BLOG : ज्या शहरात फक्त एकच सिनेमागृह आहे, तिथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची कल्पना करवत नव्हती. खजुराहो शहरात जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे फिल्म फेस्टिव्हल असेल असं ही वाटलं नाही. मला शेवटच्या दोन दिवसांसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. आधी वाटलं सर्व काही घडून गेलं. आता फक्त क्लोजींग सेरेमनीच मिळेल. पण माझा अंदाज खोटा ठरला. मी व्हेनूला पोहोचलो आणि थक्क झालो. समोर टपरा टॉकीज होतं. टपरा टॉकीज म्हणजे तंबू थिएटर. तिथे 60 ते 70 लोकांची बसण्याची सोय होती. समोर भली मोठी एलएडी स्क्रिन होती. ज्याच्यावर कुठला तरी बुंदेली सिनेमा सुरू होता. मी आणि संजय सिंह दोघं ही त्या गर्दीत जिथं जागा मिळेल तिथं बसलो. माहौल आधीच बनला होता. स्थानिक कलाकारांनी बनवलेले स्थानिक भाषेतले सिनेमे. सिनेमा जास्त मोठा नव्हता. फार फार तर अर्धा तासाचा असावा. तो संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. दिग्दर्शकाला समोर बोलवण्यात आलं. तो त्याच्या टीम सोबत आला होता. ही सर्व टीम समोर उभी राहिली आणि मग प्रेक्षकांमधून अनेक प्रश्न आले. त्याला या टीमनं उत्तरं दिली. सर्व काही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये होतं तसं. फक्त संवाद हा हिंदी आणि कधी कधी खडी बुंदेली भाषेत होत होते. हे फार भारी वाटलं. नेहमी पेक्षा वेगळं होतं. 


मध्य प्रदेशातल्या बुंदेलखंड इथे सातवा खजुराहो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पार पडला. 5 ते 11 डिसेंबला या कालावधीत थंडीची नुकतीच सुरुवात झालेली. खजुराहोत पर्यटकांची गर्दी वाढायला लागलेली. रस्त्यावरची रेलचेल वाढलेली. ऐतिहासिक जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या खजुराहो मंदिरांपासून काही मीटरवर या फिल्म फेस्टिव्हलचा मुख्य कार्यक्रम होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथे फक्त 3 टपरा टॉकिज उभारण्यात आले होते. तिथं आंतराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे सिनेमा दाखवण्यात येत होते. यात सर्वात जास्त गर्दी होती ती बुंदेलखंड आणि आसपास बोलल्या जाणाऱ्या भाषेतल्या स्थानिक सिनेमाची. इथे फेस्टिव्हलच्या सात दिवसांमध्ये जवळपास 100 स्थानिक छोटे-मोठे सिनेमे दाखवण्यात आले.


बुंदेलखंड भाग शेतकरी आत्महत्येसाठी जास्त चर्चेत असतो. दुष्काळामुळे हा भाग नेहमी बातम्यांमध्ये असतो.  इथुन स्थलांतराचे प्रमाण ही फार आहे. जे शेतकरी तग धरुन आहेत, त्यांना अनेक दिव्यातून जावं लागतंय. सरकारी मदत मिळेल, न मिळेल आपण आपली शेती करत राहावी असा विचार करणारा एक मोठा गट या इथे आहे. या दुष्काळी भागात शेतीतून मोठी अपेक्षा करणं फार कठीण आहे. त्यामुळं जे काही पिकेल त्यावर गुजराण करणं आणि मोठ्या शहरांमध्ये गेलेल्या आपली मुलं कधी तरी परत येतील या आशेवर जगणारी असंख्य माणसं या भागात पाहायला मिळतात. 


खजुराहो शहरातच्या आसपास पर्यटनामुळं थोडी  परिस्थिती बरी आहे असं म्हणायला हरकत नाही. शेकडो वर्षांपूर्वी इथे आलेल्या अज्ञात शिल्पकारामुळे आज इथे थोडीशी भरभराट झाली आहे. बुंदेलखंडमधल्या इतर भागातल्या मानाने तसे अच्छे दिन आहे ऐव्हढंच. पर्यटनामुळे हा फक्त सुजलाम सुफलाम पट्टा बनलाय. उभ्या आडव्या रेषेत पाच किलोमीटर मध्ये शहराची हद्द संपते. या पट्ट्यात राहणारे सर्व लोक एकमेकांना ओळखतात. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या बंगाली चायवाल्याच्या टपरी बाहेर जमा होतात. तिथं बकैती असतात, काही शांतपणे देशाच्या राजकारणावरचे वावविवाद ऐकत असतात. बंगाली चायवाल्याच्या दुकानासमोरच एक टपरा टॉकिज होते. ही मंडळी तिथला सिनेमा पाहायला आली होती. सिनेमातल्या गोष्टीवर चर्चा करत होती. आम्ही त्यांना विचारलं फिल्म कैसी लगी. त्यातला एक म्हणाला हमको तो अच्छी लगी आप बताओ, सिनेमाचा विषय शेतकरी आत्महत्येचा होता. आम्ही महाराष्ट्रातली परिस्थिती सांगितली. आमच्याकडे ही विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असं सांगितलं. सभी देशमें यही चल रहा है बाबू असं म्हणत ती गर्दी नव्या सिनेमासाठी पुन्हा टपरात गेली.


खजुराहो फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यामागे एक बॉलीवुडचं जोडपं काम करतंय. अभिनेता राजा बुंदेला आणि अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी या जोडीनं बुंदेलखंडमध्ये सिनेमा कल्चर आणि सिनेमा एडव्होकेसी सुरू केली. यासाठी बुंदेलखंड अकादमी ऑफ सिनेमा, कल्चर एन्ड परफॉर्मिंग आर्ट्सची (बाक्पा) स्थापना करण्यात आली. या अंतर्गत सात वर्षांपूर्वी खजुराहो आंतराराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलची सुरुवात करण्यात आली. सुश्मिता मुखर्जी यांच्यामते दुष्काळ आणि स्थलांतराच्या फेऱ्यामुळं  इथं सिनेमाची संस्कृती वाढली नाही. इथं स्थानिक लोककला मंच वाढले, पर्यटनामुळं त्यांना चांगले दिवस आले. पण ते फक्त काही काही महिने. सिनेमाच्या बाबतीत तर परिस्थिती फारच वाईट होती.  शहरात काही वर्षांपूर्वीच एक सिनेमाचं थिएटर उभं राहिलं. ते बॉलीवूडंनं काबीज केलं. इथं ही स्थानिक सिनेमांना वाव नाही. म्हणूनच मग स्थानिक सिनेमांना प्रोत्साहम मिळालं, आमच्याकडे चांगले कलाकार आहेत. त्यांना स्थानिक भाषेत आपले सिनेमे बनवता यावेत, ते दाखवण्यासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी बाक्पाची स्थापना झाली. आता गेली सात वर्षे आम्ही टपरा टॉकीजच्या माध्यमातून या सिनेमांना जागा देतोय.


आधी शहरात आठ ते दहा ठिकाणी हे टपरा टॉकीज स्थापन करण्यात आले. तिथं लोकांनी यावं भुईमुगाच्या शेंगांसहित स्थानिक सिनेमा पाहावा. त्यावर चर्चा करावी अशी ही संकल्पना होती. घडलं ही तसंच. सरकारी मदतीनं खजुराहो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा कार्यक्रम तर चांगला आखला गेला. पण इथल्या कनेक्टिविटीचा प्रश्न पाहता त्याला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं रुप देताना खुप त्रास झाला. स्वत: बॉलीवूडमध्ये काम करत असल्यानं मैत्री खात्यात गोविंदा, मुकेश खन्ना, अशा या भागातल्या पॉप्युलर चेहऱ्यांना इथं आणण्यात आलं. यामुळं गर्दी वाढली. ही गर्दी टपरा टॉकीजपर्यंत पोहोचली. थोडा बहोत फायदा झाला. आजूबाजूच्या भागातून चांगले नवनवीन विषयांवर सिनेमा बनवणारे तयार झाले. तांत्रिकदृष्ट्या अजूनही तेवढे चांगले नसले तरी विषयांच्या बाबतीत या सिनेमामध्ये खूप प्रयोग व्हायला लागले. याचं समाधान असल्याचं अभिनेता राजा बुंदेला यांनी सांगितलं. एक दिवस या टपरा टॉकीजमध्ये बुंदेली भाषेतला सर्वोत्तम सिनेमा दाखवला जाईल ज्याला पाहायला देश-विदेशातले लोक गर्दी करतील अशी राजा बुंदेला यांना आशा आहे. 


बुंदेली सिनेमाची आजची स्थिती आपल्याकडच्या मालेगाव सिनेमासारखी आहे. मालेगावमध्ये स्थानिक सिनेमा घडला, वाढला आणि स्वत: चं स्थानिक मार्केट तयार केलं. तसं मात्र बुंदेलखंडात झालं नाही. पण इंटरनेट आणि कॅमेऱ्याच्या तांत्रिक बदलामुळे बुंदेली सिनेमा वाढला. आज बुंदेली सिनेमा तयार करणारे असंख्य क्र्युव्ह या ठिकाणी आहेत. हातात छोटा कॅमेरा, (अनेकदा मोबाईल) ट्रायपोर्टवर ठेवून लोक सिनेमा करताना दिसतात. स्थानिक बुंदेली भाषेतले कंटेट असलेले अनेक युट्युब चॅनल्सचं सबस्क्रिप्शन हजारोंच्या पलिकडे गेले आहेत. या स्थानिक सिनेमाला ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याची तयारी बुंदेला दाम्पत्यानं केली आहे. यामुळं पुढच्या वर्षीपासून चांगल्या बुंदेली स्क्रिप्ट आणि सिनेमांचं एक मार्केटचं सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जो वर स्पर्धा वाढत नाही तोवर प्रगती होणार नाही हे स्पष्ट दिसत असल्यानं स्थानिक सिनेमांच्या फायद्यासाठी आता एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. 


खजुराहो शहरात या दिवसांमध्ये पर्यटकांची रेलचेल असते. महिन्याला लाखो पर्यटक इथे येत असतात. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या जास्त असते. देशांतर्गत पर्यटकांची संख्या ही वाढली आहे. यामुळे इथे हॉटेल उद्योगालादेखील चालना मिळाली आहे. मंदिरांच्या बाजूलाच असलेलं मार्केट फुललं आहे. अशावेळी सिजनच्या सुरुवातीलाच खजुराहो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सुरू झाल्यानं इथला फुटफॉल वाढला. याचा थेट फायदा इथं सिनेमाची संस्कृती वाढण्यासाठी नक्कीच होणार आहे.