जेव्हा मी त्यांना भेटले, तेव्हा त्यांचे पाय बघून अक्षरश: हादरायला झालं. केवळ चपला नाहीत आणि होत्या त्या तुटल्या म्हणून या सखुबाईंनी शेकडो किमीची वाट अनवाणी तुडवली. मला माझ्या चपलांची लाज वाटली. मनात आलं की जवळच सीएसटी स्टेशनच्या सबवेमधून मी त्यांना नव्या चपला घेऊन देते आणि मगच शूट करते...आणि मी तसं केलं...
काही वेळाने बघते तो ट्विटर आणि फेसबुकवर माझ्या कौतुकाचा पूर आलेला. मला दडपायला झालं... खरं तर सखुबाईंच्या पायात माझ्या हातानं चपला घालणं आणि त्याचं चित्रीकरण होऊन ते टीव्हीवर दाखवलं जाणं हे खूप सहज स्वाभाविक वाटलं होतं मला... पण साध्या साध्या गोष्टीही खूप अवघड होतात नंतर...
सखुबाईंना चपला दिल्या, पण ते शूट करुन मिरवायचं होतं का मला? अर्थातच नाही. केलेल्या मदतीचा साधा उल्लेखही करु नये. पण अशी छोटीशी मदत एखाद्या थकल्या-भागल्या जीवाला विसावा देऊ शकते. सरकार या शेतकऱ्यांना काय देईल न देईल. त्यावरच्या निव्वळ राजकीय चर्चांपेक्षा आपण आपापला खारीचा वाटा उचललाच पाहिजे, हे सांगणं मला जास्त गरजेचं वाटलं. मग कॅमेऱ्याच्या माध्यमांतून आम्ही ते सांगितलंही... इतकेच...
पण या एवढ्याशा गोष्टीनं मला किंवा इतर कुणालाही होणारं कौतुक पेलवणारं नाही. कारण कर्तव्यपूर्तीचं कधी कौतुक होऊ शकत नाही. फार फार तर आपण सर्वचजण त्या कर्तव्यपूर्तीच्या दिशेनं पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मला फेसबुकीय महानतेचा किताब देणं आजिबात गरजेचं नाहीय.
केवळ जखमा, भेगा आणि फोड आलेल्या पायांचे, सुरकुतलेल्या चेहऱ्यांचे, सुकलेल्या भाकरीचे, लाल टोप्यांचे फोटो काढून आणि ते पोस्टून ही जबाबदारी संपत नाही. फक्त सरकारच्या नावानं शंख करुनही ती संपत नाही.
उलट प्रामाणिकपणे आपण शेतकरी मोर्चा सुरु होता, तेव्हा आपापल्या परीनं या कष्टकऱ्यांसाठी काय करु शकलो हे स्वत:ला विचारणं गरजेचं आहे.
मी ते स्वत:ला विचारलं आणि माझ्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्नही केला. हे उत्तर अत्यंत तोकडं आहे. कारण मी घेऊन दिलेल्या चपलांचा सखुबाईंच्या पायाला फक्त आधार आहे. अशा अनेक सखुबाई आहेत ज्यांचे पाय मूळातच बळकट, सक्षम व्हायला हवेत.
पुलंच्या चितळे मास्तर मधलं शेवटचं वाक्य होतं, "चपलांच्या ढिगाऱ्यातून मास्तरांच्या चपला ओळखणं अवघड गेलं नाही. कारण सर्वात जास्त झिजलेल्या चपला चितळे मास्तरांच्या होत्या..."
जर कधी आजच्यासारखी सखुबाईंना पुन्हा शोधण्याची वेळ आली तर मी सखुबाईंचे पाय नेमके ओळखावेत. कारण आज मी झिजलेले पाय आणि झिजलेली आयुष्य पाहिली आहेत...
पाहा व्हिडीओ :