जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येणार असते, तेव्हा त्याची सर्वात पहिली चाहूल पशू-पक्षांना होते, असं म्हटलं जातं. पण त्या दिवशी अचानक आकाशात पक्षांचा कलकलाट सुरु होता. सर्वत्र काळ्या धुराचे लोट पसरले होते. ते पाहून काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. वास्तविक, क्राईम बीटसाठी बातम्यांचं संकलन करणं, तसं माझ्यासाठी रोजचंच काम होतं. पण त्या दिवशी क्राईमनं शहरालाच शोधलं होतं.


मानवतेवरील त्या भ्याड हल्ल्याच्या दिवशी म्हणजेच 12 मार्च 1993 मी दुपारी दक्षिण मुंबईतल्या रिगल सिनेमागृहाच्या मागे सेंटर फॉर एज्युकेशन ग्रॅन्ट डॉक्यूमेंटेशनमध्ये बसलो होतो. माझ्या नव्या स्टोरीसाठी फाईल्सची उलथापालथ सुरु होती, आणि तेव्हाच बॉम्बस्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकला.

यानंतर बाहेर येऊन पाहिलं, तर आकाशात सर्वत्र धुराचे लोट परसले होते...पक्षांचा कलकलाट सुरु होता... त्यानंतर लगेच बाहेर पडलो, रिगल सिनेमागृहापर्यंत पोहचतो, तोच समजलं की, मुंबई शेअर बाजाराजवळही असाच स्फोट झाला आहे. सर्वत्र एकच गोंधळ सुरु होता. शेअर बाजाराच्या बेसमेंटमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. क्राईम रिपोर्टर असल्यानं मृतदेह पाहणं माझ्यासाठी तसं नवीन नव्हतं. पण त्या दिवशी ती सर्व परिस्थिती पाहून मन अक्षरश: सुन्नं झालं होतं. काहीच सुचत नव्हतं... मुंबई शेअर बाजाराचं कार पर्किंग बेसमेंटमध्येच होतं, आणि तिथंच हा स्फोट झाला होता.

मुंबईतल्या या स्फोटांचं चित्र इतकं विदारक होतं की, ते पाहून मीही हादरुन गेलो होतो. या आधी दोनच महिन्यांपूर्वी मी मुंबईतल्या दंगलीचं रिपोर्टिंग केलं होतं. नवभारत टाईम्समध्ये क्राईम रिपोर्टिंगसाठीचं ते माझं पहिलंच वर्ष होतं.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडली, अन् त्याचे पडसाद मुंबईत उमटले. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मुंबईत अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. यात जवळपास 800 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मुंबईत अशाप्रकारे रस्त्यावर मृतदेहांचा खच पाहून, मन हेलावून गेलं होतं.

मुंबईचे वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी त्यावेळी शेअर मार्केटच्या बेसमेंटमध्येच होते. मुंबई पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त हसन गफूर ( जे 26/11 च्या हल्ल्यावेळी पोलीस आयुक्त होते.) यांनी सांगितलं की, एअर इंडियाच्या इमारतीतही स्फोट झाला आहे. संपूर्ण शहरात 6 ते 7 ठिकाणी स्फोट झाल्याचं कळतंय. पण संध्याकाळी संपूर्ण शहराची माहिती घेतली. त्यावेळी कळलं की, एकूण 12 ठिकाणी गाड्यांचा वापर करुन दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान हे स्फोट घडवून आणले होते.

एअर इंडियाची इमारत, शेअर मार्केट, पासपोर्ट ऑफिस, प्लाझा सिनेमा, हॉटेल सी रॉक, सहारा विमानतळ आदी ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटानं संपूर्ण मुंबईचं कंबरडंच मोडलं होतं. एकूणच सांगायचं झालं तर, मुंबईवरील तो पहिला दहशतवादी हल्ला होता.

आर्थररोड कारागृहातील टाडा कोर्टाच्या सुनावणीचं सलग कव्हरेज मी करत होतं. या सुनावणीत बचाव पक्षाकडून सांगितलं जात होतं की, मुंबईतल्या दंगलींचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवून आणले होते. वास्तविक, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या त्या दंगलीही चुकीच्या होत्या, अन् त्याचा बदला घेण्यासाठी घडवून आणलेले ते साखळी स्फोटही. बदल्याच्या भावनेनं कित्येक निष्पापांचा बळी घेतला होता. अन् नात्या-संबंधांचं शिरकाण झालं होतं.

या घटनांनी भारताच्या हिंदू-मुस्लिम एकतेच्या संस्कृतीला अशा प्रकारे दफन केलं होतं की, ज्याने हिंदू... केवळ हिंदुसोबत राहू लागला, आणि मुसलमान... मुसलमानांसोबतच... या घटनेनं मानवतेवर इतके प्रहार केले की, त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. म्हणूनच आजही मुंबईत एखाद्याला घर भाड्यानं देताना, त्याचा धर्म कोणता हे आधी पाहिलं जातं. मला यावर आणखी काही बोलायचं नाही... काहीच नाही... फक्त त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्याने हा लेखन प्रपंच...