BLOG:  माझं आणि आईचं नातं हे आई-मुलीसारखंच आहे. ती मूळची शिक्षिका. त्यामुळे अत्यंत शिस्तीची. तिची हीच शिस्त तिने मी आणि माझ्या भावामध्येही मुरवली. आमचं एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे आजी-आजोबांसह आम्ही राहत असू. त्यावेळी घरचं सगळं व्यवस्थित करुन पाटावर पुरण वाटून पुरणपोळ्या करताना आईला मी पाहिलंय. ख्यातनाम निवेदिका, निरुपणकार धनश्री लेले (Dhanashree Lele ) सांगत होत्या.


आपली आई माधवी गोखले यांच्याबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, माझी आई उत्तम लेखिका आहे. तिने सुसंवाद कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवलंय. माझं शिक्षण साधना विद्यालय, रुईया कॉलेजमध्ये झालं. माझं लग्नही खूपच तरुण वयात झालं. सासरीदेखील शिस्तीचं वातावरण. सकाळी सूर्योदय होता होताच आपण सगळं आटोपून ठेवावं, असं माझ्या सासूबाईंचं म्हणणं असायचं. मी तेव्हा ठरवलं असतं, याला विरोध करु शकले असते. पण, घर आणि आपलं काम यातला समन्वय साधणं गरजेचं आहे. त्याने कामंही होतात, घरातलं वातावरणही छान राहतं, हे आईनेच मनावर बिंबवल्याने मी या वेळापत्रकात मला सेट केलं.


मला लहानपणी बोलायला अजिबात आवडायचं नाही. माझ्यातले कलागुण आईने मात्र नेमके हेरले होते. या क्षेत्राकडे कसं पाहायचं, हे मला तिने शिकवलं. नवरात्रीत एका कार्यक्रमात अगदी आयत्या वेळी कथाकथन कार्यक्रमाची तयारी तिने माझ्याकडून करवून घेतली. तिने दिलेल्या प्रोत्साहनाने निवेदन क्षेत्रात मी ही वाटचाल करतेय.


माझा आणखी एक अनुभव सांगते, काही वर्षांपूर्वी बेलापूरला माझं ‘श्रीसुक्त’ या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. मला असं सांगण्यात आलं होतं की, समोर १५-२० जणच असतील. प्रत्यक्षात १५०-२०० जण समोर होते. माझ्या पोटात गोळाच आला, मग थेट आईला फोन केला. आईने सांगितलं, तू यासंदर्भातला जो अभ्यास केलायस तो फक्त फुलवत फुलवत बोल. लोकांना भावेल. अगदी तसंच झालं. त्यावेळी माझ्यातलीच उत्स्फूर्तता मी अनुभवली. आयत्या वेळी तयारी करुनही आपण इतकं छान बोलू शकतो, हे माझं मलाच उमगलं, त्याचं श्रेय आईचं आहे.


वयाच्या सत्तरीत असताना आजही तिचा उत्साह कमाल आहे. पुण्यामध्ये ती साहित्यरंग नावाची चळवळ चालवते. ज्यामध्ये ती स्त्रियांना लेखनासाठी प्रोत्साहित करते.


पाककलेतही आई प्रवीण आहे, तिच्या हाताला उत्तम चव आहे. तिचा डाळ-खिचडी हा पदार्थ मला खूप आवडतो. वाटली डाळ आणि साबुदाण्याची खिचडी यांचा संगम ही तिची निर्मिती आहे. तर, माझ्या हातच्या भाज्या तिला खूप आवडतात. गवार, शेपूची भाजी तिला खूप आवडते.


माझे बाबा रेल्वेत वरच्या पदावर होते, त्यामुळे आम्हाला वार्षिक पास मिळायचा. त्याच कारणास्तव आमचं फिरणं खूप झालंय. पूर्व तसंच ईशान्य भारत वगळता देशातला माझा बहुतेक भाग बघून झालाय. आम्ही जिथे फिरायला जायचो, तिथून आजी-आजोबांना पत्र लिहायचो. तेव्हा आई आम्हाला सांगायची, तुम्ही जो भाग पाहिलाय. त्याबद्दल लिहा. याने दोन गोष्टी व्हायच्या. एक म्हणजे आजी-आजोबांशी आमचा संवाद होत असे आणि दुसरा म्हणजे माझा लिखाणाचा सराव होत असे. विचार करायची, आपले विचार मांडायची सवय मला आईमुळे लागली.


आम्हा दोघींनाही भटकंती आवडते. महाबळेश्वर ट्रीप आम्ही नेहमीच एन्जॉय करत असतो. तसंच उत्तर प्रदेशातील शुक्रताल नावाचा परिसर जिथे गंगा नदी अत्यंत शांत, संथपणे वाहते. तिथे आईला घेऊन जायची माझी दुर्दम्य इच्छा आहे.


माझ्याकडून व्यावसायिक नाटक लिहून व्हावं, अशी माझ्या आईची खूप इच्छा आहे, तिचं ते स्वप्न मला साकार करायचंय, असं गप्पांची सांगता करताना धनश्री यांनी आवर्जून सांगितलं.