मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळणार का? धोनीच्या भावी कारकीर्दीविषयी तुमच्याआमच्या मनात ही शंका निर्माण होण्याचं कारण म्हणजे बीसीसीआयनं आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची जाहीर केलेली कॉण्ट्रॅक्ट यादी. बीसीसीआयच्या या कॉण्ट्रॅक्ट यादीत ए प्लस, ए, बी आणि सी या चार श्रेणींचा समावेश आहे. त्या चार श्रेणींमध्ये मिळून बीसीसीआयनं 27 शिलेदारांना कॉण्ट्रॅक्टमध्ये सामावून घेतलं आहे. पण त्या 27 जणांमध्ये धोनीचा समावेश नाही.
बीसीसीआयनं रिषभ पंतला पाच कोटी रुपयांचं मानधन असलेलं ए श्रेणीचं कॉण्ट्रॅक्ट दिलं आहे. अनुभवी रिद्धिमान साहालाही बीसीसीआयनं तीन कोटी रुपयांच्या बी श्रेणीत सामावून घेतलं आहे. पण एक कोटी रुपयांच्या सी श्रेणीतही बीसीसीआयनं धोनीचा समावेश केलेला नाही. त्यामुळं प्रश्न पडतो, की बीसीसीआयनं वार्षिक कॉण्ट्रॅक्टच्या नावानं केलेली ही कठोर अॅक्शन आगामी मोसमासाठी धोनी नकोसा असल्याचं दाखवून देते का? या प्रश्नावर बीसीसीआयचा खुलासा आहे, की इंग्लंडमधल्या विश्वचषकानंतर धोनीच्या उपलब्धतेविषयी कायम अनिश्चितता असते. त्यामुळं त्याला कॉण्ट्रॅक्ट यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.
इंग्लंडमधल्या विश्वचषकात धोनी अखेरचा वन डे सामना खेळला तो दिवस होता 9 जुलै 2019. त्यानंतर धोनी एकाही वन डे किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत खेळण्यासाठी उपलब्ध झालेला नाही. बीसीसीआयचंही त्याच्या विश्रांतीविषयीचं धोरणही गुळमुळीतच होतं. अखेर सुनील गावस्कर यांनी गेल्या आठवड्यात धोनीच्या प्रिव्हिलेज लिव्हवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळंच बीसीसीआयनंही आता धोनीला कॉण्ट्रॅक्ट यादीतून वगळण्याची हिंमत दाखवली आहे.
धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
पण 2019 सालच्या विश्वचषकानं धोनीचा तो सारा रुबाब आता इतिहासजमा झाल्याचं दाखवून दिलं. धोनीला त्या विश्वचषकात एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला. मॅचफिनिशर म्हणून विजयी घाव घालण्याच्या त्याच्या क्षमतेलाही ओहोटी लागल्याचं विश्वचषकातच स्पष्ट झालं. त्यामुळं या विश्वचषकानंतर झाकली मूठ सव्वा लाखाची या न्यायानं धोनी गेले सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला.
अखेर बीसीसीआयच्या ताज्या कॉण्ट्रॅक्ट यादीच्या निमित्तानं धोनीसाठी अप्रिय असलेला प्रश्न त्याच्यासमोर आला आहे. धोनी, तू रिटायर कधी होणार? टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा तर आयपीएलमध्ये खेळून धोनीला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी सज्ज व्हायचं आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा लक्षात घेता, त्यासाठी बॅट परजून घेण्याचं रणांगण हे आयपीएल नक्कीच नाही. आता 39 वर्षांच्या धोनीला हे सांगणार कोण? किंबहुना त्यालाही ते नक्कीच समजत असावं.
Blog | बीसीसीआयकडून महेंद्रसिंग धोनीला निवृत्त होण्याचे संकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2020 06:33 PM (IST)
बीसीसीआयनं आगामी मोसमासाठी टीम इंडियाच्या संभाव्य शिलेदारांची कॉण्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बीसीसीआयकडून या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलियातला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक सात-आठ महिन्यांवर आलेला असताना बीसीसीआयनं घेतलेला हा निर्णय धोनीला आता निवृत्त होण्याचे संकेत देतोय का?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -