माझी आई सरिता भावे ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे लहानपणापासून मी जे काही शेअर केलंय ते माझ्या आईसोबत शेअर केलंय. ती शास्त्रीय गायिका आहे, युवा पिढीतील आघाडीची व्हायोलिन वादक श्रुती भावे-चितळे (Shruti bhave Chitale) आपल्या आईचा आपल्या आयुष्यावर किती ठसा आहे, हे अतिशय तन्मयतेने सांगत होती. ती पुढे म्हणाली, आपलं क्षेत्र सांभाळून तिने मला आणि माझ्या भावाला वाढवलं. कार्यक्रमाच्या दौऱ्यांवर असतानाही तिचं बारकाईने आम्हा भावंडांकडे लक्ष असायचं. तिने संगीतबद्ध केलेली बालगीते, देशभक्तिपर गीते आम्ही शाळेत म्हणायचो,


आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर तिने मला प्रोत्साहित केलंय. ती तानपुरा घेऊन रियाझ करायची. तेव्हा तानपुरा कसा लावायचा हे ज्ञान मला मिळालं. तिने मला नृत्यासाठीही प्रोत्साहन दिलं. माझे बाबा व्हायोलिन वादक असल्याने तेही वातावरण आमच्या घरात होतं. यामुळेच मला व्हायोलिन येऊ शकेल, हे तिने जाणलं. मी चांगलं गाणंही म्हणत होते. ती तिच्या विद्यार्थ्यांना शिकवताना मीही तिच्यासोबत बसायचे.


तिनेही ताकदीने शास्त्रीय, उपशास्त्रीय, चित्रपट संगीत सादर केलंय, आत्ता जे वादन मी करते, त्यातील क्लासिकल, उपशास्त्रीय, फिल्म म्युझिक हे सगळे पैलू मी तिच्यामुळे अवगत करु शकले.


एक कलाकार म्हणून तिने माझ्यावर कधीही कोणतंही बंधन घातलं नाही. शास्त्रीय शिकण्यावर तिने कायम भर दिलाय. बुजुर्ग वादक कला रामनाथ यांच्याकडे ती मला घेऊन गेली. विदुषी कला रामनाथ यांच्या मार्गदर्शनाने माझ्यातला व्हायोलिन वादक खऱ्या अर्थाने फुलला. मला पंडित मिलिंद रायकर यांचंही मार्गदर्शन लाभलं. याचं सारं श्रेय आईला जातं. आपल्याला आयुष्यात एक पुशिंग फॅक्टर गरजेचा असतो. तो माझी आई आहे. ती क्रिटिकली माझ्या परफॉर्मन्सकडे बघत असते. हे फार महत्त्वाचं आहे. मी अजूनही मोठी उंची गाठायला हवी, हे ती आवर्जून सांगते. अधिकाधिक सोलो प्रोग्रॅम करण्यासोबतच सोबत आणखी दर्जेदार काम माझ्याकडून व्हावं, असा तिचा आग्रह आहे, हट्ट आहे.


ताल गया तो बाल गया, सूर गया तो सर गया... हे वाक्य मी तिच्याकडून नेहमी ऐकलंय. संगीतात सूर फार महत्त्वाचा आहे. हे तिने कायम माझ्या मनावर ठसवलंय.


एक प्रसंग मला आठवतो, एका कार्यक्रमात माझा परफॉर्मन्स खूप वाईट झालेला. तेव्हा तिने मला त्याची कारणं शोधण्यास सांगितलं. रियाझ कमी पडत असल्याचं तिने मला दाखवून दिलं. ती रियाझाबाबतीत इतकी काटेकोर आहे की, मी तिला  पहाटे चार वाजता रियाझ करायला उठलेलं पाहिलंय. Self Written and Composed Ghazal Project and Muscial Monologue - मीरा-एक कहन हे तिने प्रचंड समर्पित वृत्तीने केलंय. सतत शिकण्याची वृत्ती तिने अंगी जोपासलीय आणि मलाही ती अंगिकारायला लावलीय. ती तांत्रिकदृष्ट्या प्रचंड सक्षम आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण घरातला फ्युजही रिपेअर कऱण्याची तिच्याकडे क्षमता आहे. इलेक्ट्रिक वर्क तिला कमालीच्या खुबीने कळते. तिच्या वागण्याबोलण्यातून ती शिकवत असते.


माझी आई उत्तम स्वयंपाक करते. तिच्या हातची पुरणपोळी, गुळाची पोळी मला खूप आवडते. माझ्या हातचा उपमा, आमटी तिला आवडते. ती उत्तम शिवणकाम देखील करते. 


तिने जगभ्रमंती करावी, अशी माझी फार इच्छा आहे. मी संगीतकार व्हावं, तिच्या शब्दांना चाली द्याव्यात, असं तिला मनापासून वाटतं. मला तिचं हे स्वप्न साकार करायचंय, असंही गप्पांच्या अखेरीस श्रुतीने सांगितलं.