गेल्या वर्ष दोन वर्षात भारतीय जनता पार्टीने त्यांची तीन रत्नं गमावली. पहिले अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर मनोहर पर्रीकर आणि त्यानंतर आता सुषमा स्वराज. या तीनही व्यक्तींकडे आकर्षित होण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वासोबतच त्यांची ओजस्वी वाणी आणि अमोघ वक्तृत्त्व. मग ते यहाँ का कंकर कंकर म्हणणारे वाजपेयी असतील किंवा प्रकृती साथ देत नसतानाही हाऊ इज द जोश विचारत सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे पर्रीकर असतील किंवा मग काश्मीरची एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही असं ठणकावून सांगणाऱ्या सुषमा स्वराज असतील.


पर्रीकर गेले तेव्हा अनेकांच्या मनात आपल्या जवळचा माणूस गेल्याची भावना होती आणि सुषमा स्वराज गेल्यानंतरही आपल्या घरातला कोणीतरी गेल्याची भावना आज अनेकांच्या मनात आहे. एखाद्या राजकारण्यासाठी एवढी आत्मीयता निर्माण होणं हाच त्याच्या कारकिर्दीचा खरा कळस असतो. वक्तृत्वाची शैली जोपासण्यासाठी मी राजकीय नेत्यांच्या भाषणांचा... त्यांच्या शैलीचा अभ्यास केला नाही... पण जेव्हा पहिल्यांदा सुषमा स्वराज यांना ऐकलं तेव्हा जाणवलं की या बाईच्या वाणीत वीज आहे. विरोधी पक्षनेत्या म्हणून जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा सगळे संसदपटू त्यांच बोलणं शांतपणे ऐकत होते. आणि तिथे त्या मला वक्ता म्हणून पहिल्यांदा भावल्या.

एक स्त्री म्हणून जेव्हा मी त्यांच्याकडे बघते तेव्हा वुमन एम्पॉवरमेंटची नवी व्याख्या आणि नव्या कक्षा माझ्यासमोर उघड्या होतात. स्त्रीला सबळ करण्यासाठी तिच्या कपाळावरचं कुंकू, हातातल्या बांगड्या, मंगळसूत्र भिरकावण्याची गरज नसते. तिच्या हातात जबाबदारी द्या... तिच्या कार्यकर्तृत्वाने ती गगनाला गवसणी घालू शकेल. त्यामुळे या स्युडो फेमिनीसमच्या सीमांपलीकडे स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहणारी ही स्त्री माझ्यातल्या स्त्रीला कायम प्रेरणा देणारी आणि मार्गदर्शक ठरते.

प्रत्येक बाईमध्ये एक सुप्त आई दडलेली असते. सुषमा स्वराज यांच्यामध्येही ती दडलेली होती. कुटुंबावर संकट आल्यानंतर ज्याप्रमाणे घरातली कर्ती स्त्री त्या संकटासमोर पदर खोचून उभी राहते त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या पडत्या काळात त्या पक्षासोबत ठामपणे उभ्या होत्या आणि कायम राहिल्या. परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यातली आई सदैव जागृत होती. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही भारतीयाने त्यांना ट्विटरवर एक हाक मारावी... आपल्यावर आलेल्या संकटाची माहिती द्यावी आणि एक आई ज्याप्रमाणे आपल्या बाळासाठी धाव घेते त्याप्रमाणे सुषमा स्वराज त्यांच्या मदतीला धावून जायच्या. मग ते इराकमध्ये अडकलेले भारतीय असतील, अमिरातीत अडकलेली एखादी तरुणी असेल, बालीमध्ये अपघात झालेली एखादी स्त्री असेल किंव्हा शहीद झालेल्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी वॉशिंग्टनहून येणारे निखिल महाजन असतील. या प्रत्येकाला स्वराज यांनी अवघ्या एका हाकेवर मदतीचा ओघ पोहोचवला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेला भारतीय नागरिक आता एकटा नाही, ही भावना त्यांनी निर्माण केली आणि केवळ एलिटिस्ट मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाची नाळ सर्वसामान्यांशी जोडली. तेव्हा त्या एक नेता म्हणून मनाला भावतात.

ज्या युनोच्या हस्तक्षेपामुळे काश्मीरप्रश्न चिघळला त्याच युनोच्या परिषदेत जाऊन त्यांनी आम्ही काश्मीरची एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही असं ठामपणे सांगितलं, ज्या देशांना दहशतवादाविरोधात लढायचं नसेल त्यांना आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय समुहात काहीही स्थान नाही, अशी भूमिका पारखडपणे मांडली. तेव्हा त्या एक मुत्त्सद्दी राजकारणी म्हणून राजकीय पटलावर प्रकर्षाने झळकतात.

जेव्हा मोदी पहिल्यांदा युनोमध्ये भाषण करणार होते, तेव्हा त्यांना "यहां आपकी नही चलेगी, आपको कागज सामने रखना होगा', असा मार्गदर्शन वजा दम स्वराज यांनी मोदींना दिला होता. काय करा आणि काय करू नका हे पंतप्रधानांना सांगणाऱ्या सुषमा स्वराज या एक आदर्श मार्गदर्शक ठरतात.

सुषमा स्वराज यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणून पक्षात अंतर्गत कलह निर्माण करण्याचेही अनेक प्रयत्न करण्यात आले. पण सुषमा स्वराज यांना त्यांच्या मर्यादा आणि समोरच्या माणसाच्या लोकप्रियतेचं भान होतं. अशा प्रसंगात त्यांनी योग्य ती भूमिका घेऊन पक्ष एकसंध राखला. तेव्हा त्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून समोर येतात.

कुलभूषण जाधवांच्या केसमध्ये विचारधारेच्या मर्यादांना न जुमानता शशी थरूर यांचा सल्ला त्यांनी घेतला, त्यावेळी त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. पण प्रशासन आणि नियम हे माणसांसाठी आहेत माणूस प्रशासन आणि नियमांसाठी नाही हे त्यांनी दाखवून दिलं. एका भारतीयाला मदत करण्यासाठी विचारधारा आणि राजकीय मर्यादा न मानणाऱ्या सुषमा स्वराज या भारतीय म्हणून इथे श्रेष्ठ ठरतात.

एखाद्या क्षेत्रात यश मिळाल्यानंतर त्या यशाची माणसाला चटक लागते आणि मग कुठे थांबायचं याचं भान त्याला रहात नाही. पण स्वतःच्या प्रकृतीचा आणि कार्यक्षमतेचा अंदाज घेऊन त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही पूर्णविराम दिला आणि पदावरून पाय उतार झाल्या आणि तेव्हा त्या एक निस्पृह म्हणून सिद्ध झाल्या.

वक्तृत्त्व, कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व या तीनही आघाड्यांवर सुषमा स्वराज यांनी स्वतःला सिद्ध केलंय. अष्टभूजा दूर्गा ज्याप्रमाणे तिच्या अष्ट हातांनी संकटनिवारण करते त्याप्रमाणे सुषमा स्वराज या त्यांच्या वैयक्तिक, राजकीय आणि सामाजिक आयुष्यात अष्टावधानी होत्या. म्हणूनच त्वंहि दूर्गा दशप्रहरणधारिणीम् ही ओळ त्यांच्यासाठी कार्यकर्तृत्त्वाचं वर्णन करते. त्याचसोबत कमला कमलदल विहारिणीम् हे वाक्य त्यांच्यासाठी अगदी सार्थ ठरतं.