>> विजय साळवी, एबीपी माझा, मुंबई


आयपीएलच्या रणांगणातल्या क्वालिफायर टू सामन्याच्या निमित्तानं गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन फौजा उद्या शुक्रवारी आमनेसामने येतील. विशाखापट्टणच्या या मैदानात आयपीएलची फायनल गाठणारा दुसरी टीम कोणती या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण त्या उत्तरापेक्षा भारतीय क्रिकेटरसिकांची नजर महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत यांच्यातल्या द्वंद्वावर राहिल. त्याच द्वंद्वाचा आमचे स्पोर्टस प्रतिनिधी विजय साळवी यांनी घेतलेला हा आढावा.


चेन्नई सुपर किंग्सचा महेंद्रसिंग धोनी की, दिल्ली कॅपिटल्सचा रिषभ पंत. आयपीएलच्या रणांगणातला सर्वोत्तम मॅचफिनिशर कोण... याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला विशाखापट्टणमच्या मैदानात मिळणार आहे.


आयपीएलच्या रणांगणातल्या क्वालिफायर टू सामन्याच्या निमित्तानं गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन फौजा उद्या शुक्रवारी आमनेसामने येतील. विशाखापट्टणमच्या मैदानात आयपीएलची फायनल गाठणारी दुसरी टीम कोणती या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण त्या उत्तरापेक्षा भारतीय क्रिकेटरसिकांची नजर महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत यांच्यातल्या द्वंद्वावर राहील.


आयपीएलच्या रणांगणातला सर्वोत्तम मॅचफिनिशर कोण... या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विशाखापट्टणमच्या मैदानात मिळणार आहे.


आयपीएलमधल्या क्वालिफायर टू सामन्याच्या निमित्तानं चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन तगड्य़ा फौजा आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. यंदाच्या मोसमात आयपीएल फायनलचं तिकीट मिळवणारी दुसरी टीम कोणती या प्रश्नाचं उत्तर क्वालिफायर टूचा हा सामना देईलच. पण त्यानिमित्तानं धोनी आणि रिषभ पंत यांच्यातली आयपीएलमधल्या सर्वोत्तम मॅचफिनिशर किताबासाठीची आगळी चुरसही आपल्याला पाहायला मिळेल.


महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्तम मॅचफिनिशर ही बिरुदावली गेली अनेक वर्ष अभिमानानं मिरवली. वाढतं वय आणि थकलेलं शरीर यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला धोनीचा तो लौकिक आता ओसरला आहे. पण आयपीएलच्या रणांगणात चेन्नईचा 'थाला' अजूनही ट्वेन्टी ट्वेन्टीचा सुपर किंग आहे. धोनीनं यंदाच्या आयपीएल मोसमात 13 सामन्यांत तीन अर्धशतकांसह 405 धावांचा रतीब घातला आहे. तोही 138.69 च्या स्ट्राईक रेटनं. चेन्नईकडून यंदा सर्वाधिक धावा करण्याचा मानही धोनीच्याच नावावर आहे.


धोनीच्या आयपीएलमधल्या मॅचफिनिशिंग मक्तेदारीला यंदाच्या मोसमात आव्हान दिलंय ते दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतनं. दिल्लीनं आपल्या नावातलं डेअरडेव्हिल्स काढून टाकलं असलं तरी पंतच्या रक्तात मुरलेली डेअरडेव्हिल वृत्ती कशी काढून टाकता येईल? पंतच्या रक्तात मुरलेला तो आक्रमक बाणा एलिमिनेटर सामन्यात आपल्याला पुन्हा पाहायला मिळाला. एलिमिनेटर सामन्यात रिषभ पंतचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं, पण त्याच्या 49 धावांनीच दिल्ली कॅपिटल्सला विजयपथावर नेऊन ठेवलं. दिल्लीनं एलिमिनेटर सामन्यात हैदराबादवर मिळवलेल्या विजयात पंतच्या या खेळीचा मोलाचा वाटा होता. त्यानं अवघ्या 21 चेंडूंत 49 धावांची खेळी उभारली. त्याच्या खेळीला दोन चौकार आणि पाच षटकारांचा साज होता.


एलिमिनेटर सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रिषभ पंतला त्याच्या नैसर्गिक आक्रमक बाण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, चेंडू टोलवण्याची आक्रमक वृत्ती माझ्या रक्तातच इतकी भिनलीय की, समोरचा गोलंदाज कोण आहे याचा मी विचारही करत नाही. एकदा ठरवलं की पुढचा चेंडू टोलवायचा की, मी समोरच्या गोलंदाजावर तुटून पडतो. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात तुमच्याकडून वीस चेंडूंत चाळीसेक धावांची गरज असते. त्या वेळी तुम्हाला एका गोलंदाजावर आक्रमण करावंच लागतं. अशावेळी समोरचा गोलंदाज कोण आहे याचा विचार करायचा नसतो.


रिषभ पंतचा आयपीएलमधला वाढता महिमा पाहून, पृथ्वी शॉसारखा तडाखेबंद सलामीवीरही त्याला आजच्या जमान्यातला सर्वोत्तम मॅचफिनिशर म्हणून गौरवतो. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात अनेकदा दडपणाखाली खेळून विजय खेचून आणायचा असतो. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात पृथ्वी शॉ बाद झाल्यावर दिल्लीसमोरचं धावगतीचं आव्हान पंतच्या टोलेबाजीनंच नियंत्रणात ठेवलं होतं. या सामन्यात दिल्लीला विजयपथावर नेल्यानंतरच तो बाद झाला. त्यामुळंच पृथ्वी शॉ म्हणतो की, आजच्या जमान्याच्या फलंदाजांमधला रिषभ पंत हा सर्वोत्तम मॅचफिनिशर आहे.


दिल्लीच्या या पठ्ठ्यानं यंदाच्या आयपीएल मोसमात 15 सामन्यांमध्ये तीन अर्धशतकं आणि 163 च्या स्ट्राईक रेटनं 450धावा फटकावल्या आहेत.


धोनी आणि त्याच्या टीम इंडियानं 2007 सालचा विश्वचषक जिंकून भारतात ट्वेन्टी ट्वेन्टीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या त्याच लोकप्रियतेचं प्रॉडक्ट आहे दिल्लीचा डेअरडेव्हिल रिषभ पंत. 2007 साली हाच रिषभ पंत अवघ्या दहा वर्षांचा होता. गेल्या बारा वर्षांत त्याची आणि त्याच्यासारख्या अनेक गुणवान फलंदाजांची वृत्ती ही ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटनं पोसली आहे. त्यामुळंच आयपीएलच्या रणांगणात धोनीसमोर एखादा रिषभ पंत उभा राहतो, त्याचं क्रिकेटरसिकांना आश्चर्य नाही तर कौतुकच वाटतं.


म्हणूनच म्हणतो आयपीएलमधल्या क्वालिफायर टूच्या सामन्यात दिल्ली जिंको किंवा चेन्नई. आपल्याला त्यानं फरक पडणार नाही. पण जिंकण्यासाठीच्या त्या लढाईत धोनी आणि रिषभ पंतमधलं मॅचफिनिशिंगचं द्वंद्व पाहायला मिळालं तर तुमच्याआमच्यासारख्या क्रिकेटरसिकांची तहानभूक खऱ्या अर्थानं भागणार आहे.