सध्या बांग्लादेश अस्वस्थ आहे. तिथल्या घटनांमुळं भारतातलं वातावरण ढवळून निघालंय. हे असं पहिल्यांदा घडत नाहीय. अयोध्येतल्या बाबरी तोडफोडीचे पडसाद बांग्लादेशातही उमटले होते. तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंच्या घरांना टार्गेट करण्यात आलं. जाळपोळ झाली. जसं आज घडतंय तसंच घडलं होतं. या सर्व घटनांवर महुआ माज़ी या झारखंडमधल्या हिंदी लेखिकेनं एक पुस्तक लिहलंय. 'मैं बोरिशाइल्ला'. 


BLOG : केमिकल लोच्या... प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट


कादंबरीत बांग्लादेशातल्या बोरिशाल भागातल्या घडामोडी आहेत. केष्टो नावाच्या हिंदू पेहलवानाची ही गोष्ट. कादंबरीत ब्रिटीशांविरोधातला स्वातंत्र्य लढा, भारताची फाळणी, पूर्व पाकिस्तानची निर्मिती, त्यानंतर पाकिस्तानकडून झालेली नैतिक मूल्य आणि भाषिक कोंडी, मुक्ती वाहिनीचा रक्तरंजित संघर्ष, बांग्लादेशाची निर्मिती ते अयोध्येतल्या बाबरी मशिदीची तोडफोड असं जवळपास शंभर एक वर्षांचं हे रंजक कथानक आहे. महुआ माज़ी यांना 'मै बोरिशाइल्ला' कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 




मै बोरिशाइल्लाची इथं आठवण होण्याचं खास कारण आहे. ऑस्ट्रेलियात नुकताच मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पार पडला. यात 'शे शोमॉय अर्थात दोज डेज'(2021) ही शॉर्ट डॉक्युमेन्ट्री दाखवण्यात आली. मधुरिमा रॉय-चौधरी या तरुण दिग्दर्शिकेची ही डॉक्युमेन्ट्री आहे. मै बोरिशाइल्लाच्या कथानकातल्या केष्टोसारखेच खरंखरं पात्रं मधुरिमानं शोधून काढलंय. बांग्लादेशात राजकीय कैदी राहिलेले अपरेश धर यांच्यावर ही डॉक्युमेन्ट्री आहे. अपरेश आज नव्वदीत आहेत. त्यांनी बांग्लादेश स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. त्यासाठी तुरुंगवास ही भोगला. "देश आज़ाद झाला पण पाकिस्तानच्या नापाक इराद्यात आम्ही अडकलो. जेलमध्ये टाकण्यात आलं राजकीय कैदी म्हणून. आमच्यावर उर्दू भाषा लादण्यात येत होती.  मुस्लिम समाजातल्या भयंकर रुढी परंपरा लादण्याचा चंग पाकिस्ताननं बांधला. आम्ही बधलो नाही. रस्त्यावर उतरुन लढलो आणि जिंकलो ही." आपल्या जुन्या आठवणीत अपरेश धर आज ही रमतात. हे सर्व शे शोमॉय 'दोज डेज' (2021) मध्ये आलंय. 


BLOG : सर्व काही सिनेमाच आहे.....


बांग्लादेशाच्या स्वातंत्र लढाईत मुक्ती बाहिनीची भूमिका आणि संघर्ष फार महत्त्वाचा होता. अपरेश धर यांनी तब्बल सात वर्षे जेलमध्ये काढली. ते बाहेर आले, शिक्षण पूर्ण केलं, शिक्षकी पेशा स्वीकारला. नवीन पिढी घडवायचा प्रयत्न केला. ते आज नव्वदीतही स्वत:ची कामं स्वत: करतात. बाजारात जातात. भाजी, मासे खरेदी करतात. संपूर्ण स्वयंपाक स्वत:च करतात. 


आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमताना ते नव्या बदलांना स्वीकारतात. आधी ज्या देशात फोन करायला पाच-सहा किलोमीटर चालत जायला लागायचं. तिथे एका व्हिडियो कॉलवर अपरेश आपल्या लग्नाच्या 54 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतात. नातवंडांना ऑनलाईन आशीर्वाद देतात. असं जगणं 360 डिग्री बदलण्याचा अनुभव या डॉक्युमेंट्रीत आहे. पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो पाकिस्तानी सैनिकांसोबतचा संघर्ष. "आमची मूल्य आणि  बांग्लाभाषेशी तडजोड आम्ही खपवून घेणार नव्हतोच. संघर्ष ताणला तरी टिकून राहिलो. या जगातल्या सर्वांच्या वाट्याला समान पध्दतीचं जगणं यावं असं कम्युनिजम सांगतो. आम्ही त्यासाठीच लढलो.", असं अपरेश धर अभिमानाने सांगतात. 




दिग्दर्शिका मधुरिमा रॉयची ही पहिली शॉर्ट डॉक्युमेंट्री आहे. मेलबर्न आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शे शोमॉय (2021) डॉक्युमेंट्री अॅपल टीव्ही, iffm.com.au  या वेबसाईटवर पाहता येऊ शकते.