ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांपासू क्रिकेट प्रेक्षकांची चंगळ सुरू आहे. एकापेक्षा एक थरारक सामन्यांचे थरारक अनुभव त्यांना प्रत्यक्ष घेता येत आहेत. टी-20 विश्वचषकात आतापर्यंत अनेक धक्कदायक निकाल लागले आहेत. हा हा देश विश्वचषक विजेता असेल किंवा या या संघांमध्ये अंतिम सामना होईल, अशा एक ना अनेक शक्यता क्रिकेट रसिकांकडून प्रत्येक क्षणाला वर्तवण्यात आल्या. किंबहुना पुढील सामन्यांसाठी अजूनही वर्तवण्यात येत आहेत. काहींची संभ्यावता खरी ठरली तर काहींना आपल्याच प्रेडिक्शनवर हसू आले. पात्रता फेरीपासून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या संघांनी मोठमोठ्या संघांना धक्के देत गुणतालिकेत अनेक फेरबदल घडवले व टोकाची उत्सुकता निर्माण केली. सामन्याआधी प्रेक्षक किंवा माध्यमांनी ज्यांना पराभूतांच्या यादीत समाविष्ट केले होते, त्यांनी त्या यादीतून नाव काढून विजेत्यांच्या यादीत आपली गणना करण्यासाठी भाग पाडले. हा त्या देशांसाठी विश्वचषक जिंकण्याइतकाच महत्वाचा क्षण होता.


अगदी सुरूवातीला बलाढ्य इंग्लंडला आयर्लंडसारख्या नवख्या व तुलनेने अतिशय दुबळ्या वाटणाऱ्या संघाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. जिंकण्यासाठी 158 एवढी धावसंख्या गाठताना बेन स्टोक्स, जॉस बटलर, अलेक्स हेल्स, मोईन अलीसारख्या खेळाडूंना घाम फुटला. त्यांना जेमतेम १०५ धावाच करता आल्या. आयर्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना या सामन्यात मोठा झटका दिला. त्यानंतर सर्वांत जास्त चर्चा झाली तोफेच्या गोळ्यांसाऱखी टिच्चून गोलंदाजी आणि फलंदाजीत बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानसारखे सलामीवीर असणाऱ्या पाकिस्तान आणि कोणाच्या खिजगिणतीतही नसणाऱ्या झिम्बॉब्वेची. १३१ एवढी माफकधावसंख्या गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने धावसंख्या गाठेपर्यंत नांगी टाकली. याला कारण होते झिम्बॉब्वेचे चपळ क्षेत्ररक्षण आणि अचूक मारा. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहज समजल्या जाणाऱ्या शेवटच्या षटकातील 11 धावाही पाकिस्तानकडून झाल्या नाहीत. पाकिस्तानला बहुतेक बाद फेरीतूनच बाहेर पडावं लागणार की काय अशी स्थिती निर्माण झाली.


मात्र, दक्षिण अफ्रिकेच्या कृपेने पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकले. पुढील धक्कादायक सामना होता तो दक्षिण अफ्रिका आणि नेदरलॅंड्स यांच्यामध्ये खेळवला गेलेला साखळी फेरीतील अखेरच्या दिवसातील पहिलाच सामना. या सामन्यावर दुसऱ्या गटातील पात्र संघांची मदार होती. भारतासारख्या मातब्बर संघाला हरवून आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजीलाच खिंडार पाडत नेदरलॅंड्सने सामना आपल्या बाजुने झुकवला. मैदानाच्या चारही बाजुंस फटके लगावण्याची क्षमता असलेल्या दक्षिण अफ्रिकेला नेदरलॅंड्सने 145 धावसंख्येवरच रोखले. त्याआधी नेदरलॅंड्सने 158 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे 13 धावांनी त्यांनी दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आणि या स्पर्धेतील रोमांच जीवंत ठेवला.


आपल्या समोर कोणताही संघ असो, कितीही मोठमोठी नावे असोत मात्र, कागदावरील आणि प्रत्यक्ष मैदानावरील संघांमध्ये किती अंतर असते ते या संघांनी दाखवून दिले आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी काही संघ तुलनेने प्रबळ मानले जात होते ते आता स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत. काही सामने पावसाने जिंकल्यानेही ते संघ बाहेर पडण्यास मदत झालीच आहे. श्रीलंकेसारखा नुकताच आशिया चषकात तुलनेने प्रबळ असणाऱ्या संघांना मात देऊन आलेला संघ असो किंवा मग आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कायमच ताकदीने खेळणारा ऑस्ट्रेलिया असो, आता बाहेर पडले आहेत. दक्षिण अफ्रिका कागदावर मोठा वाटत होता.


मात्र, महत्वाच्या सामन्यात नांगी टाकण्याच्या आपल्या इतिहासाची पुन्हा आठवण त्यांनी याही विश्वचषकात करून दिलीच. टी-ट्वेन्टीमध्ये कोणताही संघ बलाढ्य किंवा दुबळा नाही. आपण क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी या सर्वच आघाड्यांवर प्रतिस्पर्ध्यांना मात दिल्यास कोणताही संघ नक्कीच विजयास पात्र असतो हे निश्चित.


आता भारत, पाकिस्तान, इंग्लंड किंवा न्युझीलंड यापैकी कोणाकडे तरी विश्वचषक जाणार आहेच. मात्र, आयर्लंड, झिम्बॉम्बे, किंवा नेदरलॅंड्ससाठीही हा विश्वचषक तितकाच यादगार असेल. या संघांच्या  विजयामुळे पात्रता फेरीत बाद झालेल्या संघांनाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही. त्यामुळे पुढील विश्वचषकात नामिबिया, युएई, स्कॉटलंड, विंडीज या संघांकडूनही अशाच खेळाची अपेक्षा असेल.