दिवाळीत घरी न जाण्याचे माझं हे काही पहिलं वर्ष नाही.. सलग दुसरं आणि ओव्हरऑल तिसरं. पण लांब असतानाही घरची दिवाळी काही मनातून जात नाही. घराची साफसफाई करण्यासाठीचा आईचा तगादा, अभ्यंगस्नानासाठी आजीचं उठवणं, शेव किंवा चकली यातला एक तरी पदार्थ गरम गरमच खाल्ला पाहिजे याचा बाबांचा आग्रह, उटण्यापासून दूर पाळणारा भाऊ आणि त्याला त्रास म्हणून मुद्दाम लावणारी मी.
शाळेला सुट्टी लागली की दिवाळीच्या कामांची सुरुवात घरच्या साफ-सफाईपासून व्हायची. मला याचा प्रचंड कंटाळा. मग आईने हजारदा सांगितलं की एकदा ऐकून ते काम करायचे. मग यायचं फराळ बनवण्याचं काम... यातले चकली पाडणे, शंकरपाळी तळणे, अनारसे करणे ही आईच्या एका हाकेत मी केलेली कामं. (येतात सगळी पण याचाही फार उल्हास होता असं नाही.) एका हाकेत करण्याचं कारण म्हणजे त्यात प्रयोग करता यायचे. चकलीच्या गोळ्याचे वेगवेगळे आकार बनवणं, शेव पडताना साच्यातल्या सगळ्या प्लेट्स वापरुन पाहणं, अनारश्यांच्या गोळ्याचे गोल करुन भज्यासारखं तळणे वगैरे. पण यात रमणे तात्पुरतं असायचं...
दिवाळीतला अजून महत्वाचा भाग म्हणजे अभ्यंगस्नान. त्यासाठी आजी उठवायची. (बहुतेक तिनं आपणहूनच ही जबाबदारी स्वतःवर घेतली असावी) सूर्योदय होत आलाय आणि अजून सगळ्यांच्या अंघोळी झाल्या नाहीत, ही कल्पना तिला सहनच व्हायची नाही. मग तरीही त्यातल्या त्यात शेवटी ती मला उठवायची. तुझ्या आधी कुणाकुणाच्या आंघोळी झाल्या आहेत आणि कुणा कुणाचे शुभेच्छांचे फोनपण आले हे सांगून सांगून उठायला भाग पाडायची. पण मी उठले आणि लगेच आंघोळ केली असं व्हायचं नाही. मी आणि बाबा उटणं लावून बसायचो आणि भाऊ उटणं लावणार नाही या अटीवर आंघोळ करायचा.
तशी आमच्याकडे कामांची विभागणी केलेली असायची पण माझ्याकडे हमखास येणारी कामं म्हणजे रांगोळी काढणं आणि दिवे लावणं. त्यात रांगोळी काढण्याचा मला कंटाळा येण्यापेक्षा भीती वाटायची. कारण ठिपक्यांच्या डिजाईन सोडून मला दुसरी कुठलीच रांगोळी यायची नाही आणि 5 दिवस त्या पुरवून पुरवून ठेवाव्या लागायच्या. त्यात सकाळी जर एखादी काढावी लागली तर झालंच मग... मग आई एखादी एक्स्ट्रा डिजाईन काढून द्यायची आणि त्यात मी आणि भाऊ रंग भरायचो.. तर दिवे लावण्याचा कामावर आजीचं मॉनिटरिंग असायचं. किती दिवे लावायचे, ते कुठे ठेवायचे किती तेल टाकायचे वगरे गोष्टींचा ती फॉलोअप घ्यायची. पण हे काम मला आवडायचं.(दिवे लावणं हे उपजतच असेल कदाचित.) फक्त हे दिवे विझले की माझी चीडचीड व्हायची. (🤦)
लक्ष्मीपूजनाची वेळ झाली की घरात लगबग सुरु व्हायची. पूजेची तयारी आजी करायची आणि त्याचं मॉनिटरिंग आजोबा करायचे. (दुसरीकडे पूजेच्या वेळेस नवीन कपडे घाला यासाठी आजोबांच्या मागे लागावं लागायचं. कपडे बदलणं त्यांच्या भयंकर जीवावर यायचं.) पूजा संपेपर्यंत माझा पेशन्स संपलेला असायचा. आरती सुरू झाली की आनंद व्हायचा.
इतकं सगळं असूनही दरवर्षी दिवाळीची मी वाट पाहायचे. अजूनही पाहते.. पण आता त्या वाट पाहण्यावर साशंकतेचं सावट असतं. आपण दिवाळीत घरी जाऊ शकू की नाही ही शंका मनात असते. लहान असताना घराशिवाय दिवाळी ही डोक्यातही न येणारी गोष्ट असते. मग हळूहळू जगाच्या चक्रात आपण येतो. दहावी-बारावीत कदाचित असं करावं लागू शकतं याचा अंदाज येतो. ग्रॅज्युएशन-पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दरम्यान असं करणारे अनेक लोकं भेटतात. मग नोकरीच्या काळात अशी स्वतःवर आली की दिव्यांच्या या सणातला काळोखच दिसतो. पण यातूनच आयुष्याच्या अजून एका टप्प्याला सुरुवात होते.
घरी न जाण्याचं जेव्हा माझं पहिलं वर्ष होतं तेव्हा दिवाळी साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं असा existential प्रश्नच माझ्यासमोर होता. ऑफिस होतं. सुट्टी नव्हती. मग अजून कुठे, कुणाकडे जाण्याचा प्रश्न नव्हता. करायचं काय? दिवे लावायचे? गोडधोड खायचं? आणि तेही एकटीने? दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेजारच्या काकूंनी मी ऑफिसमधून येण्याच्या आधीच माझ्या दारासमोरही पणती ठेवला होता. मग जाणवलं, आपण जिथे असतो ना तिथेच आपलं शंभर टक्के existence असणं गरजेचं आहे. त्या तेवत्या पणतीमुळे नव्याने प्रकाश दिसला मला.
आता दिवाळीत घरी जाता आलं नाही म्हणून अंधारलेलं वाटत नाही. माझ्या घरच्यांनाही वाटत नाही. या काळात काही गोष्टी नक्कीच बदलल्या आहेत. दिवाळीतल्या फारशा न आवडणाऱ्या गोष्टीही हव्या-हव्याशा वाटतात. घराच्या साफ सफाईसाठी मागे लागायला आईसोबत नसली तरीही ते आपणहूनच केलं जातं. पहाटे उठवायला आजी नसली तरीही अभ्यंगस्नान होतं. आपल्या दारासमोरही रांगोळी असावी असं वाटू लागतं. एखादा फराळाचा पदार्थ आपणही बनवावा असं वाटतं. घरची आठवण येते पण त्याचा त्रास होत नाही.
माणसाच्या आवडी-निवडी बदलत जातात. पण आठवणी मात्र कायम असतात. आपल्या जडणघडणीमध्ये आठवणींचा खरंच इतका मोठा असतो?
घरापासून दूर असतानाची दिवाळी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Nov 2018 11:25 PM (IST)
इतकं सगळं असूनही दरवर्षी दिवाळीची मी वाट पाहायचे. अजूनही पाहते.. पण आता त्या वाट पाहण्यावर साशंकतेचं सावट असतं. आपण दिवाळीत घरी जाऊ शकू की नाही ही शंका मनात असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -