गेल्या वर्षी मार्च अखेरीस आलेलं कोरोना नावाचं वादळ मराठी रंगभूमीवरदेखील धडकलं. त्यानंतर जवळजवळ नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर नाट्यगृहांना लागलेले टाळे उघडले गेले. त्या नऊ महिन्यांच्या काळात रंगमंच कामगार, कलाकार, निर्माते यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. तशा पद्धतीच्या बातम्याही आपण बघत होतो. नाट्यगृहे सुरू होऊन जेमतेम शंभर दिवस होत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि नाट्यगृहाला पुन्हा टाळे लागले. नाटक बंद झाल्याने काहींनी सुरक्षारक्षकाची भूमिका स्वीकारली, काहींनी भाजीविक्रीचा, मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला, काही टॅक्सीचालक झाले तर बहुतांशी कामगार कर्जबाजारी आहेत. 


नाटक आणि प्रेक्षकांमधील दुवा असणारी रंगभूमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शांत होती. मागील मार्च महिन्यात अनेक गोष्टींवर बंधने आली, त्यात रंगभूमीचादेखील समावेश होता. महाविद्यालयीन नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी रंगभूमी म्हणजे एकांकिका स्पर्धा. युवा महोत्सव, आयएनटी, उत्तुंग, उंबरठा, रंगायतन महोत्सव अशा अनेक एकांकिका स्पर्धांपासून सुरू झालेला विद्यार्थ्यांचा वार्षिक नाट्यप्रवास सवाई या मानाच्या एकांकिका स्पर्धेत येऊन धडकतो. मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजचा अभ्यास, लेक्चरला बंक मारून केलेली नाटकाची तालीम, दिवसरात्र केलेला नाटकाच्या संहितेचा अभ्यास, कॉलेजच्या सिनिअर्स मंडळींसोबत रंगलेल्या चर्चा. अशा अनेक गोष्टी गेल्या एक वर्षात मी खूप मीस केल्यात. त्यामुळेच मला खंत वाटते त्या विद्यार्थ्यांची ज्यांनी मला अमुक एका महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाय कारण मला अभिनय शिकायचाय, नाटक करायचंय म्हणून प्रवेश घेतला होता. 


व्यावसायिक रंगभूमीला चांगले दिवस येत असताना, प्रेक्षकांना पुन्हा व्यावसायिक रंगभूमीची ओढ लागलेली असतानाच कोरोनाने हे सारे चित्र बिघडवले. नाटकाचं वारं लागलेल्या माणसाला नाटकाशिवाय दुसरं काही जमत नाही, तरीही दुसरं काही केलंच तर मन रमत नाही, असं मी ऐकलंय. मराठी नाट्यसृष्टीत एक नाटक केलं म्हणून हवेत उडणारेदेखील आहेत तर नाटक हाच श्वास समजून काम करणारे प्रामाणिक कलाकारदेखील आहेत. ज्यांना बऱ्याचदा अपयशाचा तर कधी यशाचा सामना करावाच लागतो. पण या मंडळींचं ध्येय रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणं हेच असतं. ते काम ते चोख पार पाडतात. या कलाकारांसोबत जीवाला जीव लावणारे पडद्यामागचे कलाकारदेखील असतात. त्यात म्युझिक, लाइट ऑपरेट करणारे, सेट लावणारे, कपड्यांना इस्त्री करणारे, कलाकारांचा मेकअप करणारे, सेटची वाहतूक करणारे, बुकिंग क्लार्क, नाट्यगृहातले कर्मचारी, कँटीनमध्ये काम करणारे, नाट्यगृहाबाहेर चहा, बूर्जी-पाव विकणारे अशा साऱ्यांचाच समावेश असतो. पण सध्या हे सगळेच घरी बसले आहेत. 


संकटकाळात कलाकार आणि पडद्यामागच्या कलाकारांचे पोट भरणारी मंडळीदेखील आहेत. काही प्रतिष्ठित कलाकारांनी आपली नाईट थांबवली, काहींनी अर्धी केली, महाविद्यालयीन नाट्यसंथ्यांचे गट एकत्र आले. त्यांनीदेखील काही रक्कम जमा केली. अशी अनेक मंडळी या पडद्यामागच्या कलाकारांसाठी धावून आले. 


रसिकांचं घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी मोबाईल, टीव्ही, सिनेमे, वेबसिरीज, यूट्युब, ओटीटी अशी अनेक माध्यमं आहेत. पण नाटकांचं काय? हाच विचार करून काही नामांकित रंगकर्मींनी ऑनलाईन नाटकांचे विविध प्रयोग केले. हे प्रयोग यशस्वी झाले खरे. पण, नाटक नाट्यगृहात जाऊन करण्याची आणि बघण्याची मजा नाट्यप्रेमी कलाकाराला आणि रसिकालाच ठाऊक असते!


नाटकांच्या प्रत्येक प्रयोगासाठी होणारा खर्च, तारखांच्या समस्या, कलाकारांचे नखरे, त्यांच्या तारखा हे सारं गणित जमवत नाट्यनिर्मात्यांना प्रयोग करायचा असतो. पण, सध्या रंगभूमीवर आलेल्या कोरोना नावाच्या महानाट्यामुळे इतर नाटकवाल्यांची होणारी गळचेपी पाहून दु:ख होते. सध्या अनेक मालिकांनी दुसऱ्या राज्यात जाऊन चित्रीकरण करण्याचा पर्याय स्वीकारला. पण, नाटकाकडे मात्र असा कोणताही पर्याय नाही. मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग असलेली नाट्यसृष्टी मात्र दुर्लक्षितच राहिली. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर नाट्यसृष्टीला पुन्हा उभारी मिळाली होती. व्यावसायिक रंगभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळून काही नाटकांचे प्रयोग सुरू करण्यात आले होते. तेदेखील ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत. आर्थिकदृष्ट्या प्रयोगाचा खर्च परवडत नसताना केवळ नाट्यसृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी जिद्दीनं नाट्यनिर्माते, कलाकार प्रयोग करताना पाहायला मिळालं. 


मला आता पुन्हा अनुभवायचाय तो रंगमंचावर असलेला फुलांचा स्वस्तिक, मखमली पडद्याला लागलेला झेंडूच्या फुलांचा हार, प्रयोगाआधी रंगमंचावर दरवळणारा अगरबत्ती आणि फुलांचा तो सुगंध, तिसऱ्या घंटेसाठीची ती लगबग, संहितेच्या विश्वात रममान व्हायचंय, स्पॉट लाइटच्या प्रकाशात स्पॉट झालेल्या कलाकारांचा अभिनय बघायचाय, विंगांमध्ये चाललेली चलबिचल, अभिनयाची जुगलबंदी, विनोदाचे षटकार, त्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांच्या हास्याचे फवारे मला पुन्हा अनुभवायचे आहेत. 


संपूर्ण जगच सध्या कोरोनाच्या अत्यंत वाईट कालखंडातून प्रवास करीत आहे. लवकरच या भीषण परिस्थितीतून नाट्यसृष्टी पूर्वपदावर येवो आणि कलाकाराला लवकरच त्याच्या नाट्यमंदिरात प्रवेश करता येवो हीच नटराजा चरणी प्रार्थना..!