एखाद्याच्या प्रेमात पडलं की ती त्याचा स्वभाव किती ही विचित्र असला तरी मन मानत नाही. हळूहळू त्याच्या स्वभावाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया सुरु होते. पुढे चूक लक्षात येते. त्याच्यापासून वेगळं होण्याची प्रक्रिया सुरु होते. तोवर वेळ हातातून निसटून गेलेली असते. आयुष्याची राख रांगोळी होते. ॲनेट (2021) या सिनेमात ॲनच्या बाबतीत ही असंच घडतं. स्वत: उत्तम ऑपेरा सिंगर असलेली ॲन (मॅरीयन कोर्टीयाड) रॅपर आणि स्टँडअप कॉमेडीयन हेनरीची (ॲडम ड्रायव्हर) निवड करते. हा हेनरी मिसफिट आहे. मिसफिट म्हणजे समाजातल्या सचोटीत फिट न बसणारा. क्रिएटिव्ह माईंड म्हणून आधी त्याच्या वेडसरपणाकडे दुर्लक्ष करावंसं वाटतं. पण हेनरी पुढे ॲनसोबतच प्रेक्षकांचं मन काबिज करतो. मग आपलं खरं रुप दाखवतो. हेनरी विचित्र आहे, खुनशी आहे, विक्षिप्त आहे. तो आपल्या प्रेक्षकांना गृहीत धरतोय. त्यांना फाट्यावर मारतोय. आधी स्टँडअप कॉमेडियन म्हणून हे सहन केलं जातं. पण नंतर कहर होतो. हे सर्व घडत असताना संवेदनशील कलाकार असलेली ॲन ॲनेटला जन्म देते. पुढे जे घडतं ते कल्पनेच्या पलिकडचं आहे. ॲनेट (2021) सोबत फ्रेंच दिग्दर्शक लिओस कॅरेक्सनं हॉलीवूडमध्ये डेब्यू केलाय. ही ॲन आणि ॲनेटपेक्षा हेनरीची गोष्ट आहे. तोच या कथेचा हिरो आहे आणि व्हिलनही. सर्व सिनेमा त्याच्याभोवती फिरतो आणि शेवटी तो प्रेक्षकांना थेट सांगतो. स्टॉप लुकिंग एट मी.
दिग्दर्शक लिओस कॅरेक्स हा आधी सिनेमा समीक्षक होता. त्याला सिनेमा या माध्यमाची चांगली जाण आहे. त्याच्या नावावर पाच फिचर फिल्स आहेत. त्यापैकी बॉय मिट्स गर्ल (१९८४), द लवर्स ऑन द ब्रीज (१९९१), होली मोटर्स(२०१२) आणि आता ॲनेट (२०२१) हे चार सिनेमे विशेष गाजले. ॲनेटला (२०२१) फ्रान्समधल्या कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. लिओसच्या या चार ही सिनेमांना सोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तो म्हणजे सर्वच सिनेमांमधले मुख्य पात्र हे मिसफ़िट आहेत. ते विक्षिप्त आहेत, हा विचित्रपणा कधी आपसूक तर कधी जाणून बुजून आलेला आहे. यातूनचं त्याच्यासोबत सिनेमातल्या इतर पात्रांची हेळसांड होते. सिनेमा संपल्यावर प्रेक्षकही या मिसफिट पात्रांचाच जास्त विचार करायला लागतात. त्याला सोबत घेऊन जातात.
ॲनेट(2021) मधलं हेनरीचं कॅरेक्टर हे लिओसच्या आधीच्या पात्रांपेक्षा जास्त मतलबी आहे. तो खुनशी आहे. त्याच्यामुळं अनेक ‘कांड’ होतात. कधी कधी ते घडवणारा ही तोच असतो. पण त्याला सतत आपल्यावरच अन्याय होतोय असं वाटत. तसं तो आसपासच्या लोकांना सांगतो. सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं स्टेजवरचं नाव आहे ‘एप ऑफ गॉड’ आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच तो जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा तो ह्युमरस आहे असं वाटतं. समोर बसलेल्या प्रेक्षकांचा अपमान करुन त्यातून विनोद निर्मिती करायची अशी त्याची पध्दत असते. पण हे जास्त काळ टिकत नाही. तो प्रेक्षकांना गृहीत धरतोय, त्यांना कस्पटासमान मानतोय हे लगेच जाणवायला लागतं. याच्यातूनच त्याच्या मिसफिट कॅरेक्टरची ओळख होते. तो पुढे काय काय करणार याची ही उत्कंठा वाढवून जातो. तिकडे ॲन तेव्हढ्याच संयत पध्दतीनं त्याचा हा विक्षिप्तपण सहन करत असते. या परस्पर विरोधी स्वभाव असलेल्या मुख्य पात्रांच्या गोष्टीत प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात लिओस यशस्वी झालाय.
ॲनेट (2021) हा सायकोलॉजिकल म्युझिकल ड्रामा आहे. सिनेमाची सुरुवात स्पार्क्स या जगप्रसिध्द बँडने होते. ‘सो मे वुई स्टार्ट’ असं म्हणत ते ॲनेटची सुरुवात करतात. 70च्या दशकात बेटेल्सबरोबरच स्पार्क्स बँडही नावारुपाला आला. एल्टन जॉन पासून अनेकांनी स्पार्क्ससोबत गाणी गायली. स्पार्क्समधल्या रॉन मायल आणि रशल मायल या दोन्ही भावांनी 1970 ते 1990 चा काळ गाजवला. आज हे दोघे ही सत्तरीत आहेत. रॉन किबोर्डचा मास्टर आहे, तर रशल वोकलिस्ट आहे. या दोघांपासून ॲनेटची सुरुवात होणं हे देखील सिनेमाची जमेची बाजू आहें. ॲन अर्थात मॅरीयन कोर्टीयाड आणि हेनरी म्हणजेच ॲडम ड्रायव्हर यांनी सिनेमात स्वत: गाणी गायलीयत. दोघांना यापूर्वी ही गाण्याचा अनुभव होतो. त्याचा फायदा लिओसला झाला.
जागतिक पातळीवर कलात्मक सिनेमाच्या यादीत ॲनेट (2021) जाऊन बसलाय. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाल्यावर सिनेमाची चांगली प्रसिध्दी झाली. सर्व युरोप आणि अमेरीकेतल्या काही भागात सिनेमा प्रसिध्द झाला आणि सध्या अमेझॉन प्राईमला तो युके आणि युएसमध्ये उपलब्ध आहे. दिग्दर्शक लिओस कॅरेक्सच्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ठ सिनेमा म्हणून ॲनेट (2021) कडे पाहिलं जातंय.