सर्वांचा हा न्यायालयीन लढा असल्याचं मोहितचं म्हणणं होतं. राजकारणासोबत, समाजकारण आणि मीडियाची भूमिका यावर कोसामध्ये मोठं भाष्य करण्यात आलंय. याच वेळी झारखंडमधल्या लेखिका महुआ माजी यांची 'मरंग गोड़ा नीलकंठ हुआ' या कादंबरीचा उल्लेख ही महत्त्वाचा आहे. आधुनिक भारतात आदिवासींचं स्थान नक्की कुठं आहे? आधुनिकतेच्या चक्रात आदिवासी कसा भरडला जातोय? याची गोष्ट कादंबरीत आहे. त्यात झारखंडी आदिवासींच्या भाषेचा उपयोग करण्यात आलाय. आता ही भाषा लोप होत चाललेय. 


या सर्व परिस्थितीत दिग्दर्शक मडोन अश्विनचा मंडेला हा सिनेमा जात, जातीचं राजकारण आणि त्यातून घडणारी समाजकारणाची क्लिस्ट प्रक्रिया यावर प्रकाश टाकतो. या चार ही सिनेमांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे मानवाच्या अंगी असलेले मूलभूत गुण. समाजशास्रात मानव हा सामाजिक प्राणी असल्याचं पहिल्याच वाक्यात नमूद करण्यात आलंय. जेव्हा समाजकारणावर राजकारण वरचढ ठरतं तेव्हा काय होऊ शकतं हा समान दुवा या चार ही सिनेमात महत्त्वाचा आहे. 


जय भीम, कर्णन आणि मंडेला हे तिनही सिनेमे तामिळनाडूतील समाज आणि राजकारणावर नेमकं बोट ठेवतात. दक्षिणेकडच्या एकाच राज्यातून अशा पद्धतीचे सिनेमे तयार व्हायला सामाजिक, राजकीय आणि त्यासोबतच आर्थिक कारणं आहेत. याचा विचार आणि संशोधन व्हायला हवं. सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक मुद्द्यांचं व्यावसायिकीकरण होतंय का? याचा अभ्यास करायला वाव आहे. तो झाला तर अनेक गोष्टींचा खुलासा नक्कीच होईल.